भुजबळ- सानप यांच्यात गुफ्तगु, राजकीय वर्तुळात तर्कवितर्क

छगन भुजबळ, बाळासाहेब सानप

नाशिक : पुढारी वृत्तसेवा- लोकसभा निवडणूकीसाठी नाशिकच्या जागेबाबत महायुतीचा अद्यापही तिढा सुटलेला नसताना मंत्री छगन भुजबळ यांच्या नावाची चर्चा आहे. नुकतेच भाजपचे माजी आमदार बाळासाहेब सानप यांची छगन भुजबळ यांच्यासोबत बंद दाराआड चर्चा झाल्याने अनेक राजकीय तर्कवितर्क लढविले जात आहे.

लोकसभेच्या नाशिकच्या जागेसाठी अद्याप कोणाचेही नाव समोर आले नाही. विद्यमान खासदार हेमंत गोडसे हे शिवसेना शिंदे गटाचे आहेत. त्यांच्याबाबत भाजपच्या नेत्यांनीच नाराजी व्यक्त करत नाशिकमध्ये तीन आमदार आणि सत्तर नगरसेवक असल्याने या जागेवर आपला दावा दाखल केला होता. मात्र, भाजपच्या पक्षश्रेष्टींनी भुजबळांचे नाव पुढे आणल्याने त्यांच्या नावाची चर्चा सुरु झाली. त्यानंतर भाजप आणि सेनेकडून अनेकांच्या भेटी गाठी घेतल्या गेल्या. अद्यापही कोणत्या नावावर शिक्कामोर्तब झालेले नसले तरी देखिल भुजबळांचे नाव अंतिम असल्याच्या चर्चा आहेत. त्या पार्श्वभूमीवर माजी आमदार सानप यांच्यासोबत बंद दाराआड तब्बल दीड तास चर्चा झाल्याचे समोर आले असल्याने भेटीला राजकीय महत्त्व प्राप्त झाले आहे.

गेल्या विधानसभा निवडणूकीत तत्कालिन विद्यमान आमदार बाळासाहेब सानप यांना पक्षाने डावलून त्या जागेवर मनसेकडून आयात राहूल ढिकले यांना भाजपने उमेदवारी दिली होती. तेव्हा बाळासाहेब सानप यांना छगन भुजबळ यांनी राष्ट्रवादीकडून उमेदवारीसाठी प्रयत्न केले होते. सानप राष्ट्रवादीकडून लढले असले तरी त्यांना पराभव स्विकारावा लागला होता. यंदा मात्र त्यांनी पुन्हा भाजपमध्ये प्रवेश करत मोट बांधायला सुरुवात केलेली आहे.

माजी आमदार सानप यांना या भेटीबाबत विचारणा केली असता महानुभाव पंथाचा नवरात्र उत्सवाचे निमंत्रण देण्यासाठी राज्याचे वरिष्ठ मंत्री छगन भुुजबळ यांची भेट घेतल्याचे त्यांनी सांगितले. तसेच भुजबळ हे मित्रपक्षाचेच आहे. त्यामुळे आम्हाला मोदी साहेबांना पंतप्रधान करायचंय असं देखिल सानप यांनी यावेळी सांगितले.

हेही वाचा –

The post भुजबळ- सानप यांच्यात गुफ्तगु, राजकीय वर्तुळात तर्कवितर्क appeared first on पुढारी.