भागवत बंधूंची सुटका, अपहरणकर्त्याला अटक

अपहरण,www.pudhari.news

नाशिक : पुढारी वृत्तसेवा- येवला पंचायत समितीचे माजी उपसभापती व शिवसेनेचे माजी पदाधिकारी रूपचंद रामचंद्र भागवत व विष्णू रामचंद्र भागवत या दोघा भावांचे चार कोटी १० लाख रुपयांच्या खंडणीसाठी सीबीएस परिसरातून अपहरण करणाऱ्या संशयितास पोलिसांनी बेड्या ठोकल्या आहेत.

अपहरणकर्त्यांनी भागवत बंधूंना त्र्यंबकेश्वर, वाडिवऱ्हे, मुंबई रोड अशा वेगवेगळ्या ठिकाणी घेऊन जात जीवे मारण्याची धमकी देऊन पैशांची मागणी केली. तसेच खंडणीच्या पैशांची व्यवस्था करण्यासाठी अपहृत रूपचंद भागवत यांस गरवारे पॉइंट येथे सोडून दिले. त्यानंतर त्यांनी पोलिसांशी संपर्क साधला असता, गुन्हे शाखा युनिट एकच्या अधिकारी व अंमलदारांनी तत्काळ घटनास्थळाला भेट देऊन तपास सुरू केला. परिसरातील सीसीटीव्ही फुटेजवरून तांत्रिक माहितीच्या आधारे पोलिस उपनिरीक्षक रवींद्र बागुल, पोलिस हवालदार विशाल काठे, पोलिस नाईक मिलिंदसिंग परदेशी यांनी संशयितांची नावे निष्पन्न केली. त्यामध्ये राकेश साेनार, सुनील चव्हाण, संभाजी कवळे, वेदांत येवला, प्रशांत परदेशी हे अपहरणकर्ते असल्याचे पोलिसांच्या तपासात समोर आले. तर दुसरा अपहृत व्यक्ती विष्णू भागवत याचा शोध घेत असताना अपहरणकर्ते त्यास अहमदनगर जिल्ह्यात घेऊन गेल्याची माहिती गुन्हे शाखा युनिट एकच्या हाती लागली. त्यानुसार पथक तयार करून अपहरणकर्त्याच्या मागावर असतानाच अपहृत विष्णू भागवत यांची लोणी येथून सुटका करण्यात आली. त्यानंतर पोलिस पथक संशयितांच्या मागावर रवाना झाले. वरिष्ठ पोलिस उपनिरीक्षक रवींद्र बागूल, पोलिस हवालदार विशाल काठे, पोलिस नाइक मिलिंदसिंग परदेशी यांना गुप्त बातमीदारांमार्फत संशयित काळ्या रंगाच्या स्कोडा कार (एमएच०४ डीएन ९६७७)मध्ये सातपूर परिसरात येणार असल्याची खात्रीशीर माहिती मिळाली. त्यानुसार पोलिस निरीक्षक विद्यासागर श्रीमनवार यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक पोलिस निरीक्षक हेमंत तोडकर, रवींद्र बागूल, महेश साळुंके, योगीराज गायकवाड, प्रदीप म्हसदे, प्रवीण वाघमारे, विशाल काठे, नाझीम पठाण, विशाल देवरे, मिलिंदसिंग परदेशी, आप्पा पानवळ, राजेश राठोड, अमोल कोष्टी यांनी अशोकनगर परिसरात सापळा रचून वेदांत दत्तात्रय येवला (२१, रा. नागरे चौक, अशोकनगर, सातपूर) यास ताब्यात घेतले. त्याची चौकशी केली असता, त्याने गुन्ह्याची कबुली दिली. त्याच्याकडून तीन लाख रुपये किमतीची स्कोडा कार जप्त करण्यात आली. तसेच तीस हजार रुपये किमतीचा देशी बनावटीचा कट्टा व पाचशे रुपये किमतीचा एक जिवंत राउंड असा एकूण तीन लाख तीस हजार पाचशे रुपये किमतीचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला. दरम्यान, इतर संशयितांच्या मागावर पोलिस पथक रवाना करण्यात आले आहे.

पोलिस आयुक्तांकडून सत्कार

अवघ्या २४ तासांत गुन्ह्याची उकल केल्याबद्दल पोलिस आयुक्त संदीप कर्णिक यांनी गुन्हे शाखा युनिट एकच्या पथकाला बक्षीस व प्रमाणपत्र देऊन सन्मानित केले. तसेच या प्रकरणातील इतरही संशयित आरोपींचा तत्काळ शोध घेऊन त्यांना ताब्यात घेण्याबाबतच्या सूचना दिल्या.

विष्णू भागवत पोलिसांच्या ताब्यात

विविध योजनांच्या माध्यमातून गुंतवणूकदारांची आर्थिक फसवणूक करण्याचा आरोप असलेल्या विष्णू भागवत यास येवला पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. त्यास न्यायालयात हजर केले असता, न्यायालयाने त्यास पोलिस कोठडीस सुनावल्याची माहिती सरकारवाडा पोलिसांनी दिली आहे. गुंतवलेली रक्कम परत घेण्यासाठीच या दोघांचे अपहरण करण्यात आल्याची चर्चा आहे.

हेही वाचा :

The post भागवत बंधूंची सुटका, अपहरणकर्त्याला अटक appeared first on पुढारी.