नाशिकमध्ये लाखोंचा रंगयुक्त मसाला, मिरची जप्त

मिरची पावडर जप्त,www.pudhari.news

नाशिक : पुढारी वृत्तसेवा; दिवाळी सणाच्या पार्श्वभूमीवर मोठ्या प्रमाणात भेसळयुक्त पदार्थांची विक्री केली जात असून, त्यास पायबंद घालण्यासाठी अन्न, औषध प्रशासनाकडून सातत्याने कारवाई केली जात आहे. मालेगाव, मालदे शिवारात लाखो रुपयांचा रंगयुक्त मसाला आणि मिर्ची असल्याची माहिती प्रशासनाला प्राप्त होताच, त्याठिकाणी धाड ठाकून मसाले आणि मिर्चीचा साठा जप्त करण्यात आला आहे.

मिर्ची आणि मसाल्यांमध्ये कायद्याप्रमाणे रंग वापरण्यास बंदी आहे. असे असतानाही मालेगाव, मालदे शिवारातील एसईए-एमए मसाले प्रॉडक्ट प्रा. लि., गट नं. ४१, प्लॉट नं. ११४, गुलशन ए मदिना याठिकाणी कृत्रिम अन्न रंग तयार करून त्याचा वापर मसाले आणि मिर्चीमध्ये केल्याची माहिती मिळताच अन्न सुरक्षा अधिकारी योगेश देशमुख यांनी याठिकाणी धाड टाकली. संबंधित व्यापाऱ्याने या रंगाचा वापर टिका फ्राय मसाला व मिर्ची पावडरमध्ये केल्याचा संशय असून, याबाबतचा साठा प्रशासनाने जप्त केला आहे. यावेळी टिका फ्राय मसाल्याचे तब्बल आठशे पॅकिट (किंमत २४ हजार रुपये) तसेच कुठल्याही प्रकारचे लेबल नसलेली ५३८ किलो मिर्ची (किंमत १ लाख ६१ हजार चारशे रुपये) तसेच घटनास्थळी कृत्रिम अन्न रंग तयार करणारे ८.२० किलो (किंमत ७४० रुपये) पदार्थ आढळून आले आहेत. अन्न सुरक्षा कायद्याअंतर्गत सर्व पदार्थांचे नमुने घेवून ते जप्त करण्यात आले.

ही कारवाई अन्न सुरक्षा अधिकारी योगेश देशमुख यांनी सहआयुक्त सं. भा. नारागुडे तसेच सहाय्यक आयुक्त विवेक पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली केली. दरम्यान, कुठेही भेसळयुक्त पदार्थांची विक्री होत असेल तर त्याची माहिती प्रशासनास द्यावी, माहिती सांगणाऱ्यांचे नाव गोपनीय ठेवण्यात येईल, असे आवाहन प्रशासनाच्यावतीने करण्यात आले आहे.

हेही वाचा :

The post नाशिकमध्ये लाखोंचा रंगयुक्त मसाला, मिरची जप्त appeared first on पुढारी.