मनपा कर्मचारी खून प्रकरणी संशयित गजाआड

arrested

नाशिक : पुढारी वृत्तसेवा- दुचाकीस धक्का लागल्याची कुरापत काढून टोळक्याने मनपा कर्मचाऱ्यावर धारदार शस्त्राने वार करीत त्याचा खून केल्याची घटना गोदाघाटावरील कपुरथळा परिसरात घडली. या हल्ल्यात सनी फ्रान्सीस जॉन (३६, रा. बोधले नगर, उपनगर) याचा खून झाला आहे. याप्रकरणी गुन्हे शाखा युनिट एकच्या पथकाने संशयित मारेरक्यांची धरपकड केली आहे.

मयुर फ्रान्सीस जॉन (३०) यांच्या फिर्यादीनुसार, संशयित योगेश साळी, दादू पेखळे, यश भागवत, मयूर पठाडे, गणेश शिरसाठ व इतर तीन ते चार संशयितांनी मंगळवारी (दि.३०) मध्यरात्री १२ च्या सुमारास कपुरथळा परिसरात सनीवर हल्ला करीत त्याचा खून केला. सनी हे बुधवारी (दि.३०) मित्र श्रेयस म्हस्के, अनिकेत सरोदे, रवी व अमोल चव्हाण यांच्यासोबत कपुरथळा परिसरात बसलेले होते. बालाजी कोट परिसराजवळ सिगारेट घेण्यासाठी सनी मित्रांसोबत गेले. त्यावेळी संशयितांपैकी एकाच्या गाडीला धक्का लागला. त्यामुळे दोन गटांत शाब्दिक वाद झाला. काही वेळाने संशयितांनी इतर साथीदारांना बोलावले. दरम्यान, सनी हे त्यांच्या मित्रांसोबत परिसरातच पार्टी करत असताना संशयितांनी त्यांना तेथे गाठले. संशयितांनी कुरापत काढून सनीवर हल्ला केला. संशयितांनी सनीवर शस्त्राने सपासप वार करीत ते पसार झाले. घटनेची माहिती मिळताच सरकारवाडा पोलिस घटनास्थळी पोहोचले. सनीला जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र, उपचारापूर्वीच त्यांचा मृत्यू झाला होता. याप्रकरणी सरकारवाडा पोलिस ठाण्यात संशयितांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

कोणार्क नगर परिसरात धरपकड

गुन्हेशाखा युनीट एक पथकाने मारेकऱ्यांचा शोध सुरू केला असता त्यांना संशयितांची माहिती मिळाली. संशयित मयूर राजेश पठाडे, रोहित उर्फ दादू सुधाकर पेखळे हे कोणार्क नगरमध्ये असल्याची माहिती मिळाली. त्यानुसार, वरिष्ठ पोलिस निरीक्षक मधुकर कड यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक निरीक्षक विलास पडोळकर, हवालदार महेश नांदूर्डीकर, सागर कुलकर्णी, कैलास शिंदे, राकेश शिंदे, कुणाल पचलोरे, गोरक्ष साबळे, अनिल मोरे, घनश्याम महाले, युवराज गायकवाड यांच्या पथकाने सापळा रचून दोघांना पकडले. दोघांचा ताबा सरकारवाडा पोलिसांना देण्यात आला. 

हेही वाचा –