बंडखोर इच्छुकांना गळाला लावण्याचा वंचितचा प्रयत्न

राजकीय पक्षा pudhari.news

नाशिक :पुढारी वृत्तसेवा
नाशिक मतदारसंघात सुरुवातीपासूनच अनपेक्षित घडामोडी घडत असल्याने, या मतदारसंघातील पुढील चित्र अजूनही अस्पष्टच आहे. महाविकास आघाडीने ऐनवेळी उमेदवार बदलून उमेदवारीची माळ दुसऱ्याच्याच गळ्यात टाकल्याने मविआत काहीसे तणावाचे वातावरण आहे. तर दुसरीकडे महायुतीचा उमेदवार ठरता ठरत नसल्याने, मतदारसंघातील गोंधळ कायम आहे. या सर्व परिस्थितीवर ‘वंचित’ डोळा ठेवून असून, बंडखोरीच्या तयारीत असलेल्या इच्छुकांना गळाला लावण्याचा प्रयत्न वंचितचा आहे.

महाविकास आघाडीसोबतची बोलणी फिसकटल्यानंतर वंचितचे नेते ॲड. प्रकाश आंबेडकर यांनी स्वतंत्र उमेदवार देण्यास सुरुवात केली आहे. विदर्भात सात उमेदवार घोषित केल्यानंतर, मंगळवारी त्यांनी आणखी पाच उमेदवारांच्या नावांची घोषणा केली आहे. यामध्ये सर्वाधिक पुणे लोकसभा मतदारसंघातून वसंत मोरे यांचे नाव चर्चिले जात आहे. ॲड. प्रकाश आंबेडकर यांनी मविआसोबत फिसकटल्यानंतर दलित, मराठा उमेदवार देण्याबाबतची घोषणा केली होती. त्यानुसार त्यांनी पुण्यात मराठा चेहरा म्हणून वसंत मोरे यांच्या नावाची घोषणा केली आहेे. हाच प्रयोग नाशिक लोकसभा मतदारसंघातदेखील केला जाण्याची शक्यता आहे. त्यामुळे आतापर्यंत वंचितकडून अनेक मराठा उमेदवारांची नावे चर्चेत आली आहेत. त्यामध्ये विद्यमान खासदार हेमंत गोडसे यांचे नावदेखील पुढे आल्याने, अनेकांच्या भुवया उंचावल्या आहेत. महायुतीकडून राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे मंत्री छगन भुजबळ यांचे नाव उमेदवारीसाठी आघाडीवर असल्याने, शिवसेना शिंदे गटाचे विद्यमान खासदार हेमंत गोडसे यांची उमेदवारी धोक्यात आली आहे. परंतु जोपर्यंत नावाची घोषणा होत नाही, तोपर्यंत ते नाशिकच्या जागेवर दावा ठोकून आहेत. दुसरीकडे पत्ता कट केल्यास, पर्याय म्हणून वंचितच्या तिकिटावर लढण्याची त्यांची तयारी असल्याचेही बोलले जात आहे.

या व्यतिरिक्त मविआकडून ऐनवेळी पत्ता कट केलेले शिवसेना ठाकरे गटाचे विजय करंजकर यांचे नावदेखील वंचितकडून पुढे येत आहे. करंजकर यांची उमेदवारी नाकारल्यानंतर, ‘लढणार आणि पाडणार’ अशी बंडखोरीची भाषा त्यांनी केली होती. त्यामुळे तेदेखील वंचितकडून उमेदवारी करू शकतात, अशी चर्चा आहे. या व्यतिरिक्त मराठा समाजकडून इच्छुक असलेले करण गायकर हे देखील वंचितकडून इच्छुक असल्याचे बोलले जात आहे. याशिवाय महायुतीने आपला अधिकृत उमेदवार जाहीर केल्यानंतर इतरही इच्छुक वंचितच्या वाटेवर जाण्याच्या तयारीत आहेत. दरम्यान, वंचित या सर्व घडामोडींवर डोळा ठेवून असून, महायुतीचा उमेदवार निश्चित झाल्यानंतर बंडखोरीच्या तयारीत असलेल्यांना गळाला लावण्याची शक्यता आहे.

वंचितचा उमेदवार लवकरच ठरणार
गेल्या पंचवार्षिक निवडणुकीत वंचितकडून उमेदवारी करताना पवन पवार यांनी एक लाखापेक्षा अधिक मते घेत, आघाडीच्या उमेदवाराचे विजयाचे गणित बिघडविले होते. यंदादेखील वंचित फॅक्टर विजयी उमेदवारासाठी महत्त्वपूर्ण ठरणार आहे. त्यामुळे वंचितकडून अनेकजण इच्छुक असून, पुढील दोन दिवसांत वंचितचा उमेदवार निश्चित होण्याची शक्यता आहे. अर्थात महायुतीचा उमेदवार ठरल्यानंतरच वंचित आपला उमेदवार देण्याची शक्यता आहे.

हेही वाचा:

The post बंडखोर इच्छुकांना गळाला लावण्याचा वंचितचा प्रयत्न appeared first on पुढारी.