[author title=”मालेगाव : नीलेश शिंपी” image=”http://”][/author]
तालुक्यातील मेहुणे गावास पाणीप्रश्नासह दुष्काळी अनुदान न मिळाल्याने संतप्त झालेल्या ग्रामस्थांनी लोकसभा निवडणुकीपूर्वी लोकसभा, विधानसभा व इतर सर्व निवडणुकांवर बहिष्कार टाकण्याचा व सर्व राजकीय नेत्यांना गावबंदी करण्याचा निर्णय ग्रामसभेत घेतला होता. या आशयाचा ठराव करून मागण्यांचे निवेदन अपर जिल्हाधिकारी यांना देण्यात आले होते. त्यावर प्रशासनाने कोणताही तोडगा न काढल्यामुळे दिंडोरी लोकसभा मतदार संघ निवडणुकीसाठी सोमवारी (दि. २०) झालेल्या मतदानावर बहिष्कार टाकल्याने मेहुणे गाव प्रकाशझोतात आले आहे. गावाने मतदान न केल्यामुळे प्रशासन खडबडून जागे होईल व आता तरी ग्रामस्थांचे प्रलंबित प्रश्न मार्गी लागतील, अशी आशा ग्रामस्थांकडून व्यक्त केली जात आहे.
तालुक्यात उन्हाचा प्रकोप वाढत असतानाच दुसरीकडे ग्रामीण भागात तीव्र पाणीटंचाईची समस्या उद्भवत आहे. त्यातच मेहुणे गावाला नांदगाव तालुक्यातील ५६ गाव पाणीपुरवठा योजनेच्या माध्यमातून पाणीपुरवठा केला जातो. या योजनेतून तब्बल पाच महिन्यांपासून गावात एक थेंबही पाणी आले नसल्याने गावात तीव्र पाणीटंचाई जाणवत आहे. नाही म्हणायला मालेगाव पंचायत समितीच्या माध्यमातून दोन पाणी टँकर सुरू करण्यात आले आहेत. तर दुसरीकडे पिण्यासाठी १५० रुपयांत २०० लिटर पाणी विकत घेऊन ग्रामस्थ आपली तहान भागवत आहेत. लोकप्रतिनिधींसह प्रशासकीय अधिकाऱ्यांनी पाणीप्रश्नी लक्ष घालून गावाची कायमस्वरूपी पाणीटंचाईतून सुटका करावी, अशी मागणी ग्रामस्थांकडून केली जात आहे.
वार्षिक खर्च
जिल्हा परिषदेच्या ग्रामीण पाणीपुरवठा विभागाच्या वतीने चालविण्यात येणाऱ्या नांदगाव ५६ खेडी प्रादेशिक पाणीपुरवठा योजनेवर वर्षाकाठी किमान चार कोटी ८० लाखांचा निधी खर्च होतो. त्यापैकी सुमारे सव्वादोन कोटींचा खर्च फक्त ५९ कर्मचाऱ्यांच्या वेतनावर होतो. उर्वरित दीड कोटीच्या आसपास खर्च स्टेशनवरून सर्वत्र पाणीपुरवठा करणाऱ्या सहा पंपिंग स्टेशनसाठी वापरण्यात येणाऱ्या विजेच्या देयकांपोटी होत असल्याची माहिती आहे.
यावर्षी तापमानाने ४३ अंश सेल्सिअस पार केल्याने नागरिक हैराण झाले आहेत, तर दुसरीकडे भूजलपातळी अधिकच खालावली आहे. पर्यायाने कूपनलिका झाल्या आहेत. ५६ गाव पाणीपुरवठा योजनेवर मालेगाव तालुक्यातील ३९ गावे व नांदगाव शहरासह तालुक्यातील १८ गावांना पाणीपुरवठा केला जातो. या योजनेची वितरण व्यवस्था व आवर्तनातील समन्वयाचा अभाव यामुळे गिरणा धरणावरील पाणीपुरवठा योजना विस्कळित झाली आहे. त्याचा परिणाम योजनेवर अवलंबून असणाऱ्या मालेगाव तालुक्यातील गावांवर झाला आहे. मेहणे गावाला या योजनेतून तब्बल पाच महिन्यांपासून गावात एक थेंबही पाणी आलेले नाही. त्यामुळे ही योजना असून अडचण नसून खोळंबा अशी झाली आहे. त्यातच ग्रामपंचायत मालकीची विहिरही कोरडी ठाक पडल्याने गावात तीव्र पाणीटंचाई जाणवत आहे. हंडाभर पाण्यासाठी महिलांना दोन ते तीन किलोमीटरवरून पाणी आणावे लागत आहे. या पार्श्वभूमीवर ग्रामपंचायतीने पाणी टँकर सुरू करण्यासाठी प्रस्ताव दिला होता. त्यानुसार पंचायत समितीमार्फत पाण्याचे दोन टैंकर मंजूर करण्यात आले आहेत. गावात या दोन टँकरच्या माध्यमातून दोन फेऱ्यांद्वारे आलेले पाणी ग्रामपंचायतीच्या मालकीच्या विहिरीत टाकले जाते. त्यानंतर गावात पाणीपुरवठा केला जातो. तर रोज कुटुंबाला लागणाऱ्या पाण्यासह पाळीव जनावरांची तहान भागवण्यासाठी ग्रामस्थांवर पाणी विकत घेण्याची वेळ आली आहे. पिण्याचे पाणी साठवून ठेवावे लागत असल्याने व ते दूषित होत असल्याने ग्रामस्थांचे आरोग्य धोक्यात आले आहे.
मेहुणे गावाला नांदगाव ५६ पाणीपुरवठा योजनेतून पाच महिन्यांपूर्वी पाणी आले होते. त्यानंतर योजनेतून गावाला पाणीपुरवठा झालेला नाही. यासंदर्भात अधिकारी, कर्मचाऱ्यांकडे तक्रार केली असता, जलवाहिनी खराब आहे, ती फुटलेली आहे. त्यामुळे पाणीपुरवठा होत नसल्याचे त्यांचे म्हणणे आहे. – अभिमन देवरे, ग्रामस्थ.
कामासाठी मालेगावला आलेले मजूर व दूध वाटपासाठी आलेले पशुपालक काम आटोपल्यावर घरी जाताना पिण्यासाठी ड्रम व दुधाच्या कॅनमध्ये पाणी घेऊन येतात. – निवृत्ती देवरे, माजी सरपंच.
घरी वापरण्यासाठी टँकरच्या माध्यमातून पाणी उपलब्ध होते. परंतु पिण्यासाठी पाणी विकत घ्यावे लागते. जनावरांसाठी एक टँकर दोन हजार ८०० रुपयांना, तर पिण्यासाठी १५० रुपयांत २०० लिटर पाणी विकत घेतो. – किशोर देवरे, पशुपालक, मेहुणे गाव.
हेही वाचा: