न्यायालयाच्या निर्देशांचा अवमान होत असल्याबाबत गोदाप्रेमींकडून तक्रार

गोदावरी pudhari.news

नाशिक : पुढारी वृत्तसेवा
मनुष्यबळाअभावी महापालिकेतील गोदावरी संवर्धन कक्ष केवळ कागदावरच राहिला आहे. या कक्षासाठी दोन स्वच्छता निरीक्षक आणि एका विभागीय स्वच्छता निरीक्षकाच्या नियुक्तीची मागणी करून दोन महिने उलटल्यानंतरही त्याची पूर्तता होत नसल्यामुळे न्यायालयाच्या निर्देशांचा अवमान होत असल्याची तक्रार गोदाप्रेमींकडून केली जात आहे.

गोदावरी प्रदूषणाविरोधात पर्यावरणप्रेमींनी गोदावरी गटारीकरण विरोधी मंचची स्थापना केली आहे. या मंचच्या वतीने गोदाप्रदूषणाविरोधात उच्च न्यायालयात याचिका दाखल करण्यात आली होती. या याचिकेवरील सुनावणी दरम्यान न्यायालयाने गोदा प्रदूषणमुक्तीसाठी उपाययोजना सुचविण्याकरिता केंद्र सरकारच्या निरी या संस्थेची नेमणूक केली होती. निरीने आपला सर्वेक्षण अहवाल सादर केल्यानंतर त्यावर अंमलबजावणीसाठी न्यायालयाने विभागीय महसूल आयुक्तांच्या अध्यक्षतेखाली उच्चस्तरीय तसेच महापालिका, जिल्हा प्रशासन, एमआयडीसी, प्रदूषण नियंत्रण मंडळ आदी विभागस्तरीय समित्यांचे गठण केले. गोदावरी प्रदूषणावर नियंत्रण ठेवण्यासाठी महापालिकेत गोदावरी संवर्धन कक्षाची  स्थापना करण्याचीदेखील सूचना दिली होती. गोदावरी संवर्धन कक्षामध्ये महापालिका हद्दीतील सोमेश्वर धबधबा ते नांदूर पुलादरम्यानचा भाग येतो. गोदावरी नदीपात्रातील साफसफाई करणे व प्रदूषण दूर करण्यासाठी उपाययोजनांची अंमलबजावणी करण्याचे काम आहे. गोदावरी संवर्धन कक्षासाठी चार स्वच्छता निरीक्षक नियुक्त करण्याची सूचना आहे. मात्र, अवघे दोनच स्वच्छता निरीक्षक काम करत आहेत. प्रशासन घनकचरा व्यवस्थापन विभागाकडे स्वच्छता निरीक्षकांची मागणी नोंदविण्यात आली. मात्र, अद्यापही मनुष्यबळ उपलब्ध करून दिलेले नाही.

हेही वाचा:

The post न्यायालयाच्या निर्देशांचा अवमान होत असल्याबाबत गोदाप्रेमींकडून तक्रार appeared first on पुढारी.