नाशिक : लग्नापूर्वी वधूची ढोल ताशांच्या गजरात मिरवणूक

वधूची मिरवणूक,www.pudhari.news

नाशिक (सिन्नर) : पुढारी वृत्तसेवा

सिन्नर तालुक्यातील डुबेरे गावचे भूमिपुत्र बबन भाऊराव वाजे आणि त्यांच्या पत्नी संगीता वाजे या दाम्पत्याने कन्या डॉ. वैष्णवी हिच्या लग्नानिमित्त गावातून नवरदेवाप्रमाणे सवाद्य मिरवणूक काढली. नातेवाईक व ग्रामस्थ आणि हितचिंतकांच्या उपस्थितीत ढोलताशाच्या गजरात डॉ. वैष्णवी हिची मराठमोळ्या थाटात सजवलेल्या बैल गाडीतून दिमाखात मिरवणूक काढली. समाजापुढे मुलगा-मुलगी समान असल्याचा संदेश देत एक आदर्श निर्माण केला आहे.

डुबेरे येथील संगीता व बबनराव वाजे या पती-पत्नीने दोन मुलींवर समाधान मानत त्यांचे संगोपन व शिक्षणावर भर देत त्यांना समाजात मानाचे स्थान मिळवून दिले आहे. मोठी मुलगी वैष्णवी बालरोग तज्ज्ञ (एमडी) असून दुसरी मुलगी शिवानी बीई मेकॅनिकल आहे. डॉ. वैष्णवी ही एमडी बालरोगतज्ज्ञ असून तिचा विवाह रांजणगाव ता. राहता, जि. अहमदनगर येथील विजया व दत्तात्रय ज्ञानदेव गाढवे यांचे चिरंजीव डॉ. मयुरेश एमडी मेडिसिन यांच्याशी शुक्रवारी (दि.12) करण्याचे ठरवले. त्यानिमित्त वाजे परिवाराने डॉ. वैष्णवी हिची गावातून नवरदेवाप्रमाणे सवाद्य मिरवणूक काढली. मिरवणुकीतून गावाला आणि समाजाला मुलगा आणि मुलगी असा भेदभाव न करता दोघांनाही सारखेच प्रेम द्या आणि त्यांचे जीवन सुंदर बनवावे असा संदेश दिला आहे. याप्रसंगी 51 मुलींचे ढोल ताशा पथक तसेच पारंपारिक संबळ पथकांच्या सुमधुर लयबद्ध तालबद्ध स्वरात भव्य मिरवणूक काढण्यात आली.

यावेळी मविप्रचे माजी संचालक तथा सिन्नर वाचनालयाचे कार्यवाह हेमंत नाना वाजे, श्रीमंत थोरले बाजीराव पेशवे पतसंस्थेचे चेअरमन नारायण वाजे आदी मान्यवरांनी या अभिनव अशा मिरवणुकीचे स्वागत करत डॉ. वैष्णवी यांना वैवाहिक सुखी जीवनासाठी शुभेच्छा दिल्या.

मुलगीही वंशाचा दिवा

वंशाला दिवाच हवा ही भावना अलीकडच्या काळात नामशेष होऊ लागली आहे. बबनराव वाजे व संगिता वाजे यांनीही मुलींनाच वंशाचा दिवा मानून त्यांना सक्षम बनविले आहे. वाजे कुटूंबीयांनीदेखील मुलींना उच्चशिक्षित करण्याचे स्वप्न साकारले आहे.

मुलगी मुलाप्रमाणे जबाबदाऱ्या पार पाडण्यात कुठेही कमी पडत नाही. त्यामुळे मुलगा मुलगी समान अशा न्यायाने विचार करत प्रत्येक पालकाने मुलींच्या कर्तृत्वाला न्याय देऊन त्यांचा सन्मान करावा.

– बबनराव वाजे, डॉ. वैष्णवीचे

हेही वाचा :

The post नाशिक : लग्नापूर्वी वधूची ढोल ताशांच्या गजरात मिरवणूक appeared first on पुढारी.