Black stork : युरोपच्या ‘ब्लॅक स्टॉर्क’ला नाशिकच्या कांद्याचा मोह

नाशिक : आनंद बोरा

जगभरात मागणी असलेल्या नाशिकच्या कांद्याचा विदेशी पक्ष्यांनाही मोह होताना दिसत आहे. त्यामुळेच युरोपमधील दुर्मीळ समजल्या जाणाऱ्या ‘ब्लॅक स्टॉर्क’ (Black stork) या पक्ष्याने चक्क कांद्याच्या शेतात मुक्काम ठाेकला आहे. निफाड तालुक्यातील बोकडदरे गावाजवळ प्रथमच या पक्षाचे दर्शन झाल्याने पक्षिमित्रही चकीत झाले आहेत. दरवर्षी नांदूरमध्यमेश्वर पक्षी अभयारण्यात विदेशी पक्षी स्थलांतरादरम्यान मुक्कामासाठी येतात. आता त्यामध्ये ब्लॅक स्टॉर्कचेही नाव जोडले गेल्याने ही एक दुर्मीळ बाब असल्याचे पक्षिमित्रांकडून बोलले जात आहे.

ब्लॅक स्टॉर्क (Black stork) हा पक्षी दरवर्षी हिवाळ्यात युरोप ते आफ्रिका असा प्रवास करतो. विश्रांतीसाठी तो ठराविक ठिकाणीच थांबतो. यावेळी हा पक्षी विकास काळे या शेतकऱ्याच्या कांद्याच्या शेतात मुक्कामासाठी थांबला आहे. ब्लॅक स्टॉर्क हा करकोचा कुटुंबातील सर्वात मोठा पक्षी आहे. हा पक्षी युरोपमध्ये मुख्यत: पोर्तुगाल, स्पेन, मध्य आणि पूर्व भागांमध्ये आढळतो. पूर्वेकडील पॅलेर्क्टिक ते पॅसिफिक महासागर येथे प्रजनन करतो. युरोप आणि आफ्रिकेदरम्यान स्थलांतर करताना ते भूमध्य समुद्राचा विस्तृत भाग ओलांडणे टाळतात आणि पूर्वेला लेव्हंट मार्गे, सिसिलीची सामुद्रधुनी किंवा पश्चिमेला जिब्राल्टरची सामुद्रधुनी यामार्गे प्रवास करतात. हा प्रवास पश्चिमेकडील मार्गाने सुमारे पाच हजार ६६७ किमी आणि पूर्वेकडील मार्गाने सात हजार किमी इतका असतो.

उपग्रह ट्रॅकिंगमुळे अनुक्रमे ३७ आणि ८० दिवसांचा सरासरी प्रवास करीत असल्याचे अभ्यासातून समोर आले आहे. ब्लॅक स्टॉर्क ही एक लाजाळू आणि सावध प्रजाती आहे. त्यांना एकट्याने किंवा जोडीने पाहिले जाते. सहसा दलदलीच्या भागात, नद्यांमध्ये राहणे त्यांना आवडते. उभयचर प्राणी, लहान मासे आणि कीटक हे त्यांचे मुख्य खाद्य आहे. सध्या हा पक्षी प्रथमच नाशिकमध्ये मुक्कामाला आल्याने देशभरातील पक्षिमित्र नाशिकमध्ये त्याच्या निरीक्षणासाठी येत आहेत. वास्तविक हा पक्षी दलदलीच्या भागात वास्तव्य करणे पसंत करतो. मात्र त्याने चक्क कांद्याच्या हिरव्यागार शेतात मुक्काम ठोकल्यामुळे, पक्षिमित्रांसाठी ही बाब नावीन्यपूर्ण ठरत आहे.

नांदूरमध्यमेश्वर भागातील शेतांमध्ये मुबलक पाणी आणि खाद्य असल्याने अनेक पक्षी अभयारण्यात मुक्काम न करता शेतात मुक्काम करीत आहेत. मात्र, दुर्मीळ समजला जाणाऱ्या ब्लॅक स्टॉर्कचा मुक्काम आश्चर्यजनक आहे. हा पक्षी प्रथमच नाशिक मुक्कामी आला आहे.

– शंकर लोखंडे, गाइड, पक्षी अभयारण्य

ब्लॅक स्टॉर्कचे वर्णन (Black stork)

हा पक्षी १४५ ते १५५ सेमी (५७ ते ६१ इंच) पंख असलेला, चोचीच्या टोकापासून शेपटीच्या टोकापर्यंत सरासरी ९५ ते १०० सेमी (३७ ते ३९ इंच) उंच असतो. या पक्षाचा काळा पिसारा असतो. पांढऱ्या खालच्या भागासह, लांब लाल पाय आणि लांब टोकदार लाल चोच ही त्याची मुख्य ओळख करून देता येईल.

हेही वाचा :

The post Black stork : युरोपच्या 'ब्लॅक स्टॉर्क'ला नाशिकच्या कांद्याचा मोह appeared first on पुढारी.