नाशिककरांनो खबरदार ! थर्डी फर्स्टला विनापरवाना मद्यसेवन कराल तर…

दारुपार्टी थर्टीफस्ट,www.pudhari.news

नाशिक : पुढारी वृत्तसेवा

सार्वजनिक मद्यपान करणे हा दखलपात्र गुन्हा आहे. महाराष्ट्रात परमिट रूम, रेस्टॉरंट, क्लब इ. ठिकाणी दारू पिण्यासाठी आणि विकत घेण्यासाठी राज्य उत्पादन शुल्क खात्याचा परवाना घेण्याची गरज असते.  यासाठीची वयोमर्यादा ही 21 वर्षे आहे. हा परवाना 1 दिवस, 1 वर्ष किंवा आजीवन मिळू शकतो. महाराष्ट्रात मद्यउत्पादन, मद्यविक्री आणि मद्यसेवन यासाठी बॉम्बे प्रोहिबिशन अॅक्ट लागू आहे. या कायद्याची अंमलबजावणी महाराष्ट्र राज्य उत्पादन शुल्क विभागाकडून केली जाते. सार्वजनिक ठिकाणी अशा परिस्थिती संबंधित व्यक्तीस अटक करून न्यायालयासमोर हजर केले जाते. त्या व्यक्तीस शिक्षा किंवा जामीन देण्याचा निर्णय न्यायाधीश घेतात

यंदाच्या थर्टी फर्स्टला (दि.३१) शहरात मद्यविक्री आणि परमिट रूम पहाटे ५ वाजेपर्यंत सुरू ठेवण्याचा निर्णय राज्य उत्पादन शुल्क विभागाने घेतला आहे. त्यापार्श्वभूमीवर राज्य उत्पादन शुल्क विभागाकडून तळीरामांसाठी मद्यसेवन परवाने वितरित केले जात आहेत. एकदिवसीय परवाने मद्यविक्रीच्या ठिकाणी उपलब्ध होत आहेत. मद्यसेवन परवाना नसल्यास मद्यपींवर कायदेशीर कारवाई होणार आहे. त्यानुसार, राज्य उत्पादन शुल्क विभागाकडून येत्या 31 डिसेंबरच्या पार्श्‍वभूमीवर आतापर्यंत सात लाख परवान्यांचे वितरण करण्यात आले असून यामध्ये मद्यपींसह किरकोळ विक्रेत्यांनाही त्यांच्या मागणीनुसार हे परवाने देण्यात आले असल्याची माहिती विभागाने दिली आहे. यामध्ये देशी दारूसाठी पाच लाख २० हजार तर, विदेशी मद्यासाठीचे दोन लाख २० हजार असे एकूण सात लाख ४० हजार परवाने आहेत.

त्याचप्रमाणे परराज्यातून होणारी अवैध मद्यवाहतूक रोखण्यासाठी त्र्यंबकेश्‍वर, अंबोली, हरसूल, राजबारी (पेठ), बोरगाव (सुरगाणा) या ठिकाणी 24 तास नाकाबंदी करण्यात आली आहे. त्यासाठी विशेष पथकांची नियुक्ती करण्यात आली असून, अवैधमद्याचे स्पॉटसह असे मद्य बनविणाऱ्यांवर कारवाई केली जात आहे.

गस्ती पथकाद्वारे मद्यपींवर नजर

शहरात २९ डिसेंबरपासून बंदोबस्त तैनात करण्यात येणार आहे. रात्री आठपासून पोलिस ठाण्यांच्या हद्दीत नाकाबंदी करून तपासणी करण्यात येईल. मद्यपी चालक, टवाळखोर व हुल्लडबाजी करणाऱ्यांवर कायदेशीर कारवाई करण्याचा इशारा पोलिसांनी दिला आहे. यासह आयुक्तालयाच्या हद्दीतील सर्व आस्थापना, व्यवस्थापन, मॉल्स, दुकाने, उपाहारगृहांमध्ये वेळेची मर्यादा पालन करण्याच्या सूचना देण्यात आल्या असून, नियमांचे उल्लंघन केल्यास कारवाईचा इशारा दिला आहे. पोलिस ठाणेनिहाय नाकाबंदी राहणार असून, वाहतूक शाखेचे पोलिसही तैनात असतील. मद्यपी चालकांची जिल्हा रुग्णालयात वैद्यकीय तपासणी केली जाणार आहे. वाहनांचे हॉर्न, सायलेन्सर तपासणी केली जाईल. पार्ट्यांचे आयोजन करणाऱ्यांवरही पोलिस करडी नजर ठेवणार असून हॉटेल बाहेर, फिरते गस्ती पथकाद्वारे मद्यपींवर नजर ठेवण्यात येणार आहे.

सर्वत्र नाकाबंदीसह तपासणी

– २ उपआयुक्त, ७ सहायक आयुक्तांसह सर्व पोलिस अधिकारी-कर्मचारी

– १३ पोलिस ठाण्यांचा बंदोबस्त

– २ राज्य राखीव दलाच्या तुकड्या

– २५० पुरुष होमगार्ड, ५० महिला

हेही वाचा :

The post नाशिककरांनो खबरदार ! थर्डी फर्स्टला विनापरवाना मद्यसेवन कराल तर... appeared first on पुढारी.