नाशिक : पोलिस भरतीच्या लेखी परीक्षेचा निकाल जाहीर

पोलीस

नाशिक : पुढारी वृत्तसेवा

नाशिक ग्रामीण पोलिस दलातील १५ वाहनचालकांच्या रिक्तपदांसाठी घेण्यात आलेल्या लेखी परीक्षेचा अंतिम निकाल जाहीर झाला आहे. बहुपर्यायी असलेल्या लेखी परीक्षेत योग्य पर्याय नसल्याने पोलिस दलातर्फे सर्व उमेदवारांना एक गुण देण्यात आला आहे. दरम्यान, मैदानी, चालक कौशल्य व लेखी परीक्षेच्या गुणांवरून अंतिम गुणवत्ता यादी जाहीर होणार आहे.

नाशिक ग्रामीण पोलिस दलाच्या लेखी परीक्षेत १२४ पात्र उमेदवारांपैकी १२२ उमेदवारांनी हजेरी लावली होती. रविवारी (दि.२६) झालेल्या बहुपर्यायी परीक्षेत १०० गुणांसाठी १०० प्रश्न विचारण्यात आले होते. त्यापैकी २०२३ मध्ये महाराष्ट्र भूषण पुरस्कार कोणास देण्यात आला, असा प्रश्न विचारला होता. मात्र प्रश्नपत्रिकेत उत्तरांत दिलेल्या चार पर्यायांपैकी एकही अचूक पर्याय नव्हता. ही बाब पोलिस दलाच्या लक्षात आल्याने अंतिम निकालात सर्वच उमेदवारांना एक गुण देण्यात आला आहे. लेखी परीक्षेच्या प्राप्त हरकती निकाली काढल्यानंतर गुणवत्ता यादी प्रसिद्ध करण्यात आली आहे.

अंतिम यादी प्रवर्गनिहाय

नाशिक ग्रामीण पोलिस दलात १५ वाहनचालकांच्या रिक्त जागांसाठी २,११४ अर्ज प्राप्त झाले होते. त्यापैकी २ ते ४ जानेवारीदरम्यान मैदानी परीक्षेसाठी १,२४० उमेदवारांनी हजेरी लावली होती. त्यातून १,०२२ उमेदवारांनी वाहन चालवण्याची प्रत्यक्ष चाचणी दिली होती. त्यापैकी १२४ उमेदवारांची लेखी परीक्षेकरिता निवड झाली होती. अंतिम यादी प्रवर्गनिहाय जाहीर होणार आहे.

५२ जणांना ९० पार गुण

१०० गुणांच्या परीक्षेत अंकगणित, सामान्य घडामोडी, चालू घडामोडी, बुद्धिमत्ता, मराठी व्याकरण आणि मोटार वाहन चालविण्यासह वाहतुकीसंदर्भातचे नियम यावर आधारित प्रश्न विचारण्यात आले. या परीक्षेत ५२ उमेदवारांनी ९० किंवा त्याहून अधिक गुण मिळवले आहेत. तसेच तीन उमेदवारांना ९७, सात उमेदवारांना ९६ आणि चार उमेदवारांना ९५ गुण मिळाले आहेत.

हेही वाचा:

The post नाशिक : पोलिस भरतीच्या लेखी परीक्षेचा निकाल जाहीर appeared first on पुढारी.