सिन्नर (जि. नाशिक) : पुढारी वृत्तसेवा – तालुक्यातील पाडळी येथील पाच वषर्षीय बालिकेचा सर्पदंशाने मृत्यू झाल्याची घटना मोह येथे मंगळवारी (दि. २८) दुपारी १२.३० च्या सुमारास घडली. तीर्था तुकाराम शिंदे (५, रा. पाडळी, ता. सिन्नर) असे मृत बालिकेचे नाव आहे. सर्पदंशाने बालिकेच्या मृत्यूची ही तालुक्यातील दोन-तीन दिवसांतील दुसरी घटना आहे. यापूर्वी ठाणगाव येथे एका बालिकेचा सर्पदंशाने मृत्यू झाला होता.
पाडळी येथील तुकाराम शिंदे यांच्या दोन मुली ४ दिवसांपूर्वीच मोह येथील मामा सुदाम रामकृष्ण भिसे यांच्या घरी आल्या होत्या. सिन्नर-नाशिक महामार्गावर हॉटेल विठ्ठल कामत जवळ भिसे परिवाराची वस्ती आहे. मंगळवारी तीर्था आणि तिची मोठी बहीण आणि मामाच्या दोन मुली घराच्या अंगणात खेळत असताना तीर्थाला सर्पदंश झाला. तीर्थाने आपल्याला काहीतरी चावल्याचे मोठ्या बहिणीला सांगितल्यानंतर तिने लागलीच घरातील सदस्यांना याबाबत माहिती दिली. तीर्थाला ज्या भागात सर्पदंश झाला होता तेथील भाग काळा पडल्याचे आणि रक्तस्त्राव होत असल्याचे लक्षात आले. त्यांनी तत्काळ उपचारांसाठी नाशिक रोड येथील बिटको रुग्णालयात दाखल केले. मात्र उपचारापूर्वीच तिची प्राणज्योत मालवली. दोन दिवसांपूर्वीच ठाणगाव येथील सात वर्षीय बालिकेचा सर्पदंशाने मृत्यू झाल्याची घटना घडली होती. सर्पदंश झाल्याने दोन बालिकांचा मृत्यू झाल्याने ग्रामस्थांमध्ये हळहळ व्यक्त केली जात आहे.
पाडळी ग्रामस्थांत हळहळ
नाशिक येथील जिल्हा रुग्णालयात शवविच्छेदन केल्यानंतर मृतदेह नातेवाइकांच्या ताब्यात देण्यात आला. मंगळवारी सायंकाळी उशिरा तिच्यावर पाडळी येथे शोकाकुल वातावरणात अंत्यसंस्कार करण्यात आले. बालिकेच्या मृत्यूने ग्रामस्थांत हळहळ व्यक्त होत आहे.
हेही वाचा: