जलपर्णीद्वारे जलशुद्धीकरण : मिथेनची निर्मिती करून इंधन बनविणे शक्य

जलपर्णी pudhari.news

नाशिक : आनंद बोरा
नदीपात्रातील जलपर्णी जैवविविधतेबरोबरच मानवी आरोग्यही धोक्यात येत आहे. मात्र, या जलपर्णी वरदानही ठरू शकतात. याशिवाय जलपर्णीमुळे जलशुद्धीकरणही शक्य आहे. होय, जलपर्णीची स्वत:ची अशी अनेक वैशिष्ट्ये असून, ते वरदान ठरण्याबरोबरच उत्पन्नाचा सोनेरी मार्ग ठरू शकतात.

‘वॉटर हायसिंथ’  (Water hyacinth) नावाने ओळखल्या जाणारी ही वनस्पती दक्षिण अमेरिकेतून आपल्याकडे आली आहे. तिचे शास्त्रीय नाव ‘इकॉर्निया क्रासिप्सवरील ति’ असे आहे. पाण्याच्या घट्ट थरामुळे पाण्याचा प्रवाह मंदावतो आणि तिच्याद्वारे होणाऱ्या परागसंश्लेषणाच्या प्रक्रियेत पाणी उडून जाते. डासांच्या पैदाशीसाठी जलपर्णी उत्तम ठरते. ती पाण्यातील ऑक्सिजन शोषून घेते. याशिवाय पाण्यावर सूर्यप्रकाश पडण्यात ती अडथळा ठरते. जलपर्णीचे हे दुष्परिणाम असले तरी तिच्यापासून बरेच फायदेदेखील आहेत. जलपर्णी पाण्यातील नायट्रोजन, सोडियम, पोटॅशियम हे घटक, सूक्ष्म घनपदार्थ, अगदी जड धातूसुद्धा शोषून घेते आणि पाणी बऱ्यापैकी शुद्ध करू शकते. जलपर्णीचा वापर करून मिथेनची निर्मिती करून इंधन बनविणे शक्य आहे. त्यातून खतदेखील तयार केले जाऊ शकते. जलपर्णीचा वापर खत, जनावरांसाठी खाद्य, जैविक इंधननिर्मिती किंवा इतरही कारणांसाठी करता येऊ शकतो, असे अभ्यासकांचे म्हणणे आहे. तसेच या जलपर्णीपासून बायो-इथेनॉलची निर्मिती करता येते. बायो-इथेनॉल पेट्रोलमध्ये मिसळून वाहनासाठी इंधन म्हणून वापरता येते. भारतात पेट्रोलमध्ये दहा टक्के बायोइथेनॉल मिसळण्याची परवानगी आहे.

विविध वस्तू बनविता येणे शक्य
जलपर्णीपासून टोपली, कागद, कार्डबोर्ड, टोप्या, चटई, फर्निचर, पॅकिंगचा कागद, ज्यूटसोबत मिळून दोरखंड आदी वस्तू बनवता येतात. घरातील पार्टिशन, सीलिंग बनवण्यासाठीही जलपर्णीचा उपयोग होतो. ही वनस्पती सौरऊर्जा शोषून जैववस्तुमानाच्या रूपात ऊर्जा साठविते. जलपर्णी ही सौर पॅनलप्रमाणे कार्य करते.

जलपर्णीपासून बनवलेल्या टोपल्या
जलपर्णीपासून टोपली, कागद, कार्डबोर्ड, टोप्या, चटई, फर्निचर, पॅकिंगचा कागद, ज्यूटसोबत मिळून दोरखंड आदी वस्तू बनवता येतात.

विदेशात विविध प्रकल्प
१९७० च्या दशकापासून अमेरिकेच्या विविध प्रांतांमध्ये जलपर्णीवर आधारित विविध प्रकल्प सुरू आहेत. तेथे सांडपाणी साठवण्याच्या ४० एकरांमधील तळ्यात ही जलपर्णी लावण्यात आली होती. त्याचा परिणाम इतका झाला की, एकेकाळी दुर्गंधीने भरून जाणारा हा परिसर पूर्णपणे स्वच्छ झाला. जॉर्जिया प्रांतातील प्रतिदिवशी १३ लाख लिटर क्षमतेचा जलशुद्धीकरण प्रकल्प उभारण्यात आला. आफ्रिकेतील काही देश त्यापासून खतनिर्मिती करतात, टोपल्यासारख्या काही वस्तूही बनवतात.

जलपर्णी या वनस्पतीपासून इंधननिर्मिती करणे शक्य आहे. खत तयार होऊ शकते. वनस्पतीचे खोड आणि वाळलेल्या पानापासून फर्निचरमधील वस्तू तयार करता येऊ शकतात. जलपर्णीद्वारे जलशुद्धीकरणाचा प्रकल्प राबवणे शक्य आहे. – डॉ. शिरीष क्षीरसागर, वनस्पती अभ्यासक

१९८५ मध्ये नाशिक महानगरपालिकेत रुजू झाल्यानंतर जलपर्णीचे जैविक नियंत्रण कसे करायचे याची माहिती घेण्यासाठी बेंगलोरला इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ हॉर्टिकल्चरल रिसर्चमध्ये गेलो होतो. जे किडे वॉटर हायसिंथ खातात अशा किड्यांचे कल्चर मी तेथून येताना घेऊन आलो होतो. किडे पॅकिंग करताना बंगळुरू ते नाशिक या कालावधीत अन्न म्हणून त्यामध्ये वॉटर आयसिंगची पाने टाकली होती. नाशिकला येईपर्यंत सगळी पाने फस्त झाली होती. पुढे ते किडे जेथे जलपर्णी होती, त्या भागात नदीत सोडले. परंतु स्थिर पाणी असेल तरच ते किडे चांगले काम करू शकतात, वाहत्या पाण्यात करू शकत नाहीत, असे लक्षात आले. त्यामुळे गोदावरीत त्यावेळेला कोणताही अनुकूल परिणाम दिसून आला नाही. – प्रमोद फाल्गुने, माजी उद्यान अधीक्षक, मनपा

हेही वाचा:

The post जलपर्णीद्वारे जलशुद्धीकरण : मिथेनची निर्मिती करून इंधन बनविणे शक्य appeared first on पुढारी.