फ्लॅशबॅक २०१९ : मोदी लाटेवर स्वार होत इतिहासाची पुनरावृत्ती!

2019

२०१९च्या लोकसभा निवडणुकीत नाशिक मतदारसंघातून ४८ वर्षांपूर्वी घडलेल्या इतिहासाची पुनरावृत्ती नाशिककरांनी अनुभवली. नाशिकमध्ये खासदार ‘रिपीट’ होत नाही, ही अंधश्रध्दा खोटी ठरवत शिवसेना-भाजप महायुतीचे उमेदवार हेमंत गोडसे यांनी एेतिहासिक विजय मिळवला होता. काँग्रेसचे भानुदास कवडे यांच्यानंतर सलग दुसऱ्यांदा निवडून येणारे गोडसे हे नाशिकचे दुसरे खासदार ठरले. देशभरातील मोदी लाट, मतदारांचे लक्ष वेधून घेण्यात राष्ट्रवादीचे समीर भुजबळ यांना आलेले अपयश, पवन पवार यांच्या रुपाने वंचित बहुजन आघाडीने दलित, मुस्लिम मतांना लावलेल्या सुरूंग, त्यातून उद‌्भवलेली जातीय समीकरणे आणि मराठा मतांचे ध्रुवीकरण करण्यात भाजपचे बंडखोर अपक्ष उमेदवार अॅड. माणिकराव कोकाटे यांचा फसलेला प्रयत्न गोडसेंच्या मतांचा टक्का वाढविणारा ठरला होता.

२०१४च्या निवडणुकीत राष्ट्रवादीचे हेविवेट नेते छगन भुजबळ यांचा १.८७ लाख मतांच्या फरकाने पराभव करणाऱ्या गोडसे यांनी २०१९च्या निवडणुकीत समीर भुजबळ यांचा तब्बल २ लाख ९२ हजार २०४ मतांनी पराभव करीत २००९च्या निवडणुकीत झालेल्या पराभवाचा वचपा काढला होता. कथित अपसंपदेच्या आरोपांमुळे कारागृहात मुक्काम करावा लागलेल्या छगन भुजबळ यांच्याबाबत जनमानसात जी भावना होती ती आपल्याबाबत नाही हे निवडणूक पूर्व सर्वेक्षणातून उघड झाल्यानंतरही समीर भुजबळ यांनी निवडणूक लढविण्याचा कायम ठेवलेला अट्टहास या निवडणुकीत राष्ट्रवादीला पराभवाच्या दाढेत नेणारा ठरला होता. भुजबळ यांना या निवडणुकीत जेमतेम २ लाख ७१ हजार ३९५ मतं मिळू शकली. त्यातच कधीकाळी भुजबळांचे निकटवर्तीय मानल्या जाणाऱ्या पवान पवार यांना वंचित बहुजन आघाडीने दिलेली उमेदवारी महाआघाडीचा ‘मतगठ्ठा’ म्हणून ओळखल्या जाणाऱ्या दलित-मुस्लिम मतांना सुरूंग लावणारी ठरली.

भुजबळांच्या पारड्यात पडू शकणारी पण मतविभाजनामुळे पवार यांना मिळालेली १ लाख ९,९८१ मते गोडसेंचा विजय अधिक प्रभावी करणारी ठरली. सिन्नरकरांमध्ये अस्मिता जागवत निवडणूक जिंकण्याचा भाजपचे बंडखोर अपक्ष उमेदवार अॅड. माणिकराव कोकाटे यांचा प्रयत्न नाशिककरांना भावला नाही. कोकाटेंमुळे मराठा मतांची विभागणी होऊन त्याचा फायदा भुजबळांना होईल, हा धोका वेळीच ओळखत मराठा समाज एकजुटीने गोडसेंच्या पाठीशी उभा राहिल्याने कोकाटेंचा भ्रमनिरास झाला. अवघ्या १ लाख ३४ हजार ५२७ मतांवर त्यांना समाधान मानावे लागले होते.

विधानसभा मतदारसंघनिहाय स्थिती

* पश्चिम विधानसभा मतदारसंघातून गोडसेंना सर्वाधिक १ लाख ४४ हजार १४४ मतं मिळाली होती. दुसऱ्या क्रमांकावरील भुजबळ या मतदारसंघातून एक तृतीयांश मतं देखील मिळवू शकले नव्हते.

* देवळाली विधानसभा मतदारसंघातील शिवसेनेच्या नेत्यांमधील बेदीली मतांमध्ये परावर्तित करण्यात समीर भुजबळ यांना यश मिळू शकले नाही. होमग्राऊंडचा गोडसेंना फायदा झाला.

* इगतपुरी विधानसभा मतदारसंघात तत्कालिन आमदार निर्मला गावित यांच्याकडील फौजफाट्याचा मताधिक्क्यासाठी वापर करण्यात भुजबळ अपयशी ठरले. आदिवासी समाजाचे प्राबल्य, मराठा समाजाचे निर्णायक मतदानआणि दलित समाजची विखुरलेली संख्या गोडसेंच्या पथ्यावर पडली.

* नाशिक मध्य विधानसभा मतदारसंघातून शिवसेना-भाजपपेक्षा राष्ट्रवादीला मोठी संधी होती. परंतू या मतदारसंघातील मतदारांना गृहीत धरण्याची घोडचूक राष्ट्रवादीच्या नेत्यांनी केली. काँग्रेसच्या स्थानिक नेत्यांची साथ भुजबळांना मिळाली नाही. मतदारसंघातील पश्चिम भागातील मध्यमवर्गीय, उच्चभ्रू मतदारांकडे कानाडोळा करण्याचा प्रयत्न राष्ट्रवादीला नडला.

* गुजराथी, ब्राम्हण, समाजाबरोबरच मराठा समाजाची एकगठ्ठा मते पश्चिम पाठोपाठ नाशिक पूर्व मतदारसंघातही गोडसेंचे मताधिक्क्य वाढविणारी ठरली होती.

* सिन्नर मतदारसंघातून सिन्नर करांची अस्मिता जागृत करण्याचा प्रयन अपक्षउमेदवार अॅड. कोकाटे यांनी केल. परंतू या मतदारसंघातून दीड ते पावणेदोन लाखांचे मताधिक्क्य घेण्याचे त्यांचे स्वप्न पूर्ण होऊ शकले नव्हते.

 हेही वाचा –

The post फ्लॅशबॅक २०१९ : मोदी लाटेवर स्वार होत इतिहासाची पुनरावृत्ती! appeared first on पुढारी.