चैत्र नवरोत्सवात संपूर्ण सप्तशिखर हे आदिमायेच्या जयघोषाने दुमदुमले…!

सप्तश्रृंगी pudhari.news

कळवण : पुढारी वृत्तसेवा
लाखो भाविकांचे श्रद्धास्थान असलेले महाराष्ट्रातील साडेतीन शक्तीपीठापैकी आद्यस्वयंभू शक्तीपीठ असलेल्या श्री सप्तशृंग निवासिनी देवीचा चैत्रोत्सव श्री रामनवमी पासून अतिशय आनंदात व भक्तिमय वातावरणात सुरू असून, चैत्र नवरोत्सवात पहाटे पासून विविध धार्मिक पूजा-अर्चा यासह महावस्त्र व अलंकाराची सवाद्य मिरवणूक काढण्यात आली. चोख सुरक्षा व्यवस्था व सेवा – सुविधेच्या माध्यमातून देवस्थान कर्मचारी व प्रशासकीय विभागातील अधिकारी व कर्मचारी यात्रा उत्सव यशस्वीतेसाठी कार्यरत असून, यात्रा सुरळीत पार पडण्याच्या दृष्टीने स्वयंसेवी संघटनांनी हातभार लावलेला आहे. आज शुक्रवार (दि.१९) सकाळची पंचामृत महापूजा विश्वस्त ॲड. ललित निकम यांच्या हस्ते सहकुटुंब करण्यात आली.

या वेळी संस्थानचे मुख्य व्यवस्थापक सुदर्शन दहातोंडे, कार्यालयीन अधीक्षक प्रकाश जोशी, जनसंपर्क अधिकारी भिकन वाबळे इस्टेट कस्टोडीयन प्रकाश पगार यांसह सर्व विभाग प्रमुख व कर्मचारी वर्ग उपस्थित होते. यात्रा उत्सव दरम्यान २ वेळचे मोफत अन्नदान (महाप्रसाद) सुविधा चैत्रोत्सव कालावधीत सुर असून येणाऱ्या भाविक भक्तांच्या सेवा-सुविधेसाठी २४ तास मंदिर दर्शनासाठी खुले करण्यात आलेले आहे. उत्सव काळात भाविकांसाठी पिण्याच्या पाण्याची टंचाई भासू नये यासाठी संस्थान मार्फत २ टँकरद्वारे पिण्याच्या पाण्याची व्यवस्था करण्यात आली असून, मंदिर परिसरात १२ पानपोईची व्यवस्था सुधा करण्यात आली आहे. सप्तशृंगगडावर व परिसरात आग लागून कुठलीही जीवित अथवा वित्त हानी होऊ नये म्हणून २४ तास अग्निशमन बंबाची व्यवस्था करण्यात आली आहे. मध्यप्रदेश, गुजरात तसेच खान्देश प्रांतातील नंदुरबार, नवापूर, धुळे, साक्री, शिरपूर, जळगाव, धरणगाव, मालेगाव आणि विविध ठिकाणच्या पालख्या आणि पायी भाविक गडावर पायरी व महाराष्ट्र परिवहन मंडळाच्या वाहने पोहच असून संपूर्ण सप्तशिखर हे आदिमायेच्या जयघोषाने दुमदुमला आहे…!

हेही वाचा: