मंडल आयोगाला आव्हान देवू इच्छित नाही, कारण… : जरांगे पाटील

जरांगे पाटील www.pudhari.news

नांदगाव(जि. नाशिक) ; पुढारी वृत्तसेवा- सकल मराठा समाजाला आरक्षण मिळवून देण्यासाठी जीवाची बाजी लावणारे मराठा योध्दा मनोज जरांगे पाटील यांचे नांदगाव शहरात आज फटाक्यांची अतिषबाजी व वीस जेसीबी मधून पुष्पवृष्टी करीत भव्य स्वागत करण्यात आले. मराठा समाजाला मिळालेल्या आरक्षणाची अंमलबजावणी करून मराठा समाजाला लाभ मिळावा यासाठी येत्या १० फेब्रुवारीला उपोषण करणार असल्याचा इशारा मनोज जरांगे पाटिल यांनी येथे बोलताना दिला.

तर नांदगाव तालुक्यातूनही उपोषण करून पाठिंबा दर्शवावा, असे आवाहनही जरांगे पाटील यांनी नांदगाव तालुक्यातील मराठा समाज बांधवांना केले. जरांगे पाटील आपला नाशिक जिल्हा दौरा आटपून ते नांदगाव मार्गे छत्रपती संभाजीनगरकडे दुपारी १ वाजता जाणार असल्याने येथे त्यांच्या स्वागताची जोरदार तयारी केली गेली. मात्र जरांगे पाटील यांचे ठराविक वेळेपेक्षा रात्री उशिरा ३ वाजता नांदगाव शहरात आगमन झाले. जवळ – जवळ १४ ते १५ तास मराठा समाज बांधव जरांगे पाटील यांचे स्वागत करण्यासाठी व त्यांचे विचार ऐकण्यासाठी मोठ्या संख्येने उपस्थित होते. याप्रसंगी त्यांचे महिला वर्गातून औक्षण करण्यात आले. यावेळी फटाक्यांची आतिषबाजी व वीस जेसीबी मधून पुष्पवृष्टी करण्यात आली. यावेळी जरांगे पाटील म्हणाले कि, मराठा आरक्षणाचा विषय संपला असून आता सगेसोयरे चा अध्यादेशाची अंमलबजावणी झाली की मराठा समाजातील मुलाबाळांच्या आयुष्याचे कल्याण होणार असल्याचे त्यांनी सांगितले.

मंडल आयोगाला आव्हान देवू इच्छित नाही, कारण

याप्रसंगी ना. छगन भुजबळ यांचे नाव न घेता त्यांनी सांगितले की, मराठ्याना ओबीसी चे आरक्षण मिळू देणार नाही असे म्हटले गेलं मात्र ते आम्ही मिळविले. त्यांना तीन वेळा आम्ही संधी दिली. मात्र आता चौथ्यांदा संधी देणार नाही. त्यांनी मराठा समाज व ओबीसी मध्ये वाद लावण्याचा धंदा बंद करावा, आम्ही मंडल आयोगाला आव्हान देवू इच्छित नाही कारण आम्हाला ओबीसी मधील गोरगरीब मुलांचे नुकसान करावयाचे नाही तशी आमची वृत्ती नाही. तरी ओबीसी समाजाने त्यांना ठणकावून सांगितले पाहिजे की तुमच्या राजकारणातील स्वार्थासाठी ओबीसी समाजाला वेठीस धरू नका. १५ तारखेला राज्याचे विशेष अधिवेशन होणार असून अधिवेशनात स्थानिक आमदारांना व खासदारांना तुमच्या संबंधित आमदारांना मराठा समाज आरक्षण आध्यदेशाची अंमलबजावणी करण्याबाबत कायदा पारित करावा, असे सांगण्यास भाग पाडावे, असे जरांगे पाटील यांनी सांगून युवकांनी व्यसनापासून लांब रहावे, असे आवाहनही केले. समाजाच्या पाठिंब्यामुळेच आपण हा आरक्षणाचा लढा लढत असून या पुढे असाच पाठिंबा आपल्या पाठिशी असू द्या, अशी अपेक्षाही यावेळी जरांगे पाटील यांनी केली. यावेळी नांदगाव शहर व तालुक्यातील सकल मराठा समाज बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते.

हेही वाचा :

The post मंडल आयोगाला आव्हान देवू इच्छित नाही, कारण... : जरांगे पाटील appeared first on पुढारी.