नाशिक : पुढारी वृत्तसेवा
महात्मा जोतिबा फुले, महात्मा गांधी, महात्मा बसवेश्वर एवढेच ‘महात्मा’ या देशात आहेत. भारतरत्न तर बरेच आहेत. त्यामुळे महात्मा फुले यांना भारतरत्न द्यावा, या आमच्या लोकांची मागणीच मला आश्चर्यकारक वाटते. दस्तुरखुद्द महात्मा गांधी यांनी जाेतिबा फुलेंना ‘महात्मा’ म्हणून संबोधले होते. त्यांना भारतरत्न नको, असे परखड मत अन्न, नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण मंत्री छगन भुजबळ यांनी मांडले. यावेळी त्यांंनी बिहारमधील नाभिक समाजाचे माजी मुख्यमंत्री कर्पुरी ठाकूर यांना भारतरत्न दिल्याचा आनंद असल्याचेही म्हटले.
महाकवी कालिदास कलामंदिर येथे इलाइट सर्टिफिकेशन्स आणि इनोव्हेटिव्ह साेल्युशन संस्थेतर्फे ‘महात्मा जोतिराव फुले विचार जागर स्पर्धा परीक्षेच्या बक्षीस वितरण सोहळ्यात’ ते बोलत हाेते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी ज्येष्ठ साहित्यिक उत्तम कांबळे होते. व्यासपीठावर राष्ट्रीय प्रबोधनकार सप्तखंजिरीवादक सत्यपाल महाराज, मविप्रचे सरचिटणीस ॲड. नितीन ठाकरे, माजी खासदार समीर भुजबळ, आशीर्वाद फाउंडेशनच्या संस्थापक डॉ. मनीषा जगताप, इलाइट सर्टिफिकेशन्सच्या सीईओ स्वप्ना थोरात, आयोजक आबासाहेब थोरात, वामनराव थोरात, शारदाबाई थोरात आदी उपस्थित होते.
भुजबळ म्हणाले, हल्ली समाजसुधारकांवर बोलणारी माणसे फार कमी आहेत. इतिहास शोधला जात नाही. जे आपल्या डोक्यावर ठेवले जात आहे, तेच आपण ऐकत आहोत. त्यामुळे समाजात आजही मोठ्या प्रमाणात अंधश्रद्धा पाळली जाते. त्या काळी अंधश्रद्धेचा पगडा दूर करण्यासाठी सत्यशोधक समाजाची स्थापना झाल्याचेही त्यांनी सांगितले. फुले, शाहू, आंबेडकर यांच्या विचाराची समाजाला गरज असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले.
उत्तम कांबळे यांनी आपल्या भाषणात भुजबळांनी दिलेल्या राजीनाम्याबद्दल जाहीर नाराजी व्यक्त केली. मंत्रिपद ओबीसीच्या कष्टातून आणि त्यांच्या आशीर्वादातून मिळाले आहे. ते पूजेतून मिळाले नाही. त्यामुळे मंत्रिपदाच्या राजीनाम्याचा विचार करावा, अशी जाहीर मागणी केली.
प्रारंभी सप्तखंजिरीवादक सत्यपाल महाराज यांनी उपस्थितांचे प्रबोधन केले. कार्यक्रमात डॉ. बाबासाहेब आंबेडकर विचार जागर स्पर्धेच्या फलकाचे अनावरणदेखील करण्यात आले. दीपक अहिरे यांनी सूत्रसंचालन केले, तर स्वप्ना थाेरात यांनी आभार मानले.
तृप्ती निकमला एक लाखाचे बक्षीस
स्पर्धेतील पहिल्या क्रमांकाचे एक लाखाचे बक्षीस देवळा येथील जनता विद्यालयाच्या इयत्ती नववीतील तृप्ती सोमनाथ निकम, द्वितीय ५० हजारांचे बक्षीस पवननगर येथील जनता विद्यालयाच्या इयत्ता नववीतील सिद्धेश तुकाराम दोंद, तर तृतीय प्रत्येकी 10 हजार रुपयांचे बक्षीस दिंडोरी तालुक्यातील शरदराव पवार माध्यमिक विद्यालयाच्या इयत्ता दहावीतील अनुष्का सुनील गायकवाड, लखमापूर येथील उषाताई देशमुख इंग्रजी माध्यमाच्या इयत्ता नववीतील वंशिका अनिल सोनवणे, मालेगाव येथील पंडित जवाहरलाल नेहरू हायस्कूलच्या इयत्ता नववीतील उदयराज योगेश जाधव यांना देण्याात आले.
अथर्व स्तोत्र पठण करता मग…
न्यायालयातील प्रदीर्घ लढ्यानंतर भिडे वाड्याचा प्रश्न मार्गी लागला. या ठिकाणी क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले पहिली मुलींचा शाळा असा फलक लागेल, तेव्हा खरा आनंद होईल. या शाळेसमोर असलेल्या गणपती मंदिरात एकावेळा २५ हजार महिला अथर्व स्तोत्र पठण करतात. यास विरोध नाही, पण ज्या सावित्रीने तुम्हाला स्तोत्र पठण करण्याची क्षमता दिली, त्या सावित्रीचे जवळच असलेल्या भिडे वाड्यात नमन करण्याचा त्यातील २५ महिलांच्या मनातदेखील विचार येत नसल्याची खंत ना. भुजबळ यांनी व्यक्त केली. सती सावित्रीची पूजा करता तशी पूजा सावित्रीची करा. तिने तुम्हाला अंधश्रद्धेतून बाहेर काढले आहे. दगड-धोंडे पूजन करण्यात तथ्य नसल्याचेही भुजबळ म्हणाले.
The post मंत्री छगन भुजबळ : स्पर्धा परीक्षा बक्षीस वितरण सोहळ्यात प्रतिपादन appeared first on पुढारी.