दिंडोरीबाबत राष्ट्रवादीच्या पदाधिकाऱ्यांची आग्रही भूमिका

नाशिक : पुढारी वृत्तसेवा
नाशिक लोकसभा मतदारसंघावर भारतीय जनता पक्षाने दावा दाखल केल्यानंतर लगेचच दिंडोरी लोकसभा मतदारसंघाबाबत चर्चा सुरू झाल्या आहेत. याबाबत राष्ट्रवादी काँग्रेसचे ग्रामीण जिल्हाध्यक्ष रवींद्र पगार यांनी दिलेल्या माहितीनुसार नाशिक आणि दिंडोरी लोकसभा मतदारसंघाची जागा राष्ट्रवादीला मिळावी याबाबत पक्षश्रेष्ठींना पत्र दिल्याचे म्हटले आहे. तसेच आता दिंडोरीबाबत राष्ट्रवादीच्या पदाधिकाऱ्यांनी आग्रही भूमिका घेतल्याचे समोर येत आहे. (Nationalist Congress Party)

देशात लोकसभेच्या निवडणुकांची आचारसंहिता काही दिवसांत लागणार आहे. त्या पार्श्वभूमीवर राज्यात सत्तेत असलेले पक्ष आपापल्या परीने मतदारसंघात चाचपणी करत आहेत. सत्ताधारी महायुतीमधील तिन्ही पक्ष नाशिक जिल्ह्यातील जागा आपल्या ताब्यात घेण्यासाठी प्रयत्नशील आहेत. याबाबत भारतीय जनता पक्षाने नाशिक महापालिका क्षेत्रातील तिन्ही विधानसभा मतदारसंघ आपल्याकडे आहे. तसेच सिन्नर आणि नाशिक तालुका विधानसभा मतदारसंघ महायुतीतील मित्रपक्ष असलेल्या राष्ट्रवादी काँग्रेसकडे (Nationalist Congress Party) असल्याचे सांगत नाशिक लोकसभा मतदारसंघावर आपला दावा दाखल केला आहे. त्यामुळे आदिवासीबहुल दिंडोरी लोकसभा मतदारसंघाबाबत खलबते सुरू झाली आहेत. यामध्ये प्रामुख्याने या मतदारसंघात असलेल्या चार विधानसभा मतदारसंघांपैकी दोन मतदारसंघांत राष्ट्रवादी काँग्रेसचे विद्यमान आमदार आहेत. तर उर्वरित नांदगाव आणि चांदवड मतदारसंघावर महायुतीतील मित्रपक्ष अनुक्रमे शिवसेना आणि भारतीय जनता पक्षाचे विद्यमान आमदार आहेत. त्यामुळे दिंडोरी या मतदारसंघाची जागा राष्ट्रवादीला मिळावी यासाठी राष्ट्रवादीचे पदाधिकारी आग्रही आहेत.

संपूर्ण नाशिक जिल्ह्याचा विचार करता राष्ट्रवादी काँग्रेसचे (Nationalist Congress Party) एकूण सहा आमदार आहेत. सहापैकी सहादेखील जिल्ह्यातील ग्रामीण भागाचे प्रतिनिधित्व करतात. तसेच बाजार समित्यांमध्ये देखील राष्ट्रवादीचे वर्चस्व बघायला मिळते. जिल्ह्याचे पालकमंत्री दादा भुसे यांनी मालेगाव-धुळे लोकसभा मतदारसंघात काम करण्यास देखील सुरुवात केली असल्याने तो मतदारसंघ शिवसेनेला सुटेल अशादेखील चर्चा यानिमित्ताने रंगत आहे.

दिंडोरी मतदारसंघातील बलाबल
या मतदारसंघात दिंडोरी-पेठ, कळवण-सुरगाणा, चांदवड-देवळा, निफाड, येवला आणि नांदगाव-मनमाड हे विधानसभा क्षेत्र आहेत. यामध्ये दिंडोरी- पेठ मध्ये विधानसभा उपाध्यक्ष आ. नरहरी झिरवाळ, कळवण-सुरगणामध्ये आ. नितीन पवार, निफाडमध्ये आ. दिलीप बनकर, येवल्यात मंत्री छगन भुजबळ हे विद्यामान आमदार आहेत. म्हणजेच चार मतदारसंघांत राष्ट्रवादी काँग्रेस (Nationalist Congress Party), तर चांदवड-देवळामध्ये भाजपचे आ. राहुल आहेर आणि नांदगावमध्ये शिवसेनेचे आ. सुहास कांदे आहेत. त्यामुळे हा मतदारसंघ महायुतीसाठी सेफ मतदारसंघ समजला जात आहे.

केंद्रीय राज्यमंत्री डॉ. भारती पवार दिंडोरी लोकसभा मतदारसंघाचे प्रतिनिधित्व करतात. भाजपने नाशिक लोकसभा मतदारसंघावर दावा दाखल करताना दिंडोरीबाबत काहीही स्पष्टता दाखवली नसल्याने नाशिकच्या बदल्यात भाजप दिंडोरी मतदारसंघ मित्रपक्षाला सोडेल का? तसेच नाशिक, दिंडोरी हा पेच सुटल्यानंतर आपोआप मालेगाव- धुळे मतदारसंघाबाबत शिवसेनेचा मार्ग मोकळा होऊन पालकमंत्र्यांच्या पथ्यावर पडेल का हे बघणे औत्सुक्याचे राहणार आहे.

जिल्ह्यातील आमदारांमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस हा थोरला भाऊ आहे. ग्रामीण भागात राष्ट्रवादीची पकड घट्ट आहे. गेल्याच आठवड्यात पक्षश्रेष्ठींकडे नाशिक, दिंडोरीबाबत पत्रव्यवहार केला आहे. भाजपने नाशिकवर दावा दाखल केल्यानंतर दिंडोरीबाबत विचार होण्याबाबत आम्ही सकारात्मक आहोत. याबाबत श्रेष्ठी निर्णय घेतील. तालुकाध्यक्षांना कामाला लागण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. – रवींद्र पगार, जिल्हाध्यक्ष, राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी, नाशिक.

हेही वाचा:

The post दिंडोरीबाबत राष्ट्रवादीच्या पदाधिकाऱ्यांची आग्रही भूमिका appeared first on पुढारी.