बनवेगिरी! गर्दुल्ल्याने चक्क पोलिस उपनिरीक्षकास केले आपला ‘भाचा’

नाशिक : पुढारी वृत्तेसवा – जिल्हा शासकीय रुग्णालयात महिलांचा व्हिडिओ काढल्याच्या आरोपावरून सुरक्षारक्षकांनी एकाला पकडून रुग्णालयातील पोलिस चौकीत आणले. मात्र माझा भाचा रुग्णालयात दाखल असल्याचे सांगत त्याने एक क्रमांक पोलिसांना दिला. पोलिसांनी तो क्रमांक लावत समोरील व्यक्तीला पोलिस चौकीत बोलावले. मात्र मी कोणाचा भाचा नाही, तर पोलिस उपनिरीक्षक बोलतोय असे सांगितल्याने तो चर्चेचा विषय झाला. अखेर पोलिस तपासात संबंधित युवक गांजाच्या आहारी असल्याचे निष्पन्न झाले. त्यानंतर पोलिसांनी काही वेळाने त्यास चौकशी करून सोडून दिले.

‘अहो, बॉसने मला ओळखलं नसेल… मी कालू आहे…’

गुरुवारी (दि. २३) सायंकाळी 6.30 च्या सुमारास जिल्हा रुग्णालयातील सुरक्षारक्षकांनी एका तरुणास पोलिस चौकीत आणले. त्याने महिला कक्षात चित्रीकरण केल्याचा आरोप त्यांनी केला. त्यानुसार चौकीतील पोलिसांनी तरुणाच्या मोबाइलची तपासणी करीत त्याची चौकशी केली. त्याने त्याचे नाव कालू सांगितले. तसेच व्हिडिओ का केला, याबाबत प्रश्न विचारल्यावर त्याने उडवाउडवीची उत्तरे दिली. माझा भाचा ॲडमिट आहे. त्याला शोधत होतो. सहज व्हिडिओ केला. मी गुन्हेगार नाही. व्हिडिओमध्ये काही आक्षेपार्ह नाही, अशी उत्तरे त्याने दिली. शिवाय भाच्याचा क्रमांकही पोलिसांना दिला. पोलिसांनी फोन लावत कालूचा पराक्रम सांगत पोलिस चौकीत येण्यास सांगितले. मात्र फोनवरून बोलणाऱ्या व्यक्तीने, आपण कालूचा भाचा नव्हे, तर पोलिस उपनिरीक्षक बोलतोय असे सांगितले. त्यामुळे चौकीतील पोलिसांनी कालूला दम भरला असता, ‘अहो, बॉसने मला ओळखलं नसेल… मी कालू आहे…’ असे सांगत पोलिसांची समजूत काढण्याचा प्रयत्न केला. अखेर कालू गांजाच्या नशेत राहात असल्याचे उघड झाल्यानंतर पोलिसांनी काय करावे अशा द्विधा मनस्थितीत अडकले. दुपारी दारू दुकानाबाहेर राडा केल्याने मुंबई नाका पोलिसांनी पकडल्याची कबुलीही कालूने दिली. त्यामुळे पोलिसांनी त्यास ‘समज’ देत सोडून दिले.

हेही वाचा: