Honey revolution: आठ महिन्यांत देशातून ७२ हजार ८२५ टन निर्यात

Honey pudhari.news

नाशिक (लासलगाव) : राकेश बोरा

देशात मध उत्पादनात मोठी मधुक्रांती झाली असून, कोविड संक्रमणानंतर जागतिक पातळीवर मधाची मागणी वाढली आहे. मध आरोग्यदायी असून, रोगप्रतिकारक क्षमता वाढवण्यासाठी अत्यंत उपयुक्त आहे. देशात झालेल्या मधुक्रांतीमुळे यंदा अवघ्या आठ महिन्यांत ७२ हजार ८२५ टन मधाची निर्यात (Honey Export) झाली असून, या उत्पादनाच्या निर्यातीतून देशाला १ हजार १७ कोटी रुपयांचे परकीय चलन (foreign exchange) प्राप्त झाले आहे.

देशात मध उत्पादन (Honey production) व्यवसाय करणाऱ्यांसाठी ही अत्यंत आनंदाची बातमी आहे. मधुमक्षिका पालन व्यवसाय  किती पुढे गेला आहे, याची प्रचिती या आकडेवारीवरून येते. भारतात उत्पादित होणाऱ्या नैसर्गिक मधाला देशांतर्गत व विदेशी बाजारपेठेत मोठी मागणी आहे. २०२३- २४ या वर्षांतील एप्रिल ते नोव्हेंबर या महिन्यात ७२ हजार ८२५ टन नैसर्गिक मध निर्यात (Honey Export) झाली आहे.

देशात अजूनही मोठ्या प्रमाणात मध उत्पादन हे पारंपरिक पद्धतीने केले जाते. अलीकडील काळात यात बदल होऊन स्थलांतरित स्वरूपाच्या मधमाशी पालन व्यवसायात मोठ्या प्रमाणावर वाढ झाली आहे. मधाचा उपयोग औषधनिर्मिती, खाण्यासाठी तसेच खाद्यपदार्थ तयार करण्यासाठी होत असल्याने बाहेरील देशांमधून मागणी वाढत असल्याचे आशादायी चित्र आहे. त्यामुळे कृषिपूरक व्यवसायास रोजगाराची संधी म्हणून पाहिल्यास अर्थकारणाला मोठा वाव आहे. चालू आर्थिक वर्षातील आठ महिन्यांत भारतातून ७२ हजार ८२५ टन मध निर्यात झाली असून, यातून १०१७ कोटी रुपयांचे परकीय चलन (foreign exchange) भारताला मिळाले.

फुलोऱ्यानुसार मिळतो मधाला दर
विविध पिके व झाडापासून संकलित होणाऱ्या मधाचे दर वेगवेगळे असतात. फुलोऱ्यानुसार दर ठरत असतो. तुळस, सूर्यफूल, ओवा, शिसम, कोथिंबीर, घोडेघास, मोहरी, लिची तसेच नैसर्गिक रानफुलांच्या फुलोऱ्याचा आधार घेत मधमाशांच्या वसाहती तयार करून मध संकलित करण्यावर अनेक तरुण व्यावसायिक पुढे येत आहे.

निर्यातीतून मिळालेले परकीय चलन
वर्ष                               चलन
२०१९-२०                     ६३३ कोटी
२०२०-२१                     ७१६ कोटी
२०२१-२२                     १२२१ कोटी
२०२२-२३                     १६२२ कोटी

या प्रमुख देशात निर्यात
यूएसए – ८७८ कोटी
युनायटेड अरब – ४९ कोटी
सौदी अरब -१४ कोटी
कतार – १० कोटी
लिबिया- ९ कोटी
बांगलादेश -४.५ कोटी

1996- 97 पासून आपल्या देशातून मध निर्यातीला सुरुवात झाली. जगातील सर्वाधिक मध निर्यात करणाऱ्या देशांच्या यादीत भारताचा क्रमांक लागतो. मात्र, आजही निर्यात वाढवण्यास मोठा वाव आहे. कोविडच्या संक्रमणानंतर जागतिक पातळीवर मधाची मागणी वाढली आहे. मध आरोग्यदायी असून, रोगप्रतिकारक क्षमता वाढवण्यासाठी अत्यंत उपयुक्त आहे. आपल्या देशामध्ये मधाच्या पेट्या ठेवण्यासाठी 30 हजार रुपयांच्या भांडवलापासून सुरुवात करता येते. मध उत्पादनामध्ये ज्या ज्या वनस्पतींवरून मध गोळा केले जाते. त्या वनस्पतींचा गुणधर्म मधामध्ये येतो. त्यामुळे भविष्य काळामध्ये मध उत्पादन आणि निर्यात करताना वेगवेगळ्या झाडांवरील मध स्वतंत्ररीत्या उत्पादित केले पाहिजे. काही कंपन्यांनी या प्रकारचे प्रयोग सुरू केले आहे. -सचिन आत्माराम होळकर, कृषितज्ज्ञ मु.पो. लासलगाव, जि. नाशिक.

The post Honey revolution: आठ महिन्यांत देशातून ७२ हजार ८२५ टन निर्यात appeared first on पुढारी.