नाशिक : पुढारी वृत्तसेवा- पुणे येथील पोर्शे कार अपघातात दोघांचा मृत्यू झाल्यानंतर ड्रंक अँड ड्राइव्हची दाहकता पुन्हा एेरणीवर आली आहे. पोर्शेचालक अल्पवयीन असल्याचे व त्याने पबमध्ये मद्यखरेदी करून सेवन केल्याचे उघड झाले. त्यामुळे १८ वर्षांआतील मुलाने मद्यसेवन केल्याची चर्चा झडत आहे. प्रत्यक्षात मद्यसेवनासाठी किमान २१ व २५ वयाची अट असल्याचे राज्य उत्पादन शुल्क विभागाने स्पष्ट केले आहे. त्यामुळे मद्यसेवनासाठी १८ नव्हे तर किमान २१ व २५ वय असणे आवश्यक आहे. (Alcohol Consumption)
वयाची १८ वर्षे झाल्यानंतर देशभरातील तरुण-तरुणींना मतदानाचा हक्क मिळतो, वाहन चालवण्याचाही परवाना मिळतो. त्यामुळे १८ वर्षे झाल्यानंतर ती व्यक्ती सज्ञान होते, अशी व्याख्या आहे. मात्र, ही व्याख्या मद्यसेवनास लागू होत नाही. मद्यसेवनासाठी २१ व २५ वयाची अट ठेवण्यात आली आहे. त्यानुसार सौम्य क्षमतेचे मद्यसेवन करण्यासाठी २१ वय पूर्ण असणे आवश्यक असून ‘हार्ड ड्रींक’ करण्यासाठी २५ वय पूर्ण असणे आवश्यक आहे. तसेच मद्य वाहतुकीसाठीही हाच नियम लागू आहे. मात्र, या नियमांची जनजागृती अपेक्षीतरित्या न झाल्याने वयाची अट डावलून सर्रास मद्य पुरवले जात असल्याचे वास्तव बहुतांश ठिकाणी दिसते. कायद्यानुसार, महाराष्ट्रात दारू खरेदी करण्यासाठी, बाळगण्यासाठी, वाहतूक करण्यासाठी किंवा सेवन करण्यासाठी मद्य परमिट आवश्यक आहे. २५ वर्षांपेक्षा जास्त वयाची कोणतीही व्यक्ती त्याच्या आरोग्याची जपणूक आणि देखभाल करण्यासाठी मद्य परमिट मिळविण्यास पात्र आहे. परवानाशिवाय मद्य खरेदी करणे, सेवन करणे हा ‘बॉम्बे प्रोहिबिशन ॲक्ट, १९४९’ अंतर्गत गुन्हा आहे. (Alcohol Consumption)
वयाची २१ वर्षे पूर्ण केलेल्यांना साैम्य क्षमतेची बिअर सेवन करण्यास कायदेशीर परवानगी आहे. तर वयाची २५ वर्षे झाल्यानंतर व्हिस्की, रम पिण्यास कायदेशीर परवानगी देण्यात आली आहे. तसेच वाहतुकीसाठीही हाच नियम लागू आहे.
– अमृत तांबारे, उपअधीक्षक, राज्य उत्पादन शुल्क विभाग
परमिट रुममध्ये दुर्लक्ष (Alcohol Consumption)
परमिट रुममध्ये मद्यसेवनासाठी येणाऱ्यांना सर्रास मद्य पुरवले जात असल्याचे चित्र असते. त्यात १८ ते २० वयोगटातील तरुणांची संख्या सर्वाधिक पहावयास मिळते. त्यामुळे त्यांच्याकडे वयाचा दाखलाही मागितला जात नाही. किंवा परमिट रुममध्ये मद्यसेवनासाठी वयाची अट असल्याचे फलक दर्शनी भागात नसतात. त्यामुळे मद्यसेवनाच्या अटीला बहुतांश ठिकाणी हरताळ फासले जात आहे.
अवैध ठिकाणी सर्वाधिक धोका
शहरासह ग्रामीण भागात परवानाधारक परमिट रुम व्यतिरीक्त काही हॉटेल चालक अवैध रित्या मद्यसेवन करण्यास सुविधा उपलब्ध करून देतात. त्यामुळे बाहेरून मद्य खरेदी करून अनेक जण अशा हॉटेलमध्ये मद्यसेवन करताना आढळून येतात. मात्र अवैध व्यवस्था असल्याने तेथेही वयाची विचारपूस होत नसल्याचे वास्तव आहे. त्यामुळे अशा ठिकाणी सर्वाधिक नियमांची मोडतोड होताना दिसते.
ग्राहकच सांगतो ‘मी सज्ञान आहे’
मद्यसेवनासाठी आलेले ग्राहकच सांगतात की मी सज्ञान आहे. त्यानुसार त्यांना मद्य दिले जाते. तसेच हॉटेल, परमिट रुम येथे वयाच्या अटीच्या नियमाचा फलक दर्शनी भागात लावलेले आहेत. काही ठिकाणी पुसट झाले असून ते नव्याने लावण्यास सांगितले आहे. तसेच मद्यसेवन करणाऱ्यांना परवानाही दिला जातो. या नियमाबाबत जागरुकता वाढत आहे. दरम्यान, ज्या ठिकाणी नियमबाह्य मद्यसेवनाची जागा उपलब्ध करून दिली जाते तेथे या नियमांचे उल्लंघन होते. -संजय चव्हाण, अध्यक्ष, नाशिक जिल्हा हॉटेल अँड रेस्टॉरंट
हेही वाचा –