Nashik : तीन तासांत रेकॉर्डवरील ९० गुन्हेगारांची धरपकड

नाशिक : पुढारी वृत्तसेवा

शहरातील वाढत्या गुन्हेगारीला आळा घालण्यासाठी पोलिस आयुक्तांनी सोमवारी (दि. २७) सायंकाळी ११ पोलिस अधिकाऱ्यांच्या बदल्या केल्या. त्यानंतर रात्री ११ ते मध्यरात्री २ या वेळेत शहरामध्ये कोम्बिंग ऑपरेशन राबविले. त्यात पोलिसांनी रेकॉर्डवरील ९० गुन्हेगारांची धरपकड केली.

शहरात खून, खुनाचा प्रयत्न, हाणामारी, वर्चस्ववादातून एकमेकांवर हल्ले करण्याचे प्रकार तसेच शस्त्रांचा सर्रास वापर होत आहे. त्यामुळे शहरातील गुन्हेगारी वाढत असल्याने नागरिकांसह लोकप्रतिनिधींनी नाराजी व्यक्त केली आहे. माजी पालकमंत्री छगन भुजबळ यांनी शहरातील गुन्हेगारी आटोक्यात आली नाही, तर पोलिस आयुक्तांविरोधात रस्त्यावर उतरण्याचा इशारा दिला आहे. दरम्यान, गुन्हेगारी आटोक्यात आणण्यासाठी पोलिस आयुक्त अंकुश शिंदे यांनी ११ पोलिस अधिकाऱ्यांच्या बदल्या केल्या. त्यात पोलिस ठाण्यांमधील प्रभारी अधिकाऱ्यांचाही समावेश आहे.

अचानक केलेल्या या बदल्या हा पोलिस दलातही चर्चेचा विषय झाला. त्यानंतर सोमवारी रात्री शहरातील १३ पोलिस ठाण्यांच्या हद्दीत कोम्बिंग ऑपरेशन मोहीम राबविली. त्यात पोलिसांनी रेकॉर्डवरील गुन्हेगारांची शोध मोहीम राबविली. टवाळखोर, हत्यार बाळगणाऱ्यांवर कारवाई केली. या मोहिमेत ३ पोलिस उपआयुक्त, चार सहायक आयुक्त, ४२ पोलिस अधिकारी, २३६ अंमलदार, गुन्हे शाखांमधील अधिकारी व कर्मचारी सहभागी झाले होते.

अशी झाली कारवाई

पोलिसांनी रेकार्डवरील – सराईत १५७ गुन्हेगारांची तपासणी केली. त्यात ९० गुन्हेगारांची धरपकड केली. तडीपार केलेल्या ३६ गुन्हेगारांची तपासणी केली. टवाळखोरी करणाऱ्या २९ जणांवर कारवाई करण्यात आली. तसेच अजामीनपात्र वॉरंटमधील ११ जणांवर कारवाई केली. अंबड येथे शस्त्र बाळगणाऱ्यास पकडले आहे.

हेही वाचा : 

The post Nashik : तीन तासांत रेकॉर्डवरील ९० गुन्हेगारांची धरपकड appeared first on पुढारी.