न्यायदेवतेच्या मंदिरात आम्हाला न्याय मिळेल : ना. दादा भुसे यांना विश्वास

दादा भुसे,www.pudhari.news

नाशिक : पुढारी वृत्तसेवा

आमदार अपात्रतेच्या मुद्द्यावर सर्वोच्च न्यायालयाचा निर्णय सर्वांना मान्य करावा लागेल. आम्ही कोणतेही बेकायदेशीर कृत्य केले नसल्याने न्यायदेवतेच्या मंदिरात आम्हाला न्याय मिळेल, असा विश्वास राज्याचे बंदरे व खनिकर्ममंत्री दादा भुसे यांनी व्यक्त केला. राष्ट्रवादीचे अध्यक्ष खा. शरद पवार यांनी त्यांचा उत्तराधिकारी तयार केला नाही, असे म्हणणे चुकीचे ठरेल, असेही ते म्हणाले.

जिल्हाधिकारी कार्यालयात सोमवारी (दि.८) जिल्हा खरीप हंगाम आढावा बैठकीनंतर भुसे यांनी पत्रकारांशी संवाद साधला. आमदार अपात्रेवर आठवडाभरात निकालाची शक्यता असल्याबाबत भुसे यांना विचारले असता, आपला देश घटना व कायद्यावर चालतो. त्यामुळे न्यायालयाचा जो काही निकाल येईल, तो सर्वांना बंधनकारक राहिल, असे भुसे यांनी सांगितले.

शिवसेनेचे मुखपत्र असलेल्या दैनिकाच्या अग्रलेखात खा. पवार यांनी राष्ट्रवादीत नवीन नेतृत्व तयार होेऊ दिले नाही. तसेच उत्तराधिकारी ठरवला नसल्याची टीका करण्यात आल्याबद्दल भुसे यांचे लक्ष वेधण्यात आले. माझ्यासारख्या छोट्या कार्यकर्त्यांने त्यावर बोलणे उचित ठरणार नाही. ज्याने अग्रलेख लिहिला अथवा ज्याच्या सांगण्यावरून तो लिहिला गेला, त्यांनाच विचारा असा टोला भुसे यांनी खा. संजय राऊत यांना लगावला. तसेच खा. पवार यांनी त्यांचा उत्तराधिकारी तयार केला नाही, हे म्हणणे उचित नाही. विधानसभेचे उपाध्यक्ष नरहरी झिरवाळ यांच्यासारखे नेतृत्व पवार यांनी पुढे आणल्याचे भुसे म्हणाले.

आ. कांदे प्रकरणी बोलणे टाळले

उच्च न्यायालयाच्या आदेशानुसार आ. सुहास कांदे यांच्या फिर्यादीवरून पोलिस अधिकाऱ्यावर खंडणीचा गुन्हा दाखल झाल्याबद्दल आपल्याला माहिती नसल्याचे सांगत भुसे यांनी अधिकचे भाष्य करणे टाळले. महाराष्ट्रात ‘केरळा स्टोरी’ चित्रपटाच्या प्रमोशनवरून चित्रपट दिग्दर्शक केदार शिंदे यांनी नाराजी व्यक्त केली. त्याबाबत भुसे यांना विचारले असता प्रेक्षक त्यांच्या आवडीनुसार सिनेमागृहात चित्रपट पाहण्यासाठी जातात, असे उत्तर त्यांनी दिले.

हेही वाचा :

The post न्यायदेवतेच्या मंदिरात आम्हाला न्याय मिळेल : ना. दादा भुसे यांना विश्वास appeared first on पुढारी.