मतदान केंद्रांवर वॉटरप्रुफ मंडप, प्रशासनाला पावसाची धास्ती

पावसाची धास्ती www.pudhari.news

नाशिक : पुढारी वृत्तसेवा- लोकसभा निवडणुकीमध्ये मतदानाचा टक्का वाढविण्यासाठी प्रयत्नशील असलेल्या जिल्हा प्रशासनाला अवकाळी पावसाच्या धास्तीने ग्रासले आहे. पावसाची शक्यता गृहित धरुन मतदान केंद्रांवर वॉटरप्रुफ मंडपाची उभारण्याची तयारी केली आहे.

लोकसभेच्या नाशिक व दिंडोरी मतदारसंघासाठी सोमवारी (दि.२०) मतदान पार पडणार आहे. राज्यातील पहिल्या चार टप्यात मतदानाचा टक्का घसरल्याने अगोदरच प्रशासन चिंतातूर झाले आहे. पहिल्या चार टप्यातील मतदानाला मिळणार अल्प प्रतिसादाचा प्रशासनाने अभ्यास केला. त्यानुसार उन्हाचा कडाका व मतदान केंद्रांवरील असुविधांमुळे मतदारांनी मतदान केंद्राकडे पाठ फिरवल्याचे निष्कर्षाप्रत प्रशासन पोहोचला. त्यामुळे जिल्ह्यातील मतदानावेळी या चुका टाळताना अधिकधिक मतदान वाढविण्यासाठी प्रशासनाने कंबर कसली आहे.

निवडणुकीत मतदानावेळी मतदारांना घ‌राबाहेर काढण्यासाठी प्रशासनाकडून विविध मार्गाने जन जागृती केली जात आहे. तसेच उन्हाचा तडाखा लक्षात घेता मतदान केंद्रांवर मंडप उभारण्याच्या सूचना देण्यात आल्या हाेत्या. मात्र, गेल्या आठ दिवसांपासून जिल्ह्यात अवकाळी पावसाने झोडपून काढले आहे. बहुतांक्ष तालुक्यात वादळी वाऱ्यासह झालेल्या पावसाने नुकसान झाले. त्यातच पुढील काही दिवस जिल्ह्याच्या काही भागात अवकाळीच्या सरी बरसतील, असा अंदाज आहे. त्यामुळे आता प्रशासन अधिक सतर्क झाले आहे. अवकाळीचे संकट विचारात घेता मतदान केंद्रांवर वॉटर प्रुफ मंडप उभारावे, असे नव्याने निर्देश तालुकापातळीवर देण्यात आले आहेत.

साेशल मीडियाचा प्रभावी वापर

मतदानाचा टक्का वाढविण्यासाठी जिल्हा प्रशासन सोशल मीडियाचा प्रभावी वापर करते आहे. तहसीलदार अमोल निकम यांच्या संकल्पनेतून मराठी व हिंदी चित्रपटातील गाजलेले डॉयलॉगच्या माध्यमातून ‘व्होटकर नाशिककर’ असे आवाहन केले जात आहे. व्हॉटस‌्अॅप, फेसबुकसह अन्य सोशल माध्यमातून या मीम्स‌्ला तुफान प्रसिद्धी मिळते आहे.

हेही वाचा –