अभयारण्यात वाढले प्रदूषण : निफाडचे नैसर्गिक सौंदर्यही धोक्यात

कोल्हापूर : पंचगंगेतली जलपर्णी... काढायची कोणी?

नाशिक : आनंद बोरा

नाशिकमधील सांडपाण्यामुळे तयार झालेल्या पाणवेली गोदावरी नदीपात्रातून वाहत निफाडमध्ये जात असल्याने नांदूरमध्यमेश्वर धरणातील जलचर प्राण्यांसह अभयारण्यातील पक्ष्यांचे आरोग्य धोक्यात आले आहे. परिणामी देशी-विदेशी स्थलांतरित पक्षी वेळेआधीच पारतीच्या मार्गावर निघाले आहेत. याशिवाय निफाडचे नैसर्गिक सौंदर्यही धोक्यात आले असून, पात्रातील या जलपर्णी वेळीच काढण्याची गरज असल्याची भावना नागरिकांकडून व्यक्त केली जात आहे.

गंगापूर धरणातून आवर्तन सोडल्यानंतर नाशिककरांकडून गोदावरी पात्रात सोडल्या जाणाऱ्या सांडपाण्यामुळे मोठ्या प्रमाणात पाणवेली (जलपर्णी) तयार होत आहेत. जेव्हा गंगापूर धरणातून आवर्तन सोडले जाते, तेव्हा या जलपर्णी वाहून निफाडमधील नांदूरमध्यमेश्वर धरणात जमा होतात. पुढे या धरणपात्रात इतक्या पसरतात की पाणी दिसणे अवघड होते. अशात अभयारण्यात आलेल्या पक्ष्यांना खाद्य तर मिळत नाहीच, याशिवाय जलचर प्राण्यांनाही पाणवेलीमुळे होणाऱ्या प्रदूषणाचा फटका बसत आहे. तसेच चांदोरीमधील नदीपात्रात असलेल्या ऐतिहासिक हेमाडपंती मंदिरांनादेखील जलपर्णीचा धोका पोहाेचत आहे. चांदोरी, सायखेडा, शिंगवे, चापडगाव, मांजरगाव, नांदूरमध्यमेश्वर या गावात डासांचे प्रमाण वाढल्याने मानवी आरोग्यासह पशुधनालाही याचा त्रास होत असल्याचे नागरिकांचे म्हणणे आहे.

शेती क्षेत्रातही पाणवेली
नांदूरमध्यमेश्वर पक्षी अभयारण्यात स्थलांतरण करून येणाऱ्या पक्ष्यांना या पाणवेलींचा सर्वात जास्त त्रास सहन करावा लागत आहे. शेती क्षेत्रातही या पाणवेली पसरत असल्याने, वेळीच कायमस्वरूपी बंदोबस्त करण्याची गरज आहे. – अनिल सोनवणे, सरपंच, चापडगाव

डासांची उत्पत्ती
गोदावरीच्या पात्रात प्रचंड प्रमाणात पाणवेली वाढल्याने डासांची मोठी उत्पत्ती होत आहे. यामुळे परिसरातील नागरिकांचे आरोग्य धोक्यात आले आहे. याशिवाय ग्रामपालिका, आरोग्यव्यवस्थेवर ताण वाढला आहे. नदीपात्राचा लवकर श्वास मोकळा करावा. – रवि सगर, सामाजिक कार्यकर्ते, शिंगवे

नागरिकांचे आरोग्य धोक्यात
पाणवेलींचा त्रास दीर्घकालीन होत असल्याने लवकरात लवकर याचा बंदोबस्त करण्याची गरज आहे. पाणवेलींमुळे पंचक्रोशीतील नागरिकांच्या आरोग्याच्या समस्या निर्माण झाल्या आहेत. यावर खात्रीशीर उपाययोजना व्हायला हव्यात. – स्वाती आघाव, अध्यक्ष, ग्राम परिस्थिती विकास समिती, भुसे

दुर्गंधी पसरली
पाणवेलीमुळे पक्ष्यांना पाण्यात मुक्तसंचार करता येत नाही. खाद्य शोधण्यात त्यांना अडचणी येतात. नदीचा नैसर्गिक प्रवाह थांबल्याने जलचर प्राण्यांनाही धोका निर्माण झाला आहे. नदीचे पाणी दूषित होत आहे. आजूबाजूच्या गावांमध्ये दुर्गंधी पसरत आहे. – सुनील सोनवणे, सरपंच, मांजरगाव

मंदिरांना धोका
गोदावरीच्या पात्रात तसेच तीरावर अनेक मंदिरे असून, पाणवेलीमुळे या मंदिरांनादेखील धोका निर्माण झाला आहे. मंदिरात येणाऱ्या भाविकांना डासांचा प्रचंड त्रास आहे. वेळीच उपाययोजना करण्याची गरज आहे. – गणेश वाघ, पुजारी, नांदूरमध्यमेश्वर

तर आंदोलन उभारू
चांदोरीमध्ये पाणवेलींचे मोठे दुष्परिणाम दिसून येत आहेत. सायखेडा पुलाला पाणवेली अडकून राहत असल्याने त्याचा पुलाला धोका निर्माण झाला आहे. चांदोरीतून जाणाऱ्या गोदावरीच्या पात्रात संपूर्णपणे पाणवेली आहे. पाणवेली त्वरित काढव्यात अन्यथा आंदोलन उभारू. – सोमनाथ कोटमे, चांदोरी

The post अभयारण्यात वाढले प्रदूषण : निफाडचे नैसर्गिक सौंदर्यही धोक्यात appeared first on पुढारी.