नाशिक : पुढारी वृत्तसेवा; गेल्या तीन वर्षांच्या खंडानंतर नाशिककर राष्ट्रीय फुल मॅरेथॉन अनुभवणार आहेत. येत्या २८ जानेवारी रोजी ही मॅरेथॉन होणार असून त्यासाठी मराठा विद्या प्रसारक युद्धपातळीवर तयारी करत आहे. गंगापूर रोडवरील मॅरेथॉन चौकापासून सुरू होणारी रन धोंडेगावपासून परत मॅरेथॉन चौक असा ४२ किमीचा टप्पा पार करते. या मॅरेथॉनमध्ये आतापर्यंत अनेक राष्ट्रीय खेळाडूंनी सहभाग घेतला असून, पारितोषिक वितरणाला ऑलिम्पिक खेळाडू अथवा आंतरराष्ट्रीय दर्जाचा खेळाडू प्रमुख पाहूणे म्हणून उपस्थित असतात.
शहरात गेल्या अनेक वर्षांपासून मराठा विद्या प्रसारक ही संस्था फुल ४२ किमीची मॅरेथॉन भरवत असते. या माध्यमातून राज्य आणि देशपातळीवर शहराचे नाव झाले आहे. २०२० मध्ये यापूर्वी मॅरेथॉन स्पर्धा भरविण्यात आली होती. त्यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून ऑलिम्पियन अजित लाकरा उपस्थित होते. त्यानंतर कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव, मविप्रमध्ये सत्तांतर या कारणांमुळे गेली तीन वर्षे मॅरेथॉन होऊ शकली नव्हती. यंदा मात्र ही मॅरेथॉन होत असल्याने जिल्ह्यातील खेळाडूंमध्ये चैतन्याचे वातावरण आहे.
यंदाच्या प्रमुख पाहुण्यांबाबत उत्सुकता
पहिल्या मॅरेथॉन स्पर्धेपासून या स्पर्धेच्या पारितोषिक वितरण सभारंभाला प्रमुख पाहुणा म्हणून आंतरराष्ट्रीय दर्जाचा किंवा ऑलिम्पियन खेळाडू उपस्थित राहात आहेत. त्यामध्ये धनराज पिल्ले, पी.टी. उषा, गगन नारंग, कविता राऊत, दत्तू भोकनळ यांबरोबरच व्ही.व्ही.एस. लक्ष्मण यांसारखे खेळाडू उपस्थित राहिले आहेत. यंदाचे वर्ष हे पॅरिस ऑलिम्पिक, युवा महोत्सव नाशिक यामुळे चर्चेत आहे. त्यामुळे यंदा प्रमुख पाहुणे कोण, याची उत्सुकता नाशिककरांना आहे.
मॅरेथॉन पुतळ्याचे पुन्हा अनावरण
नाशिकच्या गंगापूर रोडवरील मॅरेथॉन चौकात मॅरेथॉन मॅनच्या पुतळ्याचे अनावरण सहा वर्षांपूर्वी करण्यात आले होते. गेल्या वर्षी वादळी पावसाच्या तडाख्यात झाड कोसळल्याने हा पुतळा पडला होता. मविप्र संस्थेने तातडीने या ठिकाणी पुतळ्याची दुरुस्ती करून घेतली आहे. लवकरच हा पुतळा बसविण्यात येऊन त्याचे पुन्हा अनावरण होणार आहे.
मविप्र मॅरेथॉन येत्या २८ जानेवारी रोजी होणार आहे. गेल्या वर्षी झाडाची फांदी पडल्याने मॅरेथॉन पुतळाही खराब झाला होता. लवकरच त्याचे अनावरण होणार आहे.
ॲड. नितीन ठाकरे, सरचिटणीस, मविप्र, नाशिक.
हेही वाचा :
- कोल्हापूर : परितेमध्ये प्रसादातून विषबाधा; साठजणांवर उपचार सुरू
- मिकी माऊस आणि डिस्नेचा संबंध संपुष्टात
- पुण्यात बीएच सिरीज घेण्यात दुपटीने वाढ
The post मविप्र मॅरेथॉन रंगणार २८ जानेवारीला appeared first on पुढारी.