मालेगाव : पुढारी वृत्तसेवा – शहरात रविवारी (दि. २७) मध्यरात्री माजी महापौर व एमआयएमचे शहराध्यक्ष अब्दुल मलिक युनूस इसा शेख यांच्यावर गोळीबार झाल्याची घटना घडली होती. या घटनेने शहरात एकच खळबळ उडाली होती. पोलिसांनी या प्रकरणी तपासाची चक्रे वेगाने फिरविल्याने या हल्ला प्रकरणातील दोघा संशयित आरोपींना पोलिसांनी अटक केली आहे. त्यांच्याजवळून गुन्ह्यात वापरलेले पिस्तूल, दोन जिवंत काडतुसे व दुचाकी पोलिसांनी जप्त केली आहे. अपर पोलिस अधीक्षक अनिकेत भारती यांनी मंगळवारी (दि. २८) सुसंवाद हॉल येथे पत्रकार परिषद घेऊन या गुन्ह्याच्या उलगड्यासंदर्भात माहिती दिली. यावेळी पोलिस उपअधीक्षक तेगबीरसिंग संधू उपस्थित होते. रविवारी मध्यरात्री अब्दुल मलिक हे मित्र शेख रिहान शेख सलीम व अन्य सहकाऱ्यांसमवेत जुना आग्रा रोडवरील एका बिल्डिंग मटेरियल दुकानासमोर बसलेले असताना दुचाकीवरून आलेल्या दोन अज्ञात इसमांनी अब्दूल मलिक यांच्यावर गोळीबार करीत जीवे ठार मारण्याचा प्रयत्न केला होता. या प्रकरणी शहर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता.
यावेळी भारती यांनी सांगितले की, घटनेचे गांभीर्य लक्षात घेऊन शहर पोलिस ठाणे व स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकांनी तपास करण्याच्या सूचना केल्या होत्या. पोलिसांना मिळालेल्या माहितीनुसार दोघा संशयितांना पोलिसांनी शहरातून ताब्यात घेतले. त्यांची चौकशी केली असता म्हाळदे शिवारातील जमिनीचे व्यवहाराच्या वादातून व पूर्व वैमनस्यातून हा गोळीबार केल्याची कबुली दिली. दरम्यान पोलिस तपासात घटनास्थळावरील सीसीटीव्ही फुटेज ताब्यात घेतले.
असता त्यात दोन्ही बाजूकडून गोळीबार झाल्याचे समोर आले आहे. घटनास्थळी काडतुसांच्या सहा पुंगळ्या मिळून आल्या आहेत. अब्दूल मलिक यांचे सहकारी फारूख पटेल व त्यांच्या सोबत असलेला इसम हातातील पिस्तुलाने गोळीबार करत असल्याचे दिसून आले आहे. त्यामुळे या प्रकरणात परस्पर विरोधी गुन्हा दाखल करण्यात आला असून संशयित आरोपींचा शोध घेणे सुरू असल्याचे भारती यांनी सांगितले. अब्दुल मलिक यांच्यावर गोळीबार केलेल्या दोघा संशयितांना मंगळवारी दुपारी न्यायालयात हजर केले असता त्यांना चार दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे.
आमदार मौलाना मुफ्ती इस्माईल यांची टीका
या गोळीबार प्रकरणी आमदार मौलाना मुफ्ती मोहंमद इस्माईल यांनी पोलिसांच्या कार्यपद्धतीवर नाराजी व्यक्त केली आहे. शहरात ठराविक अंतराने गोळीबाराच्या घटना घडत आहेत. यावरुन पोलिसांचा गुन्हेगारांवर वचक राहिला नसल्याचे दिसते. अत्यंत वर्दळीच्या ठिकाणी गोळीबाराच्या घटना घडत असतील तर गल्लीबोळात काय परिस्थिती असेल, असा प्रश्न उपस्थित करुन मालेगावात जंगलराज सुरू असल्याची टीकाही आमदार मौलाना मुफ्ती मोहंमद इस्माईल यांनी केली. हल्लेखोरांना तातडीने अटक करावी, अशी मागणी त्यांनी केली आहे.
हेही वाचा: