नाशिकचं राजकारण पेटलं; भुजबळ, गोडसे दोघेही राजधानीत

छगन भुजबळ, हेमंत गोडसे

पुढारी ऑनलाइन डेस्क – नाशिक लोकसभेसाठी शिवसेना ठाकरे गटाकडून राजाभाऊ वाजे यांचे नाव जाहीर होऊन त्यांनी प्रचारालाही सुरुवात केली आहे. मात्र, महायुतीकडून आजुनही या जागेचा तिढा सुटलेला नाही. छगन भुजबळ व हेमंत गोडसे यांच्यात ही जागा मिळविण्यासाठी सध्या रस्सीखेच सुरु असल्याचे पाहायला मिळत आहे. हेमंत गोडसे हे मुंबईत मुख्यमंत्र्यांच्या भेटीसाठी गेलेले असताना त्यापाठोपाठ छगन भुजबळ यांनीही मुंबई गाठल्याचे वृत्त आहे. त्यामुळे नाशिकच्या राजकारणाला नवं वळणं आल्याचे दिसते आहे.  (Nashik Lok Sabha Election 2024)

महायुतीतील भाजप, राष्ट्रवादी(अजित पवार गट) व शिवसेना (शिंदे गट) अशा तीनही पक्षांकडून या जागेवर दावा केला जातो आहे. राष्ट्रवादीकडून छगन भुजबळ व शिवसेना शिंदे गटाकडून हेमंत गोडसे या जागेसाठी आग्रही आहे. मात्र, त्याचवेळी शहरात तीन आमदार व सत्तर नगसेवक भाजपचे असल्याने भाजपही याजागेसाठी प्रयत्नशील आहे. त्यामुळे दोघांच्या भांडणात तिसऱ्याचाच लाभ होतो की काय? अशीही चर्चा आता मतदारसंघात सुरु झाली आहे. (Nashik Lok Sabha Election 2024)

सध्या भुजबळांना नाशिकची उमेदवारी मिळेल अशी चर्चा आहे, मात्र हेमंत गोडसे यांचा मात्र भुजबळांच्या नावाला विरोध आहे. विद्यमान खासदार आमचा असल्याने ही जागा आम्हालाच मिळावी अशी भूमिका गोडसे यांनी घेतली आहे. त्यासाठी ते वारंवार मुख्यमंत्र्यांच्या भेटी घेऊन दबाव निर्माण करु पाहत आहेत.

गोडसेंनी भुजबळांचा केला होता पराभव (Nashik Lok Sabha Election 2024)

एका बाजूला हेमंत गोडसे हे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट घेणार आहेत. तर दुसरीकडे छगन भुजबळ हेसुद्धा मुंबईला गेले असल्याने  नाशिकच्या उमेदवारीवरून मुंबईत चर्चा होण्याची शक्यता आहे. 2014 मध्ये छगन भुजबळ यांचा हेमंत गोडसे यांनी याच मतदारसंघात पराभव केला होता. मोदी लाटेचा फटका भुजबळांना बसला होता. यावेळी मराठा समाजाच्या रोषाला भुजबळांना सामोरे जावे लागू शकते.

The post नाशिकचं राजकारण पेटलं; भुजबळ, गोडसे दोघेही राजधानीत appeared first on पुढारी.