पालकमंत्र्यांच्या हस्ते उद्घाटन; अभिनेत्री केतकी माटेगावकरची उपस्थिती

नाशिक महापालिका पुष्पोत्सव

नाशिक : पुढारी वृत्तसेवा

एरवी राजकीय आरोप-प्रत्यारोपांच्या गदारोळात हरवलेले नाशिक महापालिकेचे मुख्यालय राजीव गांधी भवन हे शुक्रवार (दि. ९) पासून विविधरंगी फुलांच्या सुवासाने दरवळणार आहे. महापालिकेच्या उद्यान व वृक्षप्राधिकरण विभागाच्या माध्यमातून आयोजित केलेल्या तीनदिवसीय पुष्पोत्सवाचे (flower festival) उद्घाटन शुक्रवारी दुपारी ४ वाजता पालकमंत्री दादा भुसे यांच्या हस्ते होत आहे. सिनेअभिनेत्री व गायिका केतकी माटेगावकर यांची यावेळी विशेष उपस्थिती राहणार असल्याची माहिती अतिरिक्त आयुक्त (शहर) प्रदीप चौधरी व उद्यान अधीक्षक विवेक भदाणे यांनी पत्रकार परिषदेत दिली.

पुष्पोत्सवानिमित्त मुख्यालयाच्या प्रवेशद्वारावर फुलांची आकर्षक कमान उभारण्यात येत असून, सेल्फीप्रेमींसाठी प्रांगणात सेल्फी पॉइंटदेखील असणार आहे. प्रदर्शनाचे मुख्य आकर्षण मिनिएचर लॅन्डस्केपिंग, कार्यालयाच्या तीनही मजल्यांवर विविध गटांची मांडणी असणार आहे. विविध गटांमध्ये गुलाबपुष्पे, मोसमी फुले, फळे, भाजीपाला, हार, बुके, पुष्परचना, बोन्साय, कॅक्टस, शोभिवंत कुंड्या ठेवल्या जाणार आहेत. उद्घाटन सत्रातच मानांकनाच्या ट्रॉफीजचे वितरण होईल. त्यानंतर पुढील दोन दिवस दि. १० ते ११ फेब्रुवारी रोजी सकाळी ९ ते रात्री ९ या वेळेत हे पुष्पप्रदर्शन नागरिकांना पाहण्यासाठी विनामूल्य खुले असणार आहे. पुष्पोत्सवानिमित्त विविध सांस्कृतिक कार्यक्रमांची मेजवानीदेखील असणार आहे. शुक्रवारी (दि. ९) स्वरसंगीत, शनिवारी (दि. १०) सकाळच्या सत्रात निसर्ग व फुलांवर आधारित कविता सत्र आणि सायंकाळी संगीतसंध्या तसेच रविवारी (दि. ११) समारोपाच्या दिवशी संगीत रजनी हा कार्यक्रम होणार असून विजेत्यांना ट्रॉफीजचे वितरण सिनेअभिनेता किरण गायकवाड व अभिनेत्री शिवानी बावकर यांच्या हस्ते होईल. (flower festival)

१७९७ प्रवेशिका प्राप्त 
पुष्पोत्सवात (flower festival) विविध गटांमध्ये गुलाबपुष्पे, मोसमी फुले, फळे, भाजीपाला, हार, बुके, पुष्परचना, बोन्साय, कॅक्टस, शोभिवंत कुंड्या स्पर्धा आयोजित करण्यात आली आहे. यात सहभागी होण्यासाठी विविध गटांत स्पर्धकांमार्फत विक्रमी १७९७ प्रवेशिका प्राप्त झाल्या असून, ४२ नर्सरी स्टॉल व २० फूड स्टॉलची नोंदणीदेखील पूर्ण झाली आहे.

आज सायकल रॅली
पुष्पोत्सवानिमित्त (flower festival) नाशिककरांना पर्यावरणाचा संदेश देण्यासाठी शुक्रवारी (दि. ९) सकाळी ६.३० वाजता गणेशवाडी फुलबाजार येथून गुलाब फुले घेऊन सायकल रॅलीचे आयोजन करण्यात आले आहे. या रॅलीद्वारे गुलाब पुष्प मुख्यालयात आणले जाणार आहेत. पुष्प स्पर्धेव्यतिरिक्त नागरिकांकडून निसर्गावर आधारित पेंटिंग, फुलांची माहिती देणारे छायाचित्र तसेच खुशाल मच्छिंद्र जाधव व शीतल सीताराम थेटे (गोडसे) यांच्याद्वारे शिल्पकला व काव्यात्मक रचनेच्या माध्यमातून स्त्रियांच्या आयुष्यातील सामाजिक व भावनिक विषय मांडणारी कलाकृती सादर केली जाणार आहे.

असा असणार पुष्पोत्सव (flower festival)
* पहिला मजला : गुलाबपुष्पे, पुष्परचना, शुष्क-काष्ट
* दुसरा मजला : मोसमी बहुवर्षीय फुले, झुलती परडी, बोन्साय, कॅक्टस
* तिसरा मजला : फळे, भाजीपाला, तबक उद्यान, पुष्प रांगोळी
* मुख्य प्रवेशद्वाराजवळ : मिनिएचर गार्डन, कुंड्यांची शोभिवंत रचना
* राजीव गांधी भवनाच्या प्रांगणात मुख्य स्टेज, नर्सरी व फूड स्टॉल्स

The post पालकमंत्र्यांच्या हस्ते उद्घाटन; अभिनेत्री केतकी माटेगावकरची उपस्थिती appeared first on पुढारी.