मराठी व्यावसायिकांच्या रोजगारावर गदा; मनसेची मध्यस्थी

मनसे एमजी रोड pudhari.news

नाशिक : पुढारी वृत्तसेवा
शहरातील एमजी रोडवरील मोबाइल साहित्य व दुरुस्ती करणाऱ्या परप्रांतीय व्यापाऱ्यांकडून स्थानिक मराठी व्यावसायिकांवर दादागिरी केली जात आहे. या परप्रांतीय व्यावसायिकांनी मोबाइल साहित्य विक्रीबरोबरच दुरुस्तीतही शिरकाव केल्याने, स्थानिक मराठी व्यावसायिकांच्या व्यवसायावर गदा आली आहे. त्यामुळे मराठी विरुद्ध परप्रांतीय असा वाद उभा राहिला असून, त्यात आता मनसेनी उडी घेतली आहे. अशाप्रकारे एकाधिकारशाही चालणार नसल्याचे मनसेनी परप्रांतीयांना बजावून सांगितल्यानंतर त्यांनी मंगळवारी (दि.१९) दुकाने बंद ठेवत हेकेखोरपणा दाखवून दिला आहे.

शहराच्या मध्यवर्ती भागात असलेल्या एमजी रोडवर मागील काही वर्षांपासून मोबाइल साहित्य विक्री व दुरुस्तीची मोठी बाजारपेठ निर्माण झाली आहे. त्यामुळे याठिकाणी दररोजची उलाढाल लाखो रुपयांमध्ये आहे. साहित्य विक्रीत परप्रांतीयांचीच दुकाने असून, त्यांनी परिसरातील संपूर्ण बाजारपेठ व्यापली आहे. याच ठिकाणी स्थानिक मराठी व्यावसायिकांचे मोबाइल दुरुस्तीची दुकाने आहेत. मात्र, आता परप्रांतीयांनी साहित्य विक्रीबरोबरच मोबाइल दुरुस्तीचेही काम हाती घेतल्याने, स्थानिकांचा रोजगार बऱ्यापैकी ठप्प झाला आहे. त्यामुळे स्थानिक विरुद्ध परप्रांतीय अशा वादाला तोंड फुटले असून, परप्रांतीयांनी मोबाइल दुरुस्तीमध्ये घुसखोरी करू येऊ नये, अशी भूमिका स्थानिकांनी घेत मनसेकडे दाद मागितली. दरम्यान, मनसे पदाधिकाऱ्यांनी परप्रांतीय व्यावसायिकांशी चर्चा करीत, बाजारपेेठेत अशाप्रकारे एकाधिकारशाही चालणार नसल्याचे ठणकावले असता, दुरुस्तीची कामे करणार नसल्याचे आश्वासन परप्रांतीयांनी दिले. तसेच याविषयी संयुक्त बैठक बोलावण्याचे निश्चित झाले. मात्र, परप्रांतीयांनी आपली दुकाने बंद ठेवत हेकेखोरपणा कायम राखल्याने, स्थानिक मराठी व्यावसायिक पुन्हा एकदा मनसेकडे दाद मागणार असल्याचे स्पष्ट करण्यात आले आहे.

परप्रांतीयांची दादागिरी
ही बाजारपेठ परप्रांतीय व्यावसायिक आणि ग्राहकांमधील वादाने नेहमीच चर्चेत असतो. एखाद्या ग्राहकानेे तक्रार केल्यास हे व्यावसायिक क्षणार्धात एकत्र येत संबंधित ग्राहकास बेदम मारहाण करतात. यापूर्वी असे अनेक प्रकार समोर आले आहेत. या व्यावसायिकांनी केवळ एमजी रोडवरील बाजारपेठच नव्हे तर पंचवटी, सातपूर, नाशिकरोड या भागातही आपले व्यवसाय थाटले आहेत. त्यामुळे स्थानिकांचा रोजगार हिसकावला जात आहे.

सरकारवाडा पोलिस ठाण्यात आज बैठक
परप्रांतीय मोबाइल व्यावसायिक व मराठी व्यावसायिकांमधील वाद टोकाला जावू नये, यासाठी सरकारवाडा पोलिस ठाण्यात उद्या (दि.२१) सर्व व्यापाऱ्यांची बैठक बोलावली आहे. पोलिसांनी दोन्ही संघटनांच्या पदाधिकाऱ्यांशी संपर्क साधून त्यांना बैठकीस उपस्थित राहण्याचे सांगितले आहे.

महात्मा गांधी रस्त्यावरील मोबाइल बाजारात बहुतांश राजस्थानी व्यावसायिकांची दुकाने आहेत. संबंधितांनी घाऊक व किरकोळ स्वरुपात साहित्य विक्री करावी. मराठी युवकांचे मोबाइल दुरुस्तीचे कामे हिरावू नये, असे त्यांना सांगितले. व्यवसायावर संबंधितांना एकाधिकारशाही राखता येणार नाही. याबाबत परप्रांतीय व्यावसायिकांनी सकारात्मक प्रतिसाद दिला असून, संयुक्त बैठक घेऊन मार्ग काढला जाईल. – अंकुश पवार, जिल्हाध्यक्ष, मनसे.

राजस्थानी व्यावसायिकांनी सुरुवातीला होलसेलचा व्यवसाय सुरू केला. मात्र, हळूहळू त्यांनी रिटेलचा व्यवसाय एमजीरोडसह संपूर्ण नाशिकमध्ये सुरू केला. तोपर्यंत आम्ही विरोध केला नाही. मात्र, गेल्या काही महिन्यांपासून त्यांनी गावातून लोक बोलावून दुरुस्तीचेही कामे सुरू केेल्याने, मराठी व्यावसायिकांवर उपासमारीची वेळ आली आहे. त्यांना मोबाइल दुरुस्ती करू नये, असे सांगितल्यानंतर त्यांनी दुकाने बंद ठेवली आहेत. – गणेश पाटील, मोबाइल दुरुस्ती व्यावसायिक

हेही वाचा:

The post मराठी व्यावसायिकांच्या रोजगारावर गदा; मनसेची मध्यस्थी appeared first on पुढारी.