पंचवटीत शासकीय इतमामात अंत्यसंस्कार, तिन्ही दलाचे अधिकारी उपस्थित

जवान हेमंत देवरे pudhari.news

नाशिक (इंदिरानगर): पुढारी वृत्तसेवा

भारतीय सैन्यात पश्चिम बंगालमधील सिलिगुडी येथे वीरमरण आलेले जवान हेमंत यशवंत देवरे (वय ३५) यांच्यावर पंचवटीतील अमरधाममध्ये शासकीय इतमामात बुधवारी (दि. ७) अंत्यसंस्कार करण्यात आले. यावेळी आमदार सीमा हिरे यांच्यासह पोलिस अधिकारी उपस्थित होते.

हेमंत देवरे यांची अंतिम यात्रा नागरे मळा येथील त्यांच्या निवासस्थानापासून सजवलेल्या वाहनातून काढण्यात आली. सकाळी घराजवळ पारंपारिक आर्मी परेडद्वारे मानवंदना देऊन अंत्ययात्रेला प्रारंभ झाला. यावेळी सुभेदार मनोज जुन्नरकर यांच्यासह सेवानिवृत्त सैनिक परिसरातील सर्वच क्षेत्रातील नागरिक उपस्थित होते.

पाथर्डी परिसरातून महामार्गावरून आलेल्या यात्रेवेळी रस्ताच्या दुतर्फा नागरिकांनी गर्दी करत वीरपुत्राचे अंतिम दर्शन घेतले. यावेळी शहीद देवरे अमर रहे, भारत माता की जय जय जयकाराने आसमंत दणाणुन गेला होता. पंचवटी येथे तिन्ही दलाच्या वतीने पुष्पचक्र अर्पण करून श्रद्धांजली अर्पण केली. बिगुलाच्या निनादात बंदुकीच्या फैरी झाडून त्यांना मानवानंदना देण्यात आली.

पोलिस दलात कार्यरत पत्नी वंदना, माजी सैनिक असलेले वडील यशवंत देवरे, आई शीला, बहिणी नीलम आणि रूपाली यांच्यासह नातेवाईक आणि मित्र परिवाराला अश्रू आवरणे मुश्कील झाले होते. तर दुसरीकडे अवघ्या चार वर्षाचा त्यांचा मुलगा वरद आणि सात वर्षांची मुलगी लावण्या यांची कावरी-बावरी नजर उपस्थितांना निःशब्द करत होती. आमदार सीमा हिरे यांच्यासह शेकडो नागरिकांचे डोळेही पाणावले होते. पोलिस दलातील अनेक उच्चपदस्थ अधिकारी यावेळी उपस्थित होते.

हेही वाचा:

The post पंचवटीत शासकीय इतमामात अंत्यसंस्कार, तिन्ही दलाचे अधिकारी उपस्थित appeared first on पुढारी.