नांदगावचे कामकाज डिजिटल पद्धतीने; मोठ्या प्रमाणात खरेदी-विक्री

नांदगाव : सचिन बैरागी
एप्रिल २०२३ ते मार्च २०२४ या आर्थिक वर्षात नांदगाव आणि उपबाजार समिती बोलठाणमध्ये २४ लाख ९२ हजार ५३१ क्विंटल शेतमालाची खरेदी-विक्री झाली. या माध्यमातून एकूण तीन अब्ज ४९ कोटी २० लाख ५४ हजार रुपयांची आर्थिक उलाढाल झाली आहे. नांदगाव आणि उपबाजार समितीमध्ये, नांदगावसह, मालेगाव, चाळीसगाव, येवला, वैजापूर, छत्रपती संभाजीनगर या भागातील शेतकरी आपला शेतमाल मोठ्या प्रमाणात विक्रीसाठी आणत असतात. त्यात प्रामुख्याने कांदा, मका, भुसार धान्यासह, कडधान्यदेखील असते. शेतकरीवर्गाच्या चांगल्या प्रतिसादामुळे या बाजार समितीअंतर्गत वर्षभरात मोठी उलाढाल होत आहे. बाजार समितीचे संपूर्ण कामकाज डिजिटल पद्धतीने चालते.

दुष्काळामुळे आवक घटली
गेल्या दोन वर्षांच्या तुलनेत यंदा तालुक्यात कमी पाऊस पडल्याने, त्याचा परिणाम शेती व्यवसायावर झाला आहे. परिणामी, कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये शेतमालाची आवक गेल्या दोन वर्षांपेक्षा कमी झाली. २०२१-२२ या वर्षामध्ये ३२ लाख २६ हजार ४९० क्विंटल शेतमाल विक्री झाला होता. तर २०२२-२३ या वर्षी शेतकऱ्यांनी ४० लाख १७ हजार ५२८ क्विंटल शेतमाल विकला तर गेल्या आर्थिक वर्षात आवक घटली. वर्षभरात केवळ २४ लाख ९२ हजार ५३१ क्विंटल इतकीच शेतमालाची आवक झाली. त्यातून उलाढाल कमी झाली असली तरी अब्जात असून, त्यामुळे समितीला घसघशीत उत्पन्न लाभले आहे.

चांगल्यात चांगल्या सुविधा शेतकऱ्यांना देण्याचा प्रयत्न आमचा असतो. यात आमदार सुहास कांदे यांचे मार्गदर्शन लाभते. समितीचे संचालक मंडळ, सर्व व्यापारी तसेच कर्मचारीवर्ग चांगली मेहनत घेत असल्याने शेतकऱ्यांना पाठिंबा मिळत आहे. – अर्जुन पाटील, अध्यक्ष, कृषी उत्पन्न बाजार समिती, नांदगाव.

वर्षभरातील एकूण आवक
• लाल कांदा : ६ लाख ४८ हजार ७५५ क्विंटल
• उन्हाळ कांदा : १३ लाख ७२ हजार ८५१ क्विंटल
• कांदा सफेद : २३३ क्विंटल
• मका : ४ लाख ४४ हजार ८५८ क्विंटल
• भुसार धान्य व कडधान्य : ६ लाख ९ हजार ७३१ क्विंटल
• एकूण : २४ लाख ९२ हजार ५३१
एकूण उलाढाल : ३ अब्ज ४९ कोटी २० लाख ५४ हजार

गेल्या दोन वर्षांच्या तुलनेत यंदा आवक घटली असली तरी बऱ्यापैकी प्रतिसाद यंदाही मिळाला. बाजार समितीमध्ये शेतकऱ्यांना मूलभूत सुविधा देण्याचा प्रयत्न आमचा असतो. त्यात अध्यक्ष, संचालक मंडळासह सहकारी कर्मचाऱ्यांची मोलाची साथ लाभत असते. – अमोल खैरनार, सचिव, कृषी उत्पन्न बाजार समिती, नांदगाव.

हेही वाचा:

The post नांदगावचे कामकाज डिजिटल पद्धतीने; मोठ्या प्रमाणात खरेदी-विक्री appeared first on पुढारी.