भारतीय जनता पार्टी हीच खऱ्या अर्थाने पाकिस्तान धार्जिणी : पटोले

नाना पटोले

धुळे : पुढारी वृत्तसेवा- भारतीय जनता पार्टीचा 400 पारचा नारा मागे पडला असून आता त्यांना पाकिस्तानची आठवण का येते आहे, तुम्ही आमंत्रित नसताना पाकिस्तानात जाऊन बिर्याणी खाल्ली. यावरून पाकिस्तान बरोबर तुमची अंडरस्टँडिंग दिसते आहे. आम्ही तर पाकिस्तानचे दोन तुकडे केले. तुम्हाला पुलवामा हल्ल्याची साधी चौकशी केली नाही. त्यामुळे भारतीय जनता पार्टी हीच खऱ्या अर्थाने पाकिस्तान धार्जीनी असल्याचा आरोप आज काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी धुळ्यात केला आहे.

धुळ्यात आज महाविकास आघाडीच्या वतीने पत्रकार परिषद घेण्यात आली. यावेळी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी भारतीय जनता पार्टीच्या धोरणांवर टीका केली. यावेळी काँग्रेसचे कार्याध्यक्ष तथा आमदार कुणाल पाटील, काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष शामकांत सनेर, आमदार नजाहत मिर्झा आदींची उपस्थिती होती. राज्यात मतदानाचा तिसरा टप्पा पार पडला आहे. यावरून जनता महाविकास आघाडीच्या सोबत राहणार असल्याचे चित्र दिसत आहे. आता ही निवडणूक जनतेने आपल्या हातात घेतली आहे. भारताला स्वातंत्र्य मिळाल्यानंतरची ही ऐतिहासिक घटना आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या सभेला देखील जनता स्वयंस्फूर्तीने येत नाही. पण महाविकास आघाडीच्या या परिवर्तनाच्या लाटेत जनता स्वयंस्फूर्तीने सहभागी होत असल्याचा दावा त्यांनी यावेळी केला. केंद्रातील सरकारने कांद्यावर निर्यात बंदी लावली. मात्र गुजरातचा कांदा खुला केला. हे प्रधानमंत्री गुजरातचे आहेत, देशाचे नव्हे. आम्हाला देशाचा प्रधानमंत्री हवा आहे. अशी शेतकऱ्यांची भावना तयार झाली आहे. पंतप्रधान यांनी एका मुलाखतीत महागाई थांबवण्यात यश आल्याचे सांगितले. हा प्रकार महागाईने त्रस्त झालेल्या जनतेच्या जखमेवर मीठ चोळण्यासारखा आहे. हा खोटारडापणा असल्याची टीका देखील त्यांनी केली.

या निवडणुकीत पोस्टल बॅलेट मोजणी मध्ये भारतीय जनता पार्टी पिछाडीवर गेलेली दिसेल. यावरून कर्मचाऱ्यांचा देखील त्यांना विरोध असल्याची परिस्थिती दिसून येईल. पंतप्रधान नरेंद्र मोदी हे जनभावनेला विश्वासात न घेता लोकांना गृहीत पकडून चालतात. जनतेच्या पैशांची लूट होते आहे. करोडो रुपये खर्च करून जाहिरातीवर खर्च होतो आहे.

तर राम मंदिराची शुद्धीकरण करू

महाविकास आघाडीचे सरकार आल्यानंतर या देशातील जनतेसाठी आणखी कल्याणकारक योजना वाढवणार आहे. महाविकास आघाडी कोणतीही योजना बंद करणार नाही. काँग्रेसने त्यांच्या सत्ता काळात सुरू केलेल्या योजनाच भारतीय जनता पार्टीने पुढे चालवल्या आहे. मोफत धान्य योजना देखील काँग्रेसने सुरू केली होती, असा दावा त्यांनी केला. तर महाविकास आघाडीची सत्ता आल्यानंतर राम मंदिराची शुद्धीकरण केले जाईल, असेही पटोले यांनी सांगितले. या देशातील शंकराचार्यांनी राम मंदिराच्या कार्यक्रमासंदर्भात आक्षेप नोंदवले आहेत. या मंदिरातील खरी मूर्ती बाजूला झाली असून राम लल्लाचा दरबार आपण सजवणार आहोत. अधर्माच्या आधारावर झालेल्या कार्यक्रम आपण धर्माच्या नावाखाली बदल करणार आहोत. आदरणीय शंकराचार्यांनी जे आक्षेप घेतले आहे. त्या आक्षेपानुसार आपण शुद्धीकरण करणार असल्याचे त्यांनी सांगितले.

भारतीय जनता पार्टीने सर्वात आधी 400 पार चा नारा केला. मात्र देशातले वातावरण त्यांच्या विरोधात गेल्यामुळे हा दावा त्यांनी मागे टाकला असून आता पाकिस्तानशी त्यांना आठवण आली आहे. पण याच पाकिस्तानमध्ये आमंत्रण नसताना देशाचे पंतप्रधान बिर्याणी खाण्यासाठी गेले. यावरून पाकिस्तानसोबत त्यांची अंडरस्टँडिंग दिसते. काँग्रेसने तर पाकिस्तानचे दोन तुकडे केले. भारतीय जनता पार्टीला पुलवामाची साधी चौकशी केली नाही. त्यामुळे पाकिस्तान धार्जिन बीजेपी असल्याचा दावा त्यांनी केला. तर चीन बरोबर देखील त्यांचे संबंध आहेत. चीनने भारतीय सीमांवर कब्जा केला आहे. त्यावर पंतप्रधान का बोलत नाही ,असा प्रश्न त्यांनी उपस्थित केला.

मुस्लिमां विषयी भारतीय जनता पार्टी प्रक्षोभक वाक्य वापरतात .पण मुस्लिम देखील या देशाचे नागरिक आहेत. याच समाजाचा राष्ट्रपती झाला. आणि त्यांना मिसाईल मॅन म्हणून संबोधले जाते. त्याच समाजाचा दुजाभाव सातत्याने भाजपाकडून केला जातो आहे .मुस्लिमांनी देखील या देशाच्या विकासासाठी काम केले आहे. पण भारतीय जनता पार्टी त्यांच्या विरोधात असल्याचे पटोले यांनी सांगितले.

प्रकाश आंबेडकर मोठे नेते 

वंचित आघाडीचे नेते प्रकाश आंबेडकर यांच्यासमोर मैत्रीचा हात आजही आम्ही पुढे केलेला आहे. प्रकाश आंबेडकर हे मोठे नेते आहेत. ते माझ्या विरोधात बोलू शकतात. पण मी त्यांच्या विरोधात बोलणार नाही. त्यांनी अनेक वेळेस माझ्यावर वैयक्तिक टीका करून माझा अपमान केला. पण मी उत्तर दिले नाही. असे असले तरी माझ्या वैयक्तिक अपमानापेक्षा संविधानाचे महत्त्व मोठे आहे. त्यामुळेच आपण त्यांना अकोला आणि धुळ्याच्या जागा देखील देणार होतो. मात्र त्यांनी मत विभाजन होईल अशी भूमिका घेतली. संविधान वाचवण्याची जबाबदारी आमची आहे, तशी त्यांची देखील आहे. संविधान बदलण्याची भाषा करणाऱ्यांना थांबवण्यासाठी मत विभाजन टाळले पाहिजे. विद्यमान स्थितीत प्रकाश आंबेडकर यांनी महाविकास आघाडी संदर्भात विधानसभेत सोबत राहणार असल्याची सांगितले .पण दुसऱ्या बाजूला त्यांनी मुंबई येथे माजी मंत्री वर्षा गायकवाड यांच्या विरोधात उमेदवार दिला .त्यामुळे नेमकी तुमची मानसिकता काय आहे ,असा प्रश्न देखील पटोले यांनी उपस्थित केला.

हेही वाचा –