नाशिक : बिबट्याची उडी चुकल्याने तो पडला विहिरीत

बिबट्या जायखेडा pudhari.news

नाशिक (जायखेडा) : प्रकाश शेवाळे

येथील शेतकरी सुभाष हरी लाडे यांचे नात नातू बैलगाडीच्या दुशरमुळे बिबट्याच्या हल्ल्यातून बचावले. या घटनेत बिबट्याची उडी चुकली आणि बिबट्या थेट १०० फूट खोल विहिरीत पडल्याची घटना रविवारी (दि.४) सकाळी ७ वाजता घडली. तीन तासांच्या प्रयत्नांनंतर वनविभाग व ग्रामस्थांच्या मदतीने बिबट्याला विहिरीतून बाहेर काढण्यात यश आले.

येथील मेळवण शिवारातील शेतकरी लाडे यांच्या शेतात त्यांचा पुतण्या आबा लाडे हे सकाळी ७ वाजता ९ वर्षांची मुलगी आणि त्यांचा ८ वर्षांचा पुतण्या वीजपंप सुरू करण्यास गेले होते. त्याच वेळी कांद्याच्या पिकात पाळत ठेवून बसलेल्या बिबट्याने मुलांच्या दिशेने उडी घेत मुलांवर हल्ला करण्याचा प्रयत्न केला. मुलांनी घाबरून मोठमोठ्याने आरोळ्या मारत बिबट्याला हाकलण्याचा प्रयत्न केला. जवळच असलेले आवा लाडे यांनीही जोरजोरात आरोळ्या मारून परिसरातील शेतकऱ्यांना बोलावले. बिबट्या व मुलांचे अंतर अवघे तीन फुटांचे असतानाच जवळच असलेले चंद्रकांत लाडे हे बैलगाडीची दुशर घेऊन बिबट्याच्या दिशेने धावत आले. त्यामुळे विवट्या घाबरला आणि उडी चुकल्याने तो थेट १०० फूट खोल विहिरीत पडला. लाडे यांनी शेजारील शेतकऱ्यांना हाका मारल्या तेव्हा परिसरातील शेतकऱ्यांनी धाव घेत आबा लाडे व चंद्रकांत गाडे यांना धीर दिला.

डरकाळीने परिसरात घबराट
८ व ९ वर्षांच्या मुलांवर हल्ला करण्याच्या नादात विहिरीत पडलेल्या बिबट्याने जिवाच्या आकांताने डरकाळ्या सुरू केल्या. पाणी जास्त असल्यामुळे बिबट्याने पाइप व मोटर तरंगण्यासाठी वापरलेल्या वायररोपचा आधार घेतला होता. दरम्यान स्थानिक शेतकऱ्यांनी त्याला वाचवण्यासाठी विहिरीत खाट सोडली. यावेळी स्वतःचा जीव वाचवण्यासाठी बिबट्या लगेच खाटेवर बसला.

वनविभागाच्या मदतीने बिबट्याला बाहेर काढले
बिबट्या विहिरीत पडल्याची माहिती वनविभागाला कळवण्यात आली. त्या अगोदर शेतकरी श्यामकांत अहिरे, सुपडू गायकवाड, गोकुळ गायकवाड, दादा अहिरे, भटू लोंढे, राहुल लोंढे, आबा अहिरे, मच्छिंद्र गायकवाड, ऋषी गायकवाड, आबा लाडे, चंद्रकांत लाडे यांनी दोरखंडाला खार गंधत विहिरीत सोडली. वनविभागाचे पथक घटनास्थळी दाखल झाल्यानंतर विहिरीत पिंजरा सोडत विवट्याला बाहेर काढण्यात आले. वनपरिमंडळ अधिकारी गौरव अहिरे व तुषार देसाई, वनरक्षक माणिक मोरे, आकाश कोळी, एन. डी. कोळी, वाहनचालक कुंदन देवरे व मज्जिद मन्सुरी, वॉचमन लक्ष्मण पवार यांनी रेस्क्यू ऑपरेशन यशस्वी केले.

” ज्या विहिरींना कठडे नाहीत तसेच विहिरीभोवतीचा भाग झाडा- झुडपांनी वेढलेला आहे, अशा विहिरींमध्ये बिबटे पडण्याची शक्यता अधिक असते. बिबट्याचा वावर असलेल्या भागातील विहिरी कठडे बांधून बंदिस्त कराव्यात. झाडे-झुडपे काढून टाकावीत. बिबट्या विहिरीत पडू नये म्हणून हा खबरदारीचा उपाय आहे. तसेच सर्वांच्या सुरक्षिततेसाठीदेखील हा चांगला उपाय आहे. – गौरव अहिरे, तुषार देसाई, वनपरिमंडळ अधिकारी, ताहाराबाद.

हेही वाचा:

The post नाशिक : बिबट्याची उडी चुकल्याने तो पडला विहिरीत appeared first on पुढारी.