नाशिक शहरालगतच्या गावांमध्ये बिबट्याची दहशत

बिबट्याची दहशत,www.pudhari.news

नाशिक : पुढारी वृत्तसेवा

शहरालगतच्या गावांमध्ये बिबट्याची दहशत कायम आहे. ग्रामीण भागात बिबट्याचा धुमाकूळ सुरू असून, वेगवेगळ्या ठिकाणी बिबट्याने हल्ला केल्याने दोघी गंभीर जखमी झाल्याचा प्रकार समोर आला आहे. जखमींवर रूग्णालयात उपाचार सुरू आहे. तर बिबट्याला जेरबंद करण्यासाठी पिंजरा बसवण्याची मागणी स्थानिकांनी वन विभागाकडे केली आहे.

वनविभागाकडून मिळालेल्या माहितीनुसार, शनिवारी (दि.११) सायंकाळी सात वाजेच्या सुमारास सोनगिरी (ता. सिन्नर) येथील गौरी राजेंद्र लहाणे (9) ही वडील राजेंद्र लहाने यांच्यासोबत नायगाव येथे दुचाकीने जात होती. सोनगिरी शिवारातील पाटाजवळ दबा धरून बसलेल्या बिबट्याने त्यांच्या दुचाकीवर हल्ला केला. यात गौरी हिच्या उजवा पाय बिबट्याच्या जबड्यात अडकल्याने तिला गंभीर दुखापत झाली. हल्ल्याचे गांभीर्य ओळखून लहाणे पिता-पुत्रींनी जोरदार आरडाओरड केल्याने बिबट्याने तिथून पळ काढला.

दरम्यान, शेळ्या चारण्यासाठी गेलेल्या पशुपालक महिलेवर बिबट्याने हल्ला केल्याची घटना मनोली (ता. नशिक) परिसरात घडली. इंदुबाई मुरलीधर गभाले (५२, रा.मनोली) ह्या शेळ्या चारण्यासाठी स्थानिक शेतकरी आढाव यांच्या मालकीच्या द्राक्ष व टमाटेच्या शेतात गेल्या होत्या. त्याचवेळी बिबट्याने गभाले यांच्यावर हल्ला केला. यात त्याच्या मानेला गंभीर दुखापत झाली असून, त्यांच्यावर जिल्हा शासकीय रूग्णालयात उपचार सुरू आहे.

वनविभागाचे आवाहन

गेल्या काही दिवसांपासून बिबट्याच्या हल्ल्याच्या घटना वाढल्या आहे. पशुधनासह नागरिकांना बिबट्याकडून लक्ष केले जात आहे. त्यापार्श्वभूमीवर सायंकाळी-रात्री शेतमाळ्यातून शेतकरी व नागरिकांनी प्रवास करणे टाळावे. प्रवास करणार असल्यास आवश्यक खबरदारी घेण्याचे आवाहन वनविभागाकडून करण्यात आले आहे.

हेही वाचा :

The post नाशिक शहरालगतच्या गावांमध्ये बिबट्याची दहशत appeared first on पुढारी.