नाशिककरांनो, पाणी काटकसरीने वापरा! आठवड्यातून एक दिवस आता…

पाणी,www.pudhari.news

नाशिक : पुढारी वृत्तसेवा

अल निनाेच्या प्रभावामुळे यंदा मान्सून लांबण्याची शक्यता आहे. त्यामुळे गंगापूर धरण व समूहातील उपलब्ध पाणीसाठा विचारात घेत नाशिक महापालिकेने आठवड्यातून एक दिवस शहरात पाणीकपात लागू करण्याचा निर्णय घेतला आहे. तसा प्रस्ताव शासनाकडे पाठविला आहे. या पार्श्वभूमीवर नाशिककरांनी पाण्याचा काटकसरीने वापर करणे गरजेचे आहे.

जगभरातील हवामान अभ्यासक संस्थांनी चालू वर्ष हे भारतासाठी अल निनोचे ठरण्याचा अंदाज व्यक्त केला आहे. अल निनाेच्या या संकटामुळे यंदा मान्सून लांबण्यासोबत तो जेमतेम राहण्याची शक्यता आहे. त्यामुळे वेळीच हा धोका ओळखून राज्य शासनाने संभाव्य टंचाई निवारण्यासाठी उपाययोजना राबविण्याचे आदेश दिले आहेत. तसेच धरणांतील उपलब्ध पाण्याचे नियोजन करण्याच्या सूचना केल्या आहेत.

नाशिक शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या गंगापूर धरणात ३६२० दलघफू म्हणजे केवळ ६४ टक्के साठा आहे. तसेच समूहातील चारही प्रकल्प मिळून ६ हजार २५८ दलघफू (६२ टक्के) पाणीसाठा आहे. धरणांतील उपलब्ध पाणीसाठा तसेच भविष्यातील पाण्याच्या नियोजनासाठी महापालिकेने शहरात एकदिवस कोरडा पाळण्याचा निर्णय घेतला आहे. शासनाकडून लवकरच त्यावर शिक्कामोर्तब होऊ शकतो. त्यामुळे टंचाईचे संभाव्य संकट विचारात घेत शहरवासीयांनी आतापासूनच पाण्याच्या थेंबाथेंबाचे नियोजन करणे आवश्यक आहे.

धरण       साठा (दलघफू)   टक्के

गंगापूर         ३६२०             ६४

कश्यपी         १६४५             ८९

गौतमी          ५६७             ३०

आळंदी          ४२६             ५२

एकूण            ६२५८             ५८

हेही वाचा :

The post नाशिककरांनो, पाणी काटकसरीने वापरा! आठवड्यातून एक दिवस आता... appeared first on पुढारी.