नाशिकमध्ये नागरिकांप्रमाणे आता प्राण्यांसाठीही रुग्णवाहिका

प्राण्यांसाठी रुग्ण वाहिका,www.pudhari.news

नाशिक : पुढारी वृत्तसेवा– शहरातील नागरिकांसाठी आरोग्य-वैद्यकीय सेवेची कर्तव्यपूर्ती करणाऱ्या नाशिक महापालिकेने आता प्राणिमात्रांवरही भूतदया दाखविली आहे. माणसांप्रमाणेच आता शहरातील मोकाट, भटक्या जनावरांसाठीही रुग्णवाहिकेची सुविधा महापालिकेच्या पशुसंवर्धन विभागाच्या वतीने उपलब्ध करून देण्यात येत आहे. पशुसंवर्धन विभागाकडे मनुष्यबळ उपलब्ध नसल्यामुळे आउटसोर्सिंगद्वारे ही सुविधा उपलब्ध करून देण्याचा निर्णय महापालिकेने घेतला आहे. यासंदर्भातील १३.२२ लाखांच्या प्रस्तावाला महासभेने मंजुरी दिली आहे.

शहरात पाळीव प्राण्यांप्रमाणेच भटके श्वान तसेच अन्य मोकाट जनावरांची संख्याही अधिक आहे. अनेकदा रस्त्यावरील अपघात वा अन्य काही कारणांमुळे या भटक्या प्राण्यांना इजा होते. अशावेळी त्यांना अनेकदा वेळेवर उपचार मिळत नाहीत, तर काही आजाराने ग्रस्त असलेल्या प्राण्यांमुळे इतर प्राण्यांनाही संसर्ग होण्याची शक्यता असते. अशावेळी या प्राण्यांवर वेळेवर आणि आवश्यक ठिकाणी उपचार होणे गरजेचे असतात. शहरातील काही प्राणिमित्र अशा मोकाट प्राण्यांची निश्चितपणे काळजी घेत आहेत. परंतु त्यांनाही अनेकवेळा मर्यादा येतात. अपघातग्रस्त वा आजारी असलेल्या प्राण्यांची वाहतूक करताना अनंत अडचणींचा सामना करावा लागतो. त्यावर मात करण्यासाठी महापालिकेच्या पशुसंवर्धन विभागाने प्राण्यांसाठी रुग्णवाहिका सुरू करण्याचा निर्णय घेतला आहे. या रुग्णवाहिकेच्या माध्यमातून प्राण्यांवर उपचार करणे शक्य होणार आहे. सलाइन, लसीकरण, प्राथमिक उपचाराची सोय या रुग्णवाहिकेत असणार आहे. बाह्य अभिकरणामार्फत ही सुविधा उपलब्ध करून दिली जात आहे. यासाठी १३.२२ लाखांचा वार्षिक खर्च अपेक्षित आहे.

लवकरच टोल फ्री क्रमांक

प्राण्यांच्या या रुग्णवाहिकेशी संपर्क करण्यासाठी महापालिकेच्या पशुसंवर्धन विभागाच्या वतीने लवकरच टोल फ्री क्रमांक जाहीर केला जाणार आहे. या माध्यमातून अपघातग्रस्त वा आजारी असलेल्या मोकाट व भटक्या जनावरांना उपचाराची सुविधा उपलब्ध करून दिली जाणार आहे.

हेही वाचा :

The post नाशिकमध्ये नागरिकांप्रमाणे आता प्राण्यांसाठीही रुग्णवाहिका appeared first on पुढारी.