नाशिक : पुढारी वृत्तसेवा- लोकसभा निवडणुकीसाठी सर्वच बड्या पक्षांनी प्रतिष्ठा पणाला लावली असून, ४८ पैकी किती जागांवर विजयश्री खेचून आणायचे याचे गणित मांडले जात आहे. सत्ताधारी पक्षांनी ४५ पारचा नारा दिला, तर विरोधकांनी सत्ताधाऱ्यांचा सुपडा साफ करण्याचा निर्धार केला आहे. आता छोट्या पक्षांचीदेखील चुळबुळ सुरू झाली असून, लोकसभा निवडणुकीच्या मैदानात उतरून पक्षाच्या मतांचा टक्का वाढविण्याचा त्यांचा प्रयत्न आहे. वंचित, आप, रिपाइंसह बसपा, सपा, माकप या छोट्या पक्षांनीदेखील दंड थोपटल्याने, मोठ्या पक्षांना ते धक्का देण्याच्या तयारीत आहेत.
इतर राज्यांत प्राबल्य असलेले मात्र महाराष्ट्रात अजूनही अस्तित्वाची लढाई लढत असलेल्या छोटे पक्ष बड्या पक्षांसाठी नेहमीच डोकेदुखी ठरतात. या पक्षांना फारसे यश मिळत नसले तरी, निवडणुकीत हे पक्ष ‘गेमचेंजर’ म्हणून समोर येतात. या पक्षांच्या उमेदवारांनी घेतलेल्या मतांच्या टक्केवारीवर त्यांचा राष्ट्रीय पक्षाचा दर्जा टिकून राहतो, तर काहींचा राष्ट्रीय पक्ष म्हणून प्रवास सुरू होतो. दरम्यान, नाशिक आणि दिंडोरी लोकसभा मतदारसंघांत या पक्षांकडून मोठ्या पक्षांसमोर आव्हान उभे करण्यासाठीची मोर्चेबांधणी सुरू केली आहे. वंचित बहुजन आघाडी महाविकास आघाडीमध्ये सहभागी होणार की नाही? याविषयी अजूनही सांशकता आहे. अशात नाशिक आणि दिंडोरी लोकसभेसाठी पक्षातील इच्छुकांनी प्रचाराची जाेरदार तयारी सुरू केली आहे. दुसरीकडे लोकसभा निवडणुकीत हमखास आव्हान निर्माण करणाऱ्या बसपाकडूनदेखील आयात उमेदवाराची चाचपणी केली जात आहे. काही दिवसांपूर्वीच आम आदमी पक्षाच्या मेळाव्यात प्रदेश पदाधिकाऱ्यांकडून नाशिक लोकसभेच्या मैदानात उमेदवार उतरविणार असल्याचे स्पष्ट केले होते. आता त्यादृष्टीने त्यांची तयारी सुरू आहे.
तसेच रिपाइंआठवले गट सोडता इतर गटांनीदेखील लोकसभेच्या निवडणुकीत नशीब आजमावण्यासाठी धडपड सुरू केली आहे. समाजवादी पक्षाकडूनही हालचाली सुरू आहेत. तसेच एमआयएम पक्षदेखील नाशिक लोकसभा मतदारसंघातून उमेदवार देण्याच्या तयारीत आहे. माकपा दिंडोरी लोकसभा मतदारसंघात इच्छुक आहे. एकूणच भाजप, शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेस, काँग्रेस या प्रमुख पक्षांमध्ये सध्या जागा वाटपावरून घमासान सुरू असले तरी, छोट्या पक्षांनी मात्र निवडणुकीची जोरदार तयारी सुरू केली आहे.
बीआरएसची तलवार म्यान
तेलंगणाचे माजी मुख्यमंत्री तथा भारत राष्ट्र समिती अर्थात बीआरएसचे नेते केसीआर यांनी मागील वर्षात महाराष्ट्रात एंट्री करण्याचा जोरदार प्रयत्न केला. मात्र, तेलंगणा विधानसभा निवडणुकीतील पराभवानंतर महाराष्ट्रातून बीआरएसचे नाव हद्दपार झाले आहे. सुरुवातीला महाराष्ट्रात ४८ लोकसभा मतदारसंघांत उमेदवार देण्याचा निर्धार करणाऱ्या बीआरएसची हवाच राज्याच्या राजकारणातून गायब झाली आहे. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार नांदेड जिल्ह्यात गुलाबी वादळ निर्माण करण्याची धडपड बीआरएसकडून केली जात आहे. नांदेड या एकमेव लोकसभा मतदारसंघात बीआरएस उमेदवार देण्याच्या तयारीत आहे. मात्र, तिथेही तळ्यातमळ्यात असल्याचे चित्र आहे.
हेही वाचा :
- Lok Sabha Election 2024 : बड्यांच्या मांडवात वाजंत्र्यांची मांदियाळी!; राज्यात 145 नोंदणीकृत राजकीय पक्ष
- इस्राईल युद्धाचा द्राक्ष निर्यातीला फटका! मालवाहतूक खर्चात वाढ
The post मतांचा वाढविण्यासाठी टक्का, छोट्या पक्षांचा मोठ्यांना धक्का appeared first on पुढारी.