खेळातून मिळतेय दैनंदिन कामकाजासाठी ऊर्जा

नयना गुंडे www.pudhari.news

नाशिक :

ब्रेक टाइम : नयना गुंडे

प्रशासकीय अधिकारी म्हटला की, दैनंदिन कामकाजासह बैठकांचा व्याप आलाच. त्यातूनही वेळात वेळ काढून प्रत्येक अधिकाऱ्यांनी कुठल्या ना कुठल्या खेळात रमले पाहिजे. कारण खेळामुळे सदृढ आरोग्य लाभते आणि त्यातूनच दैनंदिन कामकाज करण्यासाठी नव्याने ऊर्जा मिळते. तसेच ख‌ेळामुळेच उत्तम फिटनेस राहत असल्याचे आदिवासी विकास विभागाच्या आयुक्त नयना गुंडे म्हणतात.
सन २००६ पासून नियमित टेबल टेनिस आणि बॅडमिंटन खेळतात. आदिवासी विकास विभागाचा डोलारा संभाळतानाही नासिक जिमखाना येथे दररोज सकाळी एक तास टेबल टेनिसचा नियमित सराव करतात. यापूर्वी महसूल विभागात कार्यरत असताना राज्यस्तरीय स्पर्धा गाजवत घवघवीत यश मिळविले आहे. बॅडमिंटन, टेबल टेनिस आणि कॅरम या क्रीडा प्रकाराचे विजेतेपदही पटकविले आहे. तर राष्ट्रीय स्तरावर झालेल्या बॅडमिंटन स्पर्धेसाठी महाराष्ट्राचे प्रतिनिधित्व करण्याची संधी मिळाल्याचे गुंडे यांनी सांगितले.

प्रशासकीय कामकाजाची जबाबदारी पार पाडतानाच खेळाकडे विशेष लक्ष दिले जाते. बॅडमिंटन, टेबल टेनिससह इतर क्रीडा स्पर्धेचे सामने बघण्यात त्यांना विशेष रस आहे. पर्यटनस्थळांना भेट देऊन त्या ठिकाणांची भौगोलिक, ऐतिहासिक, पौराणिक तसेच इतर माहिती संकलित करण्यावरही भर दिला जातो. नाशिक जिल्ह्याला निसर्गाचे कोंदण लाभले असून, या ठिकाणी ट्रेकिंगला मोठी संधी आहे. शहरालगत छोटे-मोठ डोंगर आहेत. त्या ठिकाणीही वेळच्या उपलब्धतेनुसार ट्रेकिंगला जातात. कधी कुटुंबासोबत चित्रपट बघण्यासाठी जात असल्याचे गुंडे यांनी सांगितले.

ताण-तणाव दूर होतात
प्रशासकीय कामकाज म्हटले की, ताण-तणाव येतोच. दिवसभर चालणाऱ्या बैठका, माहितीचे संकलन आणि वरिष्ठांपुढे सादरीकरण यामुळे प्रचंड थकवा येतो. या परिस्थितीतही बौद्धिक क्षमतेला चालना देण्याचे काम क्रीडा प्रकार देत असतो. दैनंदिन कामकाजामुळे येणारा थकवा दूर होण्यास खेळामुळे मदत होत असल्याचे आदिवासी विकास विभागाच्या आयुक्त नयना गुंडे यांनी सांगितले.

शब्दांकन : नितीन रणशूर

The post खेळातून मिळतेय दैनंदिन कामकाजासाठी ऊर्जा appeared first on पुढारी.