महाविकास आघाडीची ४८ उमेदवारांची यादी तयार

नाशिक; पुढारी वृत्तसेवा : राज्यातील लोकसभेच्या जागा वाटपावरून महाविकास आघाडीत कुठलेही मतभेद नसल्याचे स्पष्ट करत जागा वाटप पूर्ण झाले असून, सर्व ४८ मतदारसंघांची पूर्ण यादी एकत्रितरीत्या जाहीर केली जाईल, अशी माहिती शिवसेनेच्या ठाकरे गटाचे मुख्य प्रवक्ते तथा खासदार संजय राऊत यांनी दिली.

काँग्रेस नेते खासदार राहुल गांधी यांच्या भारत जोडो न्याय यात्रेत सहभागी होण्यासाठी नाशिक दौर्‍यावर आलेल्या खा. राऊत यांनी माध्यमांशी संवाद साधला. महाविकास आघाडीत उमेदवारी निश्चितीवरून संभ्रम असल्याची चर्चा त्यांनी फेटाळून लावत राज्यातील सर्वच ४८ जागांची उमेदवारी यादी तयार असल्याचे स्पष्ट केले. अजित पवार गटाचे नेते नीलेश लंके यांच्या शरद पवार गटातील प्रवेशाबाबतही राऊत यांनी प्रतिक्रिया दिली. शरद पवार हे सगळ्यांचे छत्र आहे. नीलेश लंके लोकसभा लढणार असतील, तर महाराष्ट्र त्यांच्या या भूमिकेचे स्वागत करेल, असे राऊत म्हणाले. महाविकास आघाडी असेल किंवा इंडिया सगळे एक आहोत. राहुल गांधी यांचे महाराष्ट्रात आगमन झाले आहे. नंदुरबार, धुळे आणि नाशिकमध्ये त्यांचे जोरदार स्वागत झाले. सर्व महाविकास आघाडीतील घटक पक्ष त्या ठिकाणी उपस्थित होण्याचे आधीच ठरवले होते.

उद्धव ठाकरे समारोपाला येणार

येत्या १७ मार्चला शिवाजी पार्कला काँग्रेसच्या या भारत जोडो यात्रेचा समारोप होईल. स्वतः उद्धव ठाकरे उपस्थित राहतील. राहुल गांधी आणि उद्धव ठाकरे यांची यासंदर्भात बुधवारी चर्चा झाली. यात्रेत सहभागी होण्यासाठी राहुल गांधी यांनी उद्धव ठाकरे यांना खास आमंत्रण दिले आहे. शिवसेना फार मोठ्या प्रमाणात राहुल गांधी यांचे स्वागत करणार आहे, असे राऊत यांनी सांगितले.

नाशिकची जागा शिवसेना जिंकणार

महायुतीपाठोपाठ महाविकास आघाडीतही नाशिकच्या जागेवरून संघर्ष बघायला मिळत आहे. शिवसेनेच्या ठाकरे गटाचा मूळ दावा असताना राष्ट्रवादीनेही नाशिकवर दावा केला आहे. या पार्श्वभूमीवर राऊत यांना विचारले असता नाशिकची जागा शिवसेना जिंकणार, असे सूचक वक्तव्य त्यांनी केले. यावरून शिवसेनेचा ठाकरे गट नाशिकची जागा सोडणार नसल्याचे स्पष्ट झाले आहे.

हेही वाचा :

The post महाविकास आघाडीची ४८ उमेदवारांची यादी तयार appeared first on पुढारी.