डोंगरगावला सिलिंडरचा स्फोट, आगीत घर खाक झाले

डोंगरगाव pudhari.news

नाशिक (देवळा) : पुढारी वृत्तसेवा
देवळा तालुक्यातील डोंगरगाव येथील शेतकरी विक्रम श्रावण सावंत यांच्या गट क्रमांक १५८ या शेतातील राहत्या घरात सोमवारी (दि. ८) सकाळी ७ च्या सुमारास घरगुती गॅस सिलिंडरचा स्फोट होऊन घराला भीषण आग लागून संपूर्ण घर आगीत खाक झाले. आगीत सुदैवाने जीवितहानी झाली नाही.

सोमवारी सकाळी सावंत यांच्या घरातील महिलांनी गॅस सुरू करताच घरात पसरलेल्या गॅसने पेट घेतला आणि टाकीचा स्फोट झाला. आगीत घरातील सर्व शासकीय कागदपत्रांसह कपाटात ठेवलेली २ लाख १५ हजार रुपये रोख रक्कम तसेच सुमारे ३ लाख रुपयांचे सहा तोळे सोने, घरात ठेवलेले लग्नमंडपाचे साहित्य आगीच्या भक्ष्यस्थानी पडले. आगीत सुमारे पंधरा ते सोळा लाख रुपयांचे नुकसान झाल्याचा प्राथमिक अंदाज आहे. आग विझविण्यासाठी गावातील असंख्य तरुणांनी प्रयत्नांची शिकस्त करत आग आटोक्यात आणली. सध्या कडक उन्हाळा सुरू असल्याने आग विझविण्यासाठी पाण्याची कमतरता भासली. तरीही परिसरातील तरुणांनी आणि ग्रामस्थांनी आग आटोक्यात आणली. आगीची माहिती मिळताच सरपंच पौर्णिमा सावंत, पोलिसपाटील प्रल्हाद केदारे यांनी तत्काळ घटनास्थळी धाव घेतली. तलाठी आणि ग्रामसेवक यांनी पंचांसमक्ष घटनेचा पंचनामा केला.

हेही वाचा:

The post डोंगरगावला सिलिंडरचा स्फोट, आगीत घर खाक झाले appeared first on पुढारी.