दिग्गज नेते असूनही उमेदवारीबाबत राष्ट्रवादी कॉंग्रेसची शक्यता धूसर

छगन भुजबळ , नरहरी झिरवाळ www.pudhari.news

नाशिक : पुढारी वृत्तसेवा- जिल्ह्यातील सहा विधानसभा मतदारसंघांचे प्रतिनिधित्व करणाऱ्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला लोकसभेसाठी जागेची शक्यता धूसर झाल्याचे चित्र समोर आले आहे. महायुतीमधील प्रमुख पक्ष म्हणून असलेल्या राष्ट्रवादीला सध्यातरी मित्रपक्षांसाठीच आपली यंत्रणा कामाला लावावी लागणार आहे. जिल्हाप्रमुखांनी वेळोवेळी पक्षाच्या वरिष्ठांकडे लोकसभेची जागा पक्षाला सुटावी म्हणून प्रयत्न केले. मात्र वरिष्ठ पातळीवरील बैठकांमधून तूर्तास तरी राष्ट्रवादीकडे जागा जाण्याची कोणतीच शक्यता वाटत नाही.

लोकसभा निवडणुकीसाठी जिल्ह्यातील दोन मतदारसंघांपैकी दिंडोरीसाठी भाजपने केंद्रीय राज्यमंत्री डॉ. भारती पवार यांची उमेदवारी जाहीर केली. ते वगळता जिल्ह्यात महायुती असो, महाविकास आघाडी असो, कोणीही अद्याप उमेदवारी जाहीर न करता वेट अँड वॉचचे धोरण घेतलेले आहे. सध्या नाशिकची जागा महायुतीमध्ये शिंदे गटाकडे आहे. मात्र, या जागेवर भाजप आणि राष्ट्रवादीने आपला दावा दाखल केला होता. दिंडोरीची जागा भाजपने डॉ. पवारांना उमेदवारी जाहीर केली. त्यामुळे भाजपचा नाशिकबाबतचा दावा कमी झालेला आहे. मात्र आता महायुतीमध्ये मनसेने प्रवेश केला आणि नाशिकची जागा मागितल्याच्या चर्चा समोर आल्याने पुन्हा या जागेबाबत खलबते सुरू झाली आहेत.

जिल्ह्यातील दोन लोकसभा मतदारसंघांपैकी नाशिकमध्ये सहापैकी दोन, तर दिंडोरीमध्ये सहापैकी तब्बल चार आमदार हे राष्ट्रवादी काँग्रेसचे आहेत. नाशिकमधील काँग्रेसचे एकमेव आमदार हिरामण खोसकर यांनी वेळोवेळी आपण राष्ट्रवादीचेच असल्याचे बोलून दाखवले असल्याने त्यांची गिणती राष्ट्रवादीच्याच आमदारांंमध्ये होत असते.

दिग्गज नेते असूनही उमेदवारी नाही

जिल्ह्यात राष्ट्रवादीचे वरिष्ठ नेते माजी उपमुख्यमंत्री छगन भुजबळ, सध्याचे विधानसभा उपाध्यक्ष नरहरी झिरवाळ यांच्यासारखे दिग्गज नेते असूनही जिल्ह्यात राष्ट्रवादीला जागा मिळण्याची शक्यता धूसर असल्याने राष्ट्रवादीचे पदाधिकारी, कार्यकर्ते यांना मित्रपक्षाचे उमेदवार निवडून देण्यास मदत करावी लागणार आहे.

हेही वाचा :

The post दिग्गज नेते असूनही उमेदवारीबाबत राष्ट्रवादी कॉंग्रेसची शक्यता धूसर appeared first on पुढारी.