प्रस्थापितांचाच बोलबाला!

bajar samiti www.pudhari.news

नाशिक : वैभव कातकाडे

निमित्त

जिल्ह्यातील बाजार समितीच्या निवडणुकांच्या लागलेल्या निकालांमध्ये बहुतांश ठिकाणी राष्ट्रवादी, काँग्रेस आणि ठाकरे गट शिवसेनेचे वर्चस्व दिसून येत आहे. भुजबळांनी त्यांचे बळ कायम राखले, तर विद्यमान पालकमंत्र्यांना त्यांच्या मतदारसंघात पराभव पत्करावा लागला. भाजप-शिंदे गटाने काही ठिकाणी चांगली लढत दिली. या निवडणुकीत मनसे अलिप्तच दिसून आली, तर प्रहारने जिल्ह्यात खाते उघडले. विधानसभेची रंगीत तालीम म्हणून या निवडणुकांना महत्त्व देण्यात आले असले, तरी प्रत्यक्ष निवडणुकीत हेच चित्र कायम राखण्यासाठी आघाडीला अजून बरेच प्रयत्न करावे लागणार आहेत.

नाशिक बाजार समितीमध्ये प्रचाराच्या पहिल्याच दिवशी आमदार खोसकर- चुंभळे यांच्यामुळे या बाजार समितीच्या निवडणुकीला रंगत आली होती. त्यामुळे माजी खासदार देवीदास पिंगळे व माजी सभापती शिवाजी चुंभळे यांची प्रतिष्ठा पणाला लागली होती. चुंभळे गटाला भाजप नेते दिनकर पाटील यांनी सक्रिय मदत केली होती. तसेच या निवडणुकीत गोकुळ पिंगळे यांनीही अपक्ष लढत देत आव्हान उभे केले होते. देवीदास पिंगळे, संपतराव सकाळे, विनायक माळेकर, जगन्नाथ कटाळे, सविता तुंगार, भास्कर गावित यांच्यासह अन्य सहा संचालक निवडून येत देवीदास पिंगळे गटाने वर्चस्व राखले आहे, तर प्रतिस्पर्धी पॅनलचे शिवाजी चुंभळे, तानाजी करंजकर, कल्पना चुंभळे, प्रल्हाद काकड हे निवडून आले आहेत. माजी पालकमंत्री छगन भुजबळ हे येवला व लासलगाव बाजार समितीच्या आखाड्यात उतरले होते. त्यासाठी त्यांनी घेतलेल्या प्रचारसभाही गाजल्या होत्या. प्रचारात त्यांनी आमदार दराडे बंधू यांच्यावर टीकेची झोड उठविली होती. येवला बाजार समितीमध्ये त्यांनी दिलेले उमेदवार निवडून येत दराडे बंधूंच्या गटाला पराभव स्वीकारावा लागला आहे. तसेच भुजबळ यांनी लासलगाव बाजार समितीमध्येही माजी सभापती जयदत्त होळकर, बाळासाहेब क्षीरसागर यांच्या गटाला पाठिंबा दिला होता. मात्र, या ठिकाणी माजी जिल्हा परिषद अध्यक्ष पंढरीनाथ थोरे, ज्ञानेश्वर जगताप यांच्या गटाने धूळ चारली आहे. या ठिकाणी थोरे गटाला 9, तर होळकर गटाला 8 जागा मिळाल्या आहेत. मालेगाव बाजार समितीच्या प्रचारात विद्यमान पालकमंत्री दादा भुसे आणि उद्धव ठाकरे गटाचे अद्वय हिरे यांच्यातील लढत प्रतिष्ठेची झाली होती. या ठिकाणी पालकमंत्री दादा भुसे यांना पराभवाचा धक्का बसला असून, मालेगावमधील मतदारांनी दादा भुसे यांना नाकारल्याचे या निवडणुकीमधून समोर आले आहे. दिंडोरी बाजार समितीच्या निवडणुकीच्या प्रचारासाठी विधानसभेचे उपाध्यक्ष नरहरी झिरवाळ आणि राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते श्रीराम शेटे यांचे फोटो दोन्ही गटांच्या पॅनलच्या पोस्टरवर झळकत होते. दोघांनीही अलिप्त राहात दोन्ही गटांना आपल्या शुभेच्छा दिल्या होत्या. या निवडणुकीत माजी सभापती दत्तात्रेय पाटील यांना 26 वर्षांनी पराभव पत्करावा लागला. माजी आमदार रामदास चारोस्कर, गणपतराव पाटील, प्रकाश शिंदे आणि योगेश बर्डे यांनी लढत देत ही विजयश्री खेचून आणली.

कळवणमध्ये राष्ट्रवादीचे आमदार नितीन पवार व माजी आमदार जे. पी. गावित या दोघांच्या पॅनलमध्येच लढत झाली. आ. पवार यांच्यासह धनंजय पवार, जि. प.च्या माजी अध्यक्षा जयश्री पवार यांनी सक्रिय सहभाग घेत जे. पी. गावित यांच्या गटाचा धुव्वा उडवत विजयाची हॅट्ट्रिक साजरी केली. धनंजय पवार यांनी मविप्र संचालक रवींद्र देवरे यांचा पराभव करत मविप्र संचालक निवडणुकीच्या पराभवाची परतफेड केली. चांदवडमध्ये माजी आमदार अ‍ॅड. शिरीषकुमार कोतवाल व त्यांचे पूर्वाश्रमीचे शिष्य म्हणून ओळख असलेले भाजप नेते डॉ. आत्माराम कुंभार्डे यांच्या पॅनलमध्ये कोण बाजी मारणार, याकडे लक्ष लागले होते. कोतवाल यांच्या गटाने या ठिकाणी बाजी मारली आहे. या निवडणुकीमध्ये भाजपचे आमदार डॉ. आहेर, डॉ. कुंभार्डे यांना धक्का बसला असून, अपक्ष उमेदवार प्रहारचे जिल्हा उपाध्यक्ष गणेश निंबाळकर निवडून आले आहेत. देवळ्यात भाजपचे जिल्हाप्रमुख केदा आहेर यांनी स्पष्ट बहुमत मिळवत वर्चस्व टिकविले आहे. ग्रामपंचायत सोसायटी या जागा बिनविरोध झाल्या असल्या, तरी 10 जागांसाठी मतदान झाले होते. त्यात वर्चस्व राखत केदा आहेर यांच्या गटाने सत्ता मिळविली आहे.

सिन्नरला टोकाचे आरोप-प्रत्यारोप
सिन्नर बाजार समितीमध्ये विद्यमान आमदार अ‍ॅड. माणिकराव कोकाटेंविरुद्ध माजी आमदार राजाभाऊ वाजे व युवानेते उदय सांगळे यांच्यात काँटे की टक्कर झाली. टोकाच्या आरोप-प्रत्यारोपांनी ही निवडणूक रंगली होती. मतदारांनी दोघांनाही स्पष्ट बहुमत न देता 9-9 अशी समान वाटणी केल्याने आगामी निवडणुकांसाठी सिन्नर मतदारसंघ किती अवघड असेल, याची प्रचिती या निकालावरून आली आहे. या ठिकाणी भाजप-मनसे या युतीला भोपळादेखील फोडता आला नसल्याचे चित्र आहे.

अनिल कदम यांचे स्वप्न भंगले
पिंपळगाव बसवंत बाजार समितीमध्ये यंदा माजी आमदार अनिल कदम, पिंपळगाव (ब) सरपंच भास्करराव बनकर, युवानेते गोकुळ गिते तसेच नव्याने भाजपमध्ये दाखल झालेल्या अमृता पवार यांनी आ. दिलीप बनकर यांच्यासमोर कडवे आव्हान उभे केले होते. मात्र, बनकर यांनी वर्चस्व स्थापन करण्यात यश मिळविले. 18 पैकी 11 जागांवर विजय संपादन केल्याने माजी आमदार अनिल कदम यांचे सत्तेचे स्वप्न भंगले आहे. स्वत: अनिल कदम, गोकुळ गिते आणि अमृता पवार हे कदम गटातून विजयी झाले आहेत, तर अपक्ष उमेदवार यतीन कदम यांनी या निवडणुकीत 288 मते मिळवून विजय संपादन केल्याने त्यांच्या विजयाची जोरदार चर्चा होती.

The post प्रस्थापितांचाच बोलबाला! appeared first on पुढारी.