माजी सैनिकाचा खून करणाऱ्यांसह त्यांचे मित्रही तडीपार

तडीपार www.pudhari.news

नाशिक : पुढारी वृत्तसेवा- गंभीर स्वरुपाचे गुन्हे दाखल असलेल्या सराईत गुन्हेगारांना पोलिस आयुक्तालयातर्फे तडीपार, स्थानबद्ध अशा प्रतिबंधात्मक कारवाई केल्या जात आहेत. त्यानुसार माजी सैनिकाचा भररस्त्यात धारदार शस्त्राने खून करणाऱ्या टोळीतील सहा जणांना शहर पोलिसांनी वर्षभरासाठी तडीपार केले आहे. विशेष म्हणजे खुनाच्या गुन्ह्यात सहभागी असलेल्या तिघांसह त्यांच्यासोबत सुरुवातीस मद्यसेवन करणाऱ्या तिघांनाही पोलिसांनी तडीपार केले आहे. यामुळे गुन्हेगारांसोबत संबंध ठेवणाऱ्यांवर कारवाईचा दणका बसल्याने गुन्हेगार समर्थकांमध्ये खळबळ उडाली आह.

म्हसरुळ आडगाव लिंकरोडवर २७ डिसेंबर रोजी सराईत गुन्हेगार लुटमारीचे प्रकार करीत होते. त्यावेळी सेवानिवृत्ती लष्करी जवान रवीदत्त चौबे यांनी संशयितांना विरोध केला. त्यामुळे संशयितांनी त्यांच्यावर हल्ला करीत त्यांचा खून केला. याप्रकरणी म्हसरुळ पोलिस ठाण्यात तिघांविरोधात खुनाचा गुन्हा दाखल करून तिघांना अटक केली. दरम्यान, संशयितांविरोधात अनेक तक्रारी असल्याने त्यांच्यावर प्रतिबंधात्मक कारवाई प्रस्तावित करण्यात आली. त्यानुसार पोलिसांनी सखोल तपास केला असता तिघांसोबत त्यांचे इतर तिघे साथीदारही खुनाच्या आधी सोबत असल्याचे आढळून आले. सहाही जणांनी मद्यसेवन करून परिसरात दहशत करण्याचा प्रयत्न केलेला. त्यानंतर तिघे इतरत्र गेले तर तिघांनी खुन केला होता. त्यामुळे या गुन्हेगारांकडून शहरातील कायदा व सुव्यवस्था बिघडण्याची शक्यता गृहित धरून पोलिस उपआयुक्त किरणकुमार चव्हाण यांनी खुनातील संशयित तिघांसह त्यांचे इतर तीन साथीदार यांना वर्षभरासाठी शहर व जिल्ह्यातून तडीपार केले आहे.

या संशयितांना केले तडीपार

जय पंजाब मोहिते, उमेश सुरेश वाघ, प्रशांत उर्फ स्वप्निल तुकाराम डंबाळे, फिरोज सलिम शेख, रोहित गोटीराम बोराडे, जयशंकरसिंग देवेंद्रसिंग राजपूत

 वर्षभरात ५२ गुंड तडीपार

शहरातील गंगापूर, भद्रकाली, सरकारवाडा, पंचवटी, आडगाव, म्हसरुळ व मुंबईनाका या पोलिस ठाण्यांच्या हद्दीतील ५२ गुन्हेगारांना सहा महिने ते दोन वर्षांपर्यंत शहर व जिल्ह्यातून तडीपार केले आहे. रेकॉर्डवरील इतर गुन्हेगारांवरही तडीपारीची कारवाई प्रस्तावित करण्यात आली आहे. तसेच त्यांच्यासोबत संबंध ठेवणारे किंवा प्रत्यक्ष-अप्रत्यक्षरित्या गुन्हेगारांना मदत करणाऱ्यांवरही प्रतिबंधात्मक कारवाईचा इशारा पोलिसांनी दिला आहे.

हेही वाचा –