वणी : पुढारी वृत्तसेवा
पारेगाव फाट्यानजीक कांदाचाळीवर कामाला जाणाऱ्या मजुरांच्या पिकअपला अपघात होऊन एक जण ठार, तर ३२ जण जखमी झालेत. यातील नऊ जण गंभीर जखमी असल्याने त्यांना नाशिक जिल्हा रुग्णालयात वर्ग करण्यात आले आहे. सोमवारी (दि.१३) सकाळी ९.३० च्या सुमारास हा अपघात झाला.
दह्याणेतील (ता.चांदवड) मजूर वणी येथे कांदाचाळीवर कामावर येत असतात. नेहमीप्रमाणेच ३२ ते ३५ मजूर पिकअपने (एमएच १५, एचएच ३६७८) येत होते. पारेगाव फाट्यानजीक चालकाचे भरधाव वाहनावरील नियंत्रण सुटून वाहन उलटले. एकच आक्रोश झाला. स्थानिक तरुणांनी तत्काळ मदतकार्य राबवून जखमींना बाहेर काढून मिळेल त्या साधनाने वणी ग्रामीण रुग्णालयात पाठवले. रुग्णालयात एकमेव डाॅ. अनंत गाडेकर हे उपस्थित होते. बालकांसह जखमींची संख्या अधिक असल्याने परिस्थितीचे गांभीर्य लक्षात घेऊन वणी डाॅक्टर असोसिएशनचे सदस्य, डाॅ.अनिल पवार, डाॅ. अनिल शेळके, डाॅ. सोहम चांडोले, डाॅ. विराम ठाकरे, डाॅ. प्रकाश देशमुख यांनी शासकीय रुग्णालय गाठत तत्काळ जखमींवर उपचार केलेत. गंभीर जखमींना रुग्णवाहिकेतून नाशिक येथे पाठविण्यात आले.
जखमींवर उपचार करत असताना अनेक अडचणींचा सामना करावा लागला. वीज नसल्याने वातानुकुलन कक्ष निरुपयोगी ठरला. कोंडलेल्या या कक्षात गुदमरलेल्यासारखे होत होते. अशाच परिस्थितीत मोबाइल टाॅर्चच्या सहाय्याने जखमींवर प्राथमिक उपचार झालेत. घटनेनंतर अतिरिक्त वैद्यकीय अधिकारी डाॅ. संदीप सूर्यवंशी व डाॅ. अनंत पवार यांनी रुग्णालयाला भेट दिली.
जखमींची नावे अशी…
गंभीर जखमी चंद्रभान ठमाजी हिंगले (५०) यांचा मृत्यू झाला. तर, कल्पना हिंगले (४०), तुषार बाळू जाधव, रंजना किसन गाडेकर (५०), भाऊसाहेब विष्णू गांगुर्डे (३५), सुरेखा बाळू वासदेव (५०), अंबिका रामू भुसारे (१७), रोहिणी वीरक हिंगले (१५), तेजस नाडेकर (४), चेतन अशोक हिंगले (१४), विशाल वीरक इंगले (१३), कार्तिक दत्तात्रय झडे (१३), राजश्री अशोक हिंगले (३५), संगीता गोरख हिंगले (३५), रोहित भाऊसाहेब हिंगले (१५), मंगला भाऊसाहेब हिंगले (३५), निकिता धोंडीराम हिंगले (१८), वैशाली अशोक हिंगले (१५), संगीता राजेंद्र गांगुर्डे (४०), सपना सुरेश हिंगले (१७), शुभम हिंगले (१७), आशा दशरथ वासदेव (४०), मनोहर चंद्रभान हिंगले (१६), यशराज संजय जाधव (१४), शुभम काळू सोनवणे (१६), महेश भाऊसाहेब हिंगले (१७), रत्ना सोमनाथ शेवरे (३५), सोनल रवींद्र भोये (३५), सीमा प्रकाश पिठे, पल्लवी संपत सोनवणे, ज्ञानेश्वर संपत सोनवणे हे जखमी झालेत. यातील २७ जणांवर ग्रामीण रुग्णालयात, इतर पाच जण खासगी रुग्णालयात उपचार घेत असून, गंभीर नऊ जखमी जिल्हा रुग्णालयात वर्ग केले आहेत.
वैद्यकीय अधीक्षक आले दुपारी दीडला
वणी ग्रामीण रुग्णालय शोभेची वास्तु झाली आहे. कर्मचारी वर्गाचाअभाव आहे. अपघातग्रस्तांवर उपचारासाठी केवळ एकच वैद्यकीय अधिकारी हजर होते. २८ जखमी आल्याने यंत्रणेची धांदल उडाली. उपचारासाठी खासगी डाॅक्टरांची मदत घ्यावी लागली. कोट्यवधी रुपये खर्चून अद्यावत सुविधांचा केवळ आभास निर्माण केला असल्याचे या घटनेतून अधाेरेखित झाले. सकाळी ९.३० ला अपघात झालेला असताना रुग्णालय गाठायला वैद्यकीय अधीक्षक डाॅ. बी. एन. मोरे यांना दुपारचे १.३० वाजले. त्यामुळे तीव्र प्रतिक्रिया उमटत आहेत.
केवळ खर्च, उपयोग शून्य
ग्रामीण रुग्णालयातील वातानुकुलन यंत्रणा बसवून जेमतेम आठ महिने झाले आहेत. चार महिन्यांपासून ही यंत्रणा नादुरुस्त आहे. परंतु, दुरुस्तीला मुहूर्त लागलेला नाही. या ठिकाणी निकृष्ट दर्जाची यंत्रणा लावण्यात आल्याची तक्रार आहे. केवळ लाखाेंचा निधी खर्ची पाडला गेला. प्रशासकीय अधिकारी व सार्वजनिक बांधकाम विभागाच्या दुर्लक्षामुळे ही परिस्थिती ओढावल्याचा सूर उमटत आहे.
- * मोठ्या अपघाताच्या वेळी बहुतांश वेळा शहरातील खासगी डॉक्टर्स उपचारासाठी धावून येतात. आवश्यकतेच्या वेळी वैद्यकीय अधिकारी अनुपस्थितच असतात.
- कोट्यवधी रुपयांचे कामे केल्याचे फलक झळकत असले तरी, निष्णात डॉक्टरांचा अभाव, अपुरा कर्मचारीवर्ग यामुळे यंत्रणा धूळखात पडली आहे.
- केंद्रीय आरोग्य राज्यमंत्री व विधानसभा उपाध्यक्ष यांच्या कार्यक्षेत्रातच आरोग्य व्यवस्थेची ही अवस्था असल्याने तीव्र नाराजी व्यक्त होत आहे.
हेही वाचा: