मखमलाबादला तीन बिबट्यांचा वावर, नागरिक भयभीत

पंचवटी : पुढारी वृत्तसेवा- मखमलाबाद रोडवरील वडजाई माता नगर परिसरात गुरूवार ( दि.७) रोजी प्रकाश घाडगे यांच्या बंगल्यामागील पांडुरंग खैरे यांच्या उसाच्या शेतात सकाळी दहा वाजेच्या सुमारास बिबट्याचे दर्शन घडल्याने एकच खळबळ उडाली होती. दरम्यान याठिकाणी वनविभागाला कळविण्यात आल्याने वनरक्षक सचिन आहेर यांनी धाव घेत याठिकाणी उसाच्या शेतात बिबट्याचे ठसे उमटलेले आढळून आले होते. त्याबाबत आहेर यांनी लागलीच वनविभागाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांना कळवून माहिती दिली असता वनाधिकाऱ्यांनी सदर ठिकाणी जाऊन पाहणी करून पिंजरा लावण्यात आला असून परिसरातील नागरिकांना सतर्क राहण्याच्या सूचना करण्यात आल्या आहे.

मखमलाबाद परिसरात गेल्या अनेक दिवसांपासून बिबट्यांचा वावर वाढला आहे. अनेक वेळा मखमलाबाद परिसरातील जुना चांदशी मळा, गंगापूर कॅनल, काश्मिरे मळा, जगझाप मळा, उदय नगर भागात बिबट्याचे दर्शन घडले होते. तर गुरूवार दि.७ रोजी सकाळी १० वाजेच्या सुमारास मखमलाबाद रोडवरील प्रकाश घाडगे यांच्या बंगल्यामागील खैरे यांचा मुलगा शेतात घास काढत असताना त्याला बिबट्या उसाच्या शेतात जाताना दिसला. याबाबत परिसरातील नागरिकांनी वनविभागाच्या अधिकाऱ्यांना कळविले असता वरिष्ठांनी तात्काळ वनविभागाचे सचिन आहेर यांना घटनास्थळी पाठविले. आहेर यांनी पाहणी करून बिबट्याचे ठसे उमटलेले आढळून आल्याने वरिष्ठांना माहिती दिली. त्यानंतर वनविभागाच्या वनपरिक्षेत्र अधिकारी वृषाली गाडे, वनपाल उत्तम पाटील यांच्यासह माजी महापौर अशोक मुर्तडक देखील याठिकाणी भेट दिली. तर गेल्या पाच ते सहा दिवसांपूर्वी माजी महापौर अशोक मुर्तडक यांच्या फार्म हाऊस मधील घोड्याचा देखील बिबट्याच्या हल्यात मृत्युमुखी पडले होते. याच परीसरात एक नाही तर तीन बिबट्यांचा वावर असल्याने परिसरातील नागरिक भयभीत झाले आहेत. वनविभागाच्या वतीने खैरे यांच्या शेताजवळ पिंजरा लावला असून वनरक्षक सचिन आहेर तसेच कर्मचाऱ्यांनी परिसरातील नागरिकांना सतर्क राहण्याच्या सूचना केल्या आहेत.

वडजाई माता नगर परीसरात माझे फार्म हाऊस असून त्यात गेल्या पाच ते सहा दिवसांपूर्वी एका घोड्याच्या बछड्याचा बिबट्याच्या हल्यात मृत्यू झाला आहे. तसेच याभागातील अनेक कुत्र्यांचा देखील बिबट्याने फडशा पाडला आहे. या भागात बिबट्यांचा वावर वाढल्याने नागरिक भयभीत झाले असून वनविभागाने बिबट्यांचा बंदोबस्त करावा . अशोक मुर्तडक, माजी महापौर,

 

मखमलाबाद परिसरात बिबट्यांचा वावर वाढला असल्याने दोन तीन ठिकाणी पिंजरे लावण्यात आले आहेत.bपरिसरातील नागरिकांनी घाबरुन न जाता सतर्क राहावे. त्याचप्रमाणे काही दिवस तरी सर्वांनी काळजी घ्यावी सायंकाळी व रात्रीच्या सुमारास तसेच पहाटे जॉगिंगला फिरण्यासाठी बाहेर पडू नये.- वृषाली गाडे, वनपरिक्षेत्र अधिकारी, नाशिक प्रादेशिक

हेही वाचा :

The post मखमलाबादला तीन बिबट्यांचा वावर, नागरिक भयभीत appeared first on पुढारी.