मनसेचे तळ्यात-मळ्यात; कार्यकर्ते बुचकळ्यात

मनसे pudhari.news

नाशिक : पुढारी वृत्तसेवा
राज्यात जागा वाटपावरून राजकीय पक्षांमध्ये घमासान सुरू असतानाच, मनसेचे मात्र तळ्यात-मळ्यात असल्याचे दिसून येत आहे. महायुतीच्या वाटेवर असलेल्या मनसेला जागा वाटाघाटीत अपेक्षित स्थान दिले गेले नसल्याने, अचानक प्रकाशझोतात आलेली मनसे आता दिसेनाशी झाली आहे. त्यामुळे पदाधिकाऱ्यांसह कार्यकर्ते बुचकळ्यात असून, आता गुढीपाडव्याला शिवतीर्थावर होणाऱ्या मनसेच्या मेळाव्यात राज ठाकरेंच्या भूमिकेकडे कार्यकर्त्यांचे लक्ष लागले आहे.

मनसेच्या गेल्या वर्धापन दिन सोहळ्यात पक्षप्रमुख राज ठाकरे यांनी पदाधिकाऱ्यांसह कार्यकर्त्यांना सबुरीचा सल्ला देताना, सर्व काही गुढीपाडव्याच्या मेळाव्यात बोलणार असल्याचे स्पष्ट केले होते. मात्र, अचानकच राज ठाकरे यांनी दिल्लीवारी केल्याने, लोकसभा निवडणुकीत मनसे उतरणार असल्याच्या चर्चांनी कार्यकर्त्यांमध्ये हुरूप भरला होता. त्यानंतर राज ठाकरे यांच्या मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासमवेतच्या बैठकांनी राज्यात राजकीय चर्चांना धुराळा उडवून दिला होता. मनसे महायुतीचा घटक होईल, असेही तर्क लावले जात होते.

या बैठकांमध्ये मनसेकडून नाशिक, शिर्डीसह दक्षिण मुंबई अशा तीन जागांची मागणी केल्याचीही चर्चा पुढे आली होती. त्यामुळे या मतदारसंघांतील मनसे इच्छुकांच्या आशा पल्लवित झाल्या होत्या. कार्यकर्त्यांनीही निवडणुकीच्या मैदानात उतरण्यासाठी कंबर कसली होती. मात्र, अचानकच प्रकाशझोतात आलेली मनसे, दिसेनाशी झाल्याने पुन्हा एकदा कार्यकर्त्यांमध्ये संभ्रम निर्माण झाला आहे. त्यातच भाजप नेते तथा उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी, मनसे महायुतीचा घटक नसल्याची स्पष्टोक्ती केल्याने, पक्षाची भूमिका नेमकी काय? या विचाराने कार्यकर्ते हैराण झाले आहेत.

दरम्यान, येत्या ९ एप्रिल रोजी मुंबईतील शिवाजी पार्क मैदानावर होणाऱ्या गुढीपाडवा मेळाव्यात मनसेप्रमुख राज ठाकरे आपली भूमिका स्पष्ट करणार असल्याने, कार्यकर्त्यांचे लक्ष या मेळाव्याकडे लागून आहे. सध्या मनसेकडून या मेळाव्याची जय्यत तयारी सुरू असून, मेळाव्यात राज ठाकरे काय बोलणार, लोकसभा निवडणुकीबाबत काही घोषणा करणार काय?, महायुतीबाबत त्यांची भूमिका कोणती असेल?, महाविकास आघाडीविषयी ते काय बोलणार? याकडे राज्यभरातील कार्यकर्ते, पदाधिकाऱ्यांचे लक्ष लागून आहे.

२०१९ची पुनरावृत्ती?
२०१९ च्या लाेकसभा निवडणुकीत मनसेने सपशेल माघार घेत, युतीविरोधात प्रचाराची भूमिका घेतली होती. त्यावेळी मनसेप्रमुख राज ठाकरे यांनी राज्यभरात सभा घेत, ‘लाव रे तो व्हिडिओ’मधून युतीचा समाचार घेतला होता. यावेळीदेखील लोकसभा निवडणुकीच्या दृष्टीने मनसेत कुठल्याच हालचाली होत नसल्याने, मनसे या निवडणुकीतूनही माघार घेण्याची शक्यता वर्तविली जात आहे. मात्र, यावेळी राज ठाकरे महायुतीचा व्हिडिओ लावणार की, महाविकास आघाडीचा हे बघणे औत्सुक्याचे ठरणार आहे.

हेही वाचा:

The post मनसेचे तळ्यात-मळ्यात; कार्यकर्ते बुचकळ्यात appeared first on पुढारी.