युती धर्म पाळा, नाशिकच्या जागेवरुन संजय शिरसाट यांची भाजपसह राष्ट्रवादीला कानटोचणी

नाशिक : पुढारी वृत्तसेवा- महायुतीत नाशिकवरून घमासान सुरू असताना, शिवसेनेच्या शिंदे गटाचे प्रवक्ते संजय शिरसाट यांनी पुन्हा एकदा नाशिकवर दावा केला आहे. नाशिकची जागा आमचीच असल्याचे सांगत युती धर्म सगळ्यांनी पाळायला हवा, अशा शब्दांत शिरसाट यांनी भाजपसह राष्ट्रवादीचे कान टोचले आहेत.

महायुतीतील नाशिकच्या जागेचा वाद थेट दिल्ली दरबारी पोहोचला आहे. महायुतीत स्थानिक पातळीवर या वादावर मंगळवारी (दि. 2) दुपारपर्यंत कुठलाही तोडगा निघालेला नाही. शिंदे गटाचे युवा नेते श्रीकांत शिंदे यांनी नाशिकवर आपलाच मूळ हक्क असल्याचे सांगत हेमंत गोडसे यांची उमेदवारी जाहीर केल्यानंतर या वादाला सुरुवात झाली. भाजपनेही या जागेवर दावा केल्यानंतर राष्ट्रवादीच्या अजित पवार गटानेही साताऱ्याच्या बदल्यात नाशिकच्या उमेदवारीवर हक्क सांगितला. आपली उमेदवारी दिल्लीतूनच निश्चित झाल्याचे तसेच उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनीच या उमेदवारीवर शिक्कोमोर्तब केल्याचा दावा करत राष्ट्रवादीच्या अजित पवार गटाचे नेते तथा अन्न नागरी पुरवठामंत्री छगन भुजबळ यांनी नाशिकमधून उमेदवारीचे संकेत दिल्याने महायुतीतील संघर्ष टोकाला गेला आहे.

उमेदवारी निश्चितीसाठी हेमंत गोडसे यांच्या पाठोपाठ छगन भुजबळ यांनीही मंगळवारी दुपारी पक्षनेत्यांची भेट घेतली. या दरम्यान, शिंदे गटाचे प्रवक्ते शिरसाट यांनी केलेल्या वक्तव्यामुळे महायुतीत पुन्हा एकदा तणाव वाढण्याची शक्यता आहे. नाशिकची जागा आमचीच असल्याचे म्हणत शिरसाट यांनी नाशिकच्या जागेवर दावा केला आहे. हेमंत गोडसे येथून दोन वेळा निवडून आले आहेत. त्यामुळे त्या जागेवर आमचाच हक्क आहे. शिवसेनेच्या ज्या जागा आहेत, त्या त्यांच्याच असतील. तसेच, युती धर्म सगळ्यांनी पाळायला हवा, असे म्हणत शिरसाट यांनी भाजपसह राष्ट्रवादीचे कान टोचले आहेत.

हेही वाचा –

The post युती धर्म पाळा, नाशिकच्या जागेवरुन संजय शिरसाट यांची भाजपसह राष्ट्रवादीला कानटोचणी appeared first on पुढारी.