नाशिक : अखेर कालिदासच्या भाडेकपातीचा प्रस्ताव महासभेवर जाणार

महाकवी कालिदास कलामंदिर नाट्यगृह www.pudhari.news

नाशिक : पुढारी वृत्तसेवा
महाकवी कालिदास कलामंदिर नाट्यगृहात मुंबई-पुण्याच्या तुलनेने अधिक भाडे असल्याने ज्येष्ठ अभिनेते प्रशांत दामले तसेच नाट्य परिषदेच्या वतीने उद्योगमंत्री उदय सामंत यांच्या माध्यमातून सांस्कृतिक मंत्री सुधीर मुनगुंटीवार यांच्याकडे कालिदासच्या भाड्यात सवलत मिळावी, अशी मागणी करण्यात आली होती. त्यानंतर मंत्री मुनगुंटीवार यांनी निर्देश दिल्यानंतर नाशिक मनपाने कालिदासच्या भाड्यात 25 टक्के सवलत देण्याचा प्रस्ताव महापालिका प्रशासन महासभेवर पाठवणार आहे.

लॉकडाऊनच्या काळात गर्दी असणार्‍या कार्यक्रमांवर बंदी घालण्यात आली होती. त्यानंतर सोशल डिस्टन्सिंग पाळून कार्यक्रमांना परवानगी देण्यात आली पण नाट्यगृह बंदच राहिली. ऑक्टोबर 2020 मध्ये 50 टक्के प्रेक्षक क्षमता ठेवून नाट्यगृह सुरू करण्यात आले तरी कोविड गेल्यानंतर नाट्यगृहांना घरघर लागली. त्यानंतर स्थायी समिती अध्यक्ष गणेश गिते यांच्याकडे शहरातील नाट्यप्रेमी, संस्थांनी नाट्यगृहांचे भाडे कमी करण्याची मागणी केली होती. त्यानुसार वर्षभरासाठी 50 टक्के भाड्यात सवलत देण्यात आली होती. 1 जुलै 2022 नंतर पूर्ण भाडे आकारणी सुरू झाल्यानंतर नाट्यसृष्टी पूर्णपणे उभी न राहिल्याचे मत ज्येष्ठ अभिनेते प्रशांत दामले यांनी मुनगुंटीवार यांच्याकडे मांडले होते. त्यानंतर मनपा डॉ. चंद्रकांत पुलकुंडवार यांच्याशी चर्चा करून 50 टक्के सवलतीची मागणी केली होती. परंतु ते आर्थिकद़ृष्ट्या परवडत नसल्याने 25 टक्के सवलत देण्याचा निर्णय मनपाने घेतला आहे, असा प्रस्ताव मिळकत विभागाने पाठवला आहे. 31 डिसेंबर 2023 पर्यंत या सात महिन्यांत ही सवलत केवळ हौशी व प्रायोगिक नाटकांकरिता राहणार आहे. तरी 50 टक्के सवलत न दिल्याने नाट्यकर्मींनी नाराजी व्यक्त केली आहे.

व्यावसायिक नाटक…
11,080 – सकाळी 9 ते दुपारी 3,  14,260 – दुपारी 3 ते रात्री 8,  16,520 – रात्री 9 ते रात्री 12.30
प्रायोगिक नाटक…
5,369 – सकाळी 9 ते दुपारी 3,  7,140 – सकाळी 9 ते दुपारी 3,  9500 – सकाळी 9 ते दुपारी 3
इतर कार्यक्रमांसाठी…
23,000 – सकाळी 9 ते दुपारी 3,  27,200 – सकाळी 9 ते दुपारी 3,  31,000 – सकाळी 9 ते दुपारी 3
शनिवार, रविवार असेल तर 2500 रुपये अधिक शुल्क मोजावे लागते.

हेही वाचा:

The post नाशिक : अखेर कालिदासच्या भाडेकपातीचा प्रस्ताव महासभेवर जाणार appeared first on पुढारी.