नाशिक : पुढारी वृत्तसेवा
लोकसभा निवडणुकीत उत्तर महाराष्ट्रातील महायुती उमेदवारांच्या प्रचारार्थ शेवटच्या टप्प्यात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची जाहीर सभा होणार आहे. सभेची तारीख आणि ठिकाण सध्या निश्चित नसले, तरी याबाबत भाजप गोटातून तयारी सुरू करण्यात आली आहे.
महाराष्ट्रात लोकसभेचा तिसऱ्या टप्प्यातील रणसंग्राम सुरू झाला आहे. आरोप-प्रत्यारोपांच्या फैरींमुळे राजकीय वातावरण तापायला सुरुवात झाली आहे. स्टार प्रचारकांचे दौरे, प्रचारसभा व रोड-शो यांमुळे प्रचारात रंगत भरत आहे. प्रत्येक उमेदवाराला त्याच्या मतदारसंघाच्या निवडणूक प्रचार रिंगणात पक्षाचा स्टार प्रचारक नेत्यांना उतरविण्याची मनीषा आहे. उत्तर महाराष्ट्रातील उमेदवार त्यामध्ये मागे नाहीत.
उत्तर महाराष्ट्रात नंदुरबार, जळगाव, रावेर, नगर व शिर्डी या पाच जागांसाठी दि. १३ मे रोजी मतदान होणार आहे. सध्या सर्वाधिक चर्चेत असलेल्या नाशिकसह दिंडाेरी, धुळे-मालेगाव मतदारसंघाकरिता २० मे रोजी पाचव्या टप्प्यात मतदान घेण्यात येणार आहे. या पार्श्वभूमीवर महायुतीच्या उमेदवारांच्या प्रचारासाठी पंतप्रधान मोदी यांनाच पाचारण करण्याचा प्रयत्न केला जात आहे. त्या दृष्टीने भाजपकडून जाहीर सभेच्या आयोजनासाठी थेट दिल्लीतच संपर्क साधण्यात आल्याची खात्रीलायक माहिती मिळते आहे. मात्र, विभागातील आठही जागांचे मतदान हे चाैथ्या व पाचव्या टप्प्यात विखुरले गेले आहे. त्यामुळे आठही जागांकरिता दि. १२ मेपूर्वी जाहीर सभेचे आयोजन करायचे का? किंवा नाशिक, दिंडाेरी व धुळे-मालेगाव या तीन मतदारसंघांसाठी मोदींची सभा घ्यायची, यावर सध्या खल सुरू आहे. हा तिढा सुटल्यावरच सभेचे मध्यवर्ती ठिकाण, वेळ व तारीख निश्चित केली जाणार असली, तरी पंतप्रधान मोदींची सभा हे जवळपास निश्चित झाली आहे. त्यामुळे महायुतीत त्यातही विशेष करून भाजपमध्ये उत्साहाचे वातावरण आहे.
यापूर्वी मोदींचा तीनदा सभा
२०१४ च्या विधानसभा निवडणुकीत पंतप्रधान मोदी यांनी पंचवटीतील तपाेवनात भर पावसात सभा घेतली होती. त्यावेळी शहरातील तिन्ही जागा भाजपने जिंकल्या होत्या. त्यानंतर २०१९ च्या लोकसभेवेळी उत्तर महाराष्ट्रातील युतीच्या उमेदवारांच्या प्रचारार्थ पिंपळगाव बसवंतला मोदींची सभा पार पडली होती. त्यावेळी आठही जागा महायुतीने काबिज केल्या होत्या. त्यानंतरच्या विधानसभेत नाशिकमध्येच मोदींनी प्रचारामुळे तत्कालीन युतीच्या उमेदवारांना फायदा झाला होता. यंंदाही मोदी प्रचारासाठी येणार असले, तरी पहिल्यासारखा त्यांचा करिष्मा मतदारांवर असणार का, हे निकालानंतरच स्पष्ट होईल.
स्टार प्रचारकांचा राबता असणार
लोकसभेच्या प्रचारासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासह अन्य स्टार प्रचारकही निवडणुकीच्या मैदानात उतरणार आहे. केंद्रीय गृहमंत्री अमित शाह, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, मनसेप्रमुख राज ठाकरे, शरद पवार, उद्धव ठाकरे अशा दिग्गजांच्या सभांचे नियोजन त्या-त्या पक्षांकडून केले जात आहे. त्यामुळे यानिमित्ताने का होईना मतदारांना या नेत्यांना ऐकण्याची संधी मिळणार आहे.
हेही वाचा:
- राज ठाकरे महायुतीच्या प्रचारासाठी लवकरच मैदानात, नाशिकमध्येही घेणार सभा
- Rahul Gandhi Vs PM Modi | ‘केवळ एकच नेता’ ही कल्पनाच भारतीय तरुणांचा अपमान : राहुल गांधी
- कर्जाचा डोंगर करून सतत पैशांची करायची मागणी; पतीने काढला काटा
The post पंतप्रधान नरेंद्र माेदींची तोफ धडाडणार, महायुतीचा प्रचार करणार appeared first on पुढारी.